Skip to main content

Posts

Showing posts from April, 2011

तुझ्याविना

ल्यायली नयनात जी, फक्त काळी रात्र होती, आंधळी अन घुसमटती, सय तुझी रे मात्र होती, मज पिसारे का मिळाले, कापलेले मोर जेव्हा, माझिया उरात तेव्हा, एकटी लांडोर होती..

प्रीतीचा छंद वेडा

प्रीतीचा छंद वेडा लागला या जीवा अनुरागी रात्रीला मोहला चांदवा.. थबकुनी जावे श्वासांनी आता रुपेरी स्वप्ने मनी साठवता आभाळाचे गाणे गाता, सांग ना, देशील का मिठीचा झुलवा, या जीवा.. शांतता ही बोलू लागावी रात्र ओली भारून जावी नजरेची ही भाषा कळावी, होय ना, डोळ्यांया डोहीयात फुलवा, या जीवा..

चक्र

नियतीच्या या खेळामध्ये बेभरवशी हरेक साथी, आंधळा हा हिशोब सगळा,मांडिलेला जगाच्या माथी.. पुन्हा फिरुनी जन्मा येती, जुनीच गाणी नवीन ओठी, सैलावतसे जुनेच बंधन बांधण्या मग नवीन गाठी..

कुठे हरवले..

कुठे हरवले अवखळ मीपण.. रिते जाहले कुठे बालपण.. सूर कुठेसा दिसतो तरीही.. शब्दांनाही आता मुकेपण.. अनोळखी अन तूही आताशा.. सुटलेली ही कशी गुंतवण.. परिचितसे भास सभोवती.. उभे ठाकती करून रिंगण..

वनवास

पाणावले आज डोळे,संथ श्वास गुदमरे.. कशासाठी कासावीस कुणासाठी मन झुरे.. मना नाही थांग आज,वेडे उगी जगी फ़िरे.. स्वतःच्याच घरी आज वनवासी जीव उरे.....

रातराणी

एक होती रातराणी, सांगे गुलमोहर कहाणी, आठवणीने तिच्याच आले डोळ्या त्याच्या पाणी.. उठे जीवघेणी कळ जेव्हा सुटे दरवळ, कसे आठवते सार जरी लोटला हा काळ.. एक धुंद होती रात पान-फुलं होतं गात, हरखला गुलमोहर जणू टाकूनिया कात.. सारा उत्कट तो संग त्याचा खुललेला रंग, तिला वास्तवाचे भान अन तो स्वप्नामध्ये दंग.. त्याची नुरली ना ओढ पण मनी राही तेढ, उभी एकाकी रातराणी मंद हसतसे गुढ...