शाळा सुरु होऊन २ महिने झालेले. पिकलपोनीनं या वर्षी एकदम शहाण्यासारखं वागून दाखवणार असं घरी कबूल केलं होतं. आणि त्याप्रमाणे ती वागतही होती.मागच्या वर्षी असंच ठरवलेलं काही कारणानी जसं फिस्कटलेलं ना, तसं यावर्षी बिलकुल होऊ देणार नव्हती ती.वेळच्या वेळी अभ्यास, कसला हट्ट नाही, दादूशी भांडणं नाहीत काही नाही. इतकी शहाण्यासारखी वागतेय म्हंटल्यावर सगळे पिकलपोनीचं कौतुक करतायेत,हे बघून दादुच्या मात्र पोटातच नाही, सगळ्या अंगभर दुखत होतं. इतके दिवस भांडण नाही म्हणून रु खरुख ही वाटायला लागली होती. ती अशी शहाण्यासारखी वागायला लागली की मग काय, सोसायटीत एकदम शांतता. एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता, सुट्टी होती, पिकलपोनी झोपीसोबत खिडकीतून पाऊस बघण्यात गुंगली होती. अचानक त्यांना कसलातरी आवाज आला. लक्ष देऊन ऐकलं तर एका भूभू चा आवाज, कुठून येतोय, कुठून येतोय त्या शोध घ्यायला लागल्या. आवाजाच्या रोखाने जात जात पिकलपोनी आली कार पार्किंग मध्ये. इकडे बघ, तिकडे बघ करता करता गाडीच्या खाली बघितलं, तर दिसलं एक छोटूलं, हाडकुळं, तपकिरी,पांढरं कुत्र्याचं पिल्लू. वाऊ..भावू ..वाऊ असे आवाज करत कुडकुडत होतं बिचारं . ...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..