Skip to main content

Posts

Showing posts with the label कविता
कोल्हापूरचा महापूर नको नको ते राहून गेले हवे हवे ते, वाहून गेले पूरात उरल्या सुरलेल्यांना सैतानच मग पाहून गेले ढग फुटले नि कोसळला रात्रंदिवस धो धो ढळला किंकाळ्या मूक प्रेतांच्या ऐकून, पाहून तळमळला गुरे-ढोरे, जमिनी घरकुल आणि फुटके-तुटकेसे पूल जीव वाचूनही सारे गेले जसे एखादे कुस्करले फूल म्हणे 'कलयुग' आले कोणी कुणी सांगी भविष्य वाणी मला फक्त दिसत राहते भयाण पावसाचे पाणी आले उठून हात मदतीचे दिवस-रात देण्या साथीचे कोण-कुणाचे नाही तरीही 'आपला' या एका नात्याचे एकमेकांपासून होते दूर जोडी त्यांना हा  महापूर मदतीला जे पुढे धावते ते कोल्हापूर, ते कोल्हापूर  - ©रमा PC-The Hindu

मेघ पाहुनी बावरले..

मेघ पाहुनी, निळे सावळे बावरले कृष्णा, मी मेघ पाहुनी बावरले.. एक घटा, बरसुनी गेली ती मी पण पाणी पाणी झाले, रे कृष्णा, मी मेघ पाहुनी बावरले... मीरेच्या गिरीधर गोपाळा तव प्रीतीमुळेच सावरले, रे कृष्णा, मी मेघ पाहुनी बावरले.. . - रमा (माझी मीरा)

योगायोग..

मंगेश पाडगांवकर आणि कुसुमाग्रज दोघेही माझे आवडते.. पाडगांवकर अगदी प्रांजळपणे कबूल करतात की सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कवितांवर कुसुमाग्रजांची छाप आहे. १६ व्या वर्षी जेव्हा पाडगांवकरांच्या कवितेला नुकतेच धुमारे फुटत होते, कुसुमाग्रजांचा 'विशाखा' काव्यसंग्रह त्यांना तोंडपाठ होता. तसा तो पार सत्तरीनंतरही होता. कुसुमाग्रज 'धनुर्धारी' मासिकाचे संपादक असताना, पाडगांवकरांनी त्यांच्या ऑफिसात घुसून त्यांना आपल्या कविता वाचायला दिल्या.तिच्यावर कुसुमाग्रजांची छाप दिसत होतीच. असे2-3 वेळा झाले, कुसुमाग्रज प्रत्येकवेळी हसत..'लिहित रहा' म्हणत . धनुर्धारीच्या एका दिवाळी अंकात कुसुमाग्रजांची 'महाकालीस' ही क्रांतीचे आवाहन करणारी कविता छापून येणार होती, ती वाचल्यावर पडगावकरांनी त्यावर उत्तर म्हणून एक कविता लिहिली आणि कुसुमाग्रजांना दाखविली. कुसुमाग्रज नुसते हसले. आणि त्या वर्षीच्या दिवाळी अंकात दोघांच्याही कविता छापून आल्या.. पाडगावकरांच्या कवितेला मिळालेला तो एक विलक्षण सन्मान होता. ७० वर्षांचे असताना त्यांना पुन्हा एकदा कुसुमाग्रजांना भेटायचा योग आला. 68 ...

कहर

मी रोज उभी त्या ठरल्या जागेवरती तू रोजच द्यावा ना येण्याचा बहाणा मी अशी कशी रे रोजच ठरते वेडी तू साळसूद वर बनचुका शहाणा.. मी कलम चालवत कागदावर उतरावे दिवसाचे कुठलेही ना पहाता प्रहर तू द्यावी त्यावर दाद इतकी सुंदर मनी शब्दांचा निव्वळ माजावा कहर..

तुझा भास होतो

जरी जीवघेणी, फुले रातराणी तिला हुंगताना, तुझा भास होतो.. मनी कोरलेले तुझे शब्द ऐसे मला बोलताना, तुझा भास होतो.. कशाने नशा या पुऱ्या आसमंती उगा झिंगताना, तुझा भास होतो.. कुठे धून उठते, बिना ओळखीची मला डोलताना, तुझा भास होतो.. कथा माझी-त्याची ही नक्कीच आहे तिला सांगताना, तुझा भास होतो..

तरीही...

कुणी कुणाचे नाही, हेही माहीत असते, जपत राहतो उगीच काही नाती तरीही... दिवस असे हे कंठीत जातो केविलवाणे जगू पाहतो उदास काही राती तरीही... उन्मळून पडताना पाहून या झाडांना डोलत राहती गवती काही पाती तरीही... जळणे किंवा विझणे हेची प्राक्तन आहे माहित असूनी जळती काही वाती तरीही... समानतेचा डंका पिटूनी तिन्ही त्रिकाळी जगात खितपत राहती काही जाती तरीही...

ते काय म्हणतात...

देव,संत अन थोर महात्मे कशास म्हणतील आम्हा पूजा? आपल्यामधला जिंका दानव, भक्तीभाव मग नसे दुजा बंधुत्व, प्रेम,निस्वार्थ बाणवा, नको हार वा मुकुट,भोग दंभ, क्रोध, वासनाच हरतील, अशा गुणांना सदा भजा मानवता हा धर्म असावा, कशास त्यावर दंगल वाद षड्रिपूच जर वसणार अंतरी, कशास करता आम्हा खुजा???

सकाळ होई कातरवेळ..

असे काहीसे मळभ साचले, उरी अंधारा नुस्ता खेळ सकाळ होई कातरवेळ.. अवतीभवती वाट दिसेना, कशास नाही कसला मेळ सकाळ होई कातरवेळ.. टाकू पाहता डाव हातचा, सुरवातीसच फसला खेळ सकाळ होई कातरवेळ..

आजच्या पावसात..

कुण्या पावसाने किती मत्त व्हावे  तुझा स्पर्श होता पुन्हा वादळ यावे  फुलोरा फुलवा तन्मानातून साऱ्या  तुला पाहता चिंब त्यानेच गावे  नभांच्या पल्याडून असे शिडकावे आभाळी स्वप्नांचे किती हेलकावे निळाई रुजावी भूईच्या उराशी नि हिरवाईने लख्ख जन्मास यावे.. पुन्हा रंग-गंधात रमवून जीवा सरींतून या मी, तुझी भेट घ्यावी अंतरातून सार्‍या बरसून आणि  विसरून जावे जूने हेवेदावे..

सोबत..

थोडे झेलले चांदणे थोडी उन्हाची ही वाट घाटाघाटांतून कधी, कधी चाललो सरळ कधी मौनाचे अंतर तुझ्या-माझ्या प्रवासात चिंब चिंब झालो ओले कधी कोण्या श्रावणात कधी टपोरं चांदणं कधी ग्रासले ग्रहण मन वेडं गाव सदा जाई तुजला शरण बघ नवा ऋतु आला आज पुन्हा अंगणात गेली काळोखाची रात दारी नवी ही प्रभात..                                    

मेरे पास रहो ....

                                  मेरे पास रहो.. मेरे खास रहो ..  आज कही न जा..  मेरे साथ रहो ..  दिन का क्या है डूब जायेगा  वक्त ऐसेही बीत जायेगा..  मेरे जिस्म से परे, मेरे सांस से जुडे, मेरे दिल के करीब  मेरी प्यास रहो ..

असे कसे …

असा कसा रे तो वारा  धाव घेतो तुझ्याकडे  असा घट्ट मिठीसारखा  तुझ्याभोवती घाली कडे  असे कसे रे ते ऊन  तुला टाकते वेढून  गर्द झाडीतून नेमके  घेते तुलाच वेचून  असा कसा रे तो पाऊस  चिंब तुलाच भिजवी  तुझे तन, तुझे मन  साऱ्या साऱ्याला रिझवी  असे कसे … 

माझ्यात वास आहे ..

दाटून भोवताली, अंधार सावल्या ह्या  त्या दूरच्या दिव्यांचा, नुसताच भास आहे ..  लवलेश ना असावा, कुठल्याच वेदनेचा  ही व्यर्थ मृगजळाची, अतृप्त आस आहे ..  जो-तो दिसे स्वत:चा, सेवा असे स्वत:ची  कळले कधी न त्याला त्याचाच दास आहे ..  फिरले जगात साऱ्या, देवास भेटण्याला  बघता मनात कळले, माझ्यात वास आहे.. 

एवढे करच..

चाललास दूर तू, प्रवास एकटाच हा उभी अशी मी पाहण्या एकदा वळून जा थेंब थेंब सय तूझी वाहते, तनीमनी थांबून एकदा जरा, उरात साकळून जा जीव मीन जळविना होत आहे सारखा निष्पर्ण राईतून तू उगिच सळसळून जा मी पराभूत व्हायचे ठरविले आहे जरी आठवांच्या या रणी तूही तळमळून जा

हो की नाही??

का़जळ्लेले डोळे सुद्धा बरसतातच की कधी कधी मेंदी भरल्या हातांनी कधी का पाप नाही घडत? भरल्या पोटी, सुद्धा हाव भरतेच की कधी मनात मोकळ्या हवेत सुद्धा कधी जीव नाही का गुदमरत? बागांमध्येही फुले जातात कोमेजून कधी कधी मुर्ख माणसांवरती ही कधी जीव नाही का जडत? 'हो' की 'नाही', हे प्रश्न तसे अगदीच सोपे असतात न उलगडता तरीही ते वारंवार नाही का भेडसावत???

प्रार्थना..

उत्तमाचा ध्यास दे तू, प्रयत्नांची कास दे भक्ती, शुद्धी, संपन्नतेची आम्हा सदा तू आस दे मार्ग शोधू आमुचा, तू धैर्य दे, सामर्थ्य दे संघर्ष ही होती अहिंसक, एवढा विश्वास दे येतील ही कधी संकटे, त्या झेलण्या बळ खास दे जगणे माझे सार्थ व्हावे, एवढे मज श्वास दे सेवा घडावी योग्य तेथे, हेवा नको ही बुद्धी दे ध्येय अन परिपुर्णतेचा सदैव तू सहवास दे...

मन माझे..

मन स्वप्न, मन पक्षी मन चित्र, मन नक्षी मन तरंग, मन तराणे मन सूर, मन गाणे मन धुंद, मन भान मन थोर, मन सान मन दिवटी, मन मशाल मन अणू, मन विशाल मन झुंबर, मन झोका मन ह्रूदय, मन ठोका मन पावा, मन श्याम मन धावा, मन राम मन चंचल, मन लहरी मन गूढ, मन गहरी मन गिरकी, मन रिंगण मन तुळशी मन, मन अंगण मन माझे..

कधी होऊ..

कधी होऊया पक्षी आपण, अन उडूया आकाशी वार्‍यासंगे पैज लाऊया, मारू गगनभरारी कधी होऊया उनाड लाटा क्षितिज सागरावरच्या बिलगू चंद्राच्या प्रतिबिंबा, साठवून अंतरी कधी होऊया तरंग मनीचे, विचार सैरावैरा होऊ आपण कविता, कधी अन उतरू कागदावरी कधी होऊ आपण गाणे, अन होती स्वर हे रस्ते शब्द कोवळे ऊन अंगणी पोचवती मज घरी..

राधा प्यारी..

कान्हाच्या या अनेक गोपी तरी वाटते राधा प्यारी प्रेम सखी ती, प्राण सखी ती राधा, राधा, राधा न्यारी रंग रंगतो, खेळ खेळतो राधेला या छेड छेडतो रंगुनी साऱ्या क्रीडांमधूनी परी असे ही श्वेत बावरी राधेने त्या चंग बांधला छळतो मजला श्याम सावळा पाहतेच मी कसा राहतो माझ्याविन तो गोपमुरारी राधेवाचून कसल्या क्रीडा कसले गोकूळ, मनभर पीडा करमेना जीव कृष्णाचा हा राधेचाही प्राण उरावरी राधे सखये कृष्ण आळवी म्हणतो राधा, राधा प्यारी प्रेम सखी ती, प्राण सखी ती राधा, राधा, राधा प्यारी

वेड..

आज तीच आशा वेडी  तेच स्वप्न वेडे..  तोच हट्ट वेडा आणि  तेच वेड वेडे ..  वेड्या वळणावरी या  झाड जुने वेडे..  सडा फुलांचा वेडा  आणि गंध तेच वेडे..  वेड हळवे, वेड कष्टी, जीवनाचे अर्थ वेडे ..  वेड आता अन निरंतर  वेड शत्रू, मित्र  वेडे ..