शाळा सुरु होऊन २ महिने झालेले. पिकलपोनीनं या वर्षी एकदम शहाण्यासारखं वागून दाखवणार असं घरी कबूल केलं होतं. आणि त्याप्रमाणे ती वागतही होती.मागच्या वर्षी असंच ठरवलेलं काही कारणानी जसं फिस्कटलेलं ना, तसं यावर्षी बिलकुल होऊ देणार नव्हती ती.वेळच्या वेळी अभ्यास, कसला हट्ट नाही, दादूशी भांडणं नाहीत काही नाही. इतकी शहाण्यासारखी वागतेय म्हंटल्यावर सगळे पिकलपोनीचं कौतुक करतायेत,हे बघून दादुच्या मात्र पोटातच नाही, सगळ्या अंगभर दुखत होतं. इतके दिवस भांडण नाही म्हणून रुखरुख ही वाटायला लागली होती. ती अशी शहाण्यासारखी वागायला लागली की मग काय, सोसायटीत एकदम शांतता.
एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता, सुट्टी होती, पिकलपोनी झोपीसोबत खिडकीतून पाऊस बघण्यात गुंगली होती. अचानक त्यांना कसलातरी आवाज आला. लक्ष देऊन ऐकलं तर एका भूभू चा आवाज, कुठून येतोय, कुठून येतोय त्या शोध घ्यायला लागल्या. आवाजाच्या रोखाने जात जात पिकलपोनी आली कार पार्किंग मध्ये. इकडे बघ, तिकडे बघ करता करता गाडीच्या खाली बघितलं, तर दिसलं एक छोटूलं, हाडकुळं, तपकिरी,पांढरं कुत्र्याचं पिल्लू. वाऊ..भावू ..वाऊ असे आवाज करत कुडकुडत होतं बिचारं . पिकलपोनीला ते कुडकुडणारं पिल्लू बघून एकदम वाईट वाटलं, तिनं काहीही विचार न करता ते पिल्लू उचललं, आणि त्याला घरात घेऊन जायचं ठरवलं. तिनं झोपीला विचारलं, "काय करूया गं?'', झोपीच्या घरी आधीच ३ मांजरं होती, "अगं आमच्याकडे नाही चालणार, आमच्या मांजरानी आधीच उच्छाद मांडलाय."
मग काय? दादूशिवाय कोण वाली असणार या प्रसंगात? दादू अनेक वर्ष आई-बाबांच्या मागे लागलाय भूभू पाळण्यासाठी. त्याला भूभू खूप आवडायचे. त्याला कुत्र्यांच्या सगळ्या ब्रीड पाठ होत्या. कुत्रा पाहिला की तो कुठल्या ब्रीड चा आहे त्याला लग्गेच कळायचं. पण घरी पाळण्याची परवानगी मात्र त्याला काही केल्या मिळत नव्हती. दादूला कसं तयार करायचं, आणि हे पिल्लू घरी पाळायला, आईबाबांना कसं तयार करायचं हा सगळा विचार करत करत ती दादुकडे पिल्लाला घेऊन गेली. दादू तर पाहता क्षणी पिल्लाच्या प्रेमात पडला. त्यामुळे त्याला पटवण्यासाठी पिकलपोनीला जास्त श्रम घ्यावे लागलंच नाही. "पिकू, तू जरा आता गप्प बस. मी आईशी बोलून बघतो काय होतं ते", दादू म्हणाला.
एकदम गंभीर चेहरा करून दादू आईकडे आला. "आई मी काय म्हणत होतो, म्हणजे बघ तुला वाटलं तरच हा, म्हणजे तुला नाही का वाटत मी आता जबाबदार झालोय. पिकू सुद्धा शहाण्यासारखी वागते, म्हणून मग..", आईने बाबांकडे बघितलं, बाबांनी खांदे उडवले. दादुची गाडी पुढे सरकेना म्हंटल्यावर शेवटी बाबानी विचारलं, "काय हवंय?", दादू मागून पिकू आली हातात भूभू घेऊन, आणि पुढे केलं ते पिटुकलं पिल्लू. "कार खाली सापडलं. याला घर नाहीये. बघा ना कसं कुडकुडतंय", मागून झोपी आली, "काकू, मला वाटतं तुम्ही याला पाळा. माझी आई म्हणते, मुक्या प्राण्यांवर दया करा म्हणून. म्हणून तर आम्ही इना, मीना, डिका या ३ मांजरी पाळतोय ना". आई म्हणाली ''नाही''.. "दादू, पिकू किती वेळा सांगितलंय तुम्हाला? कुठलाही प्राणी, पक्षी घरी आणायचा नाही. अगं ए बाई चिखलात माखलंय ते पिल्लू, ने ते बाहेर आधी." आई ला पटवायचा खूप प्रयत्न झाला. बाबांकडे नुसतं बघितलं तरी ते लग्गेच खांदे उडवून, ओठ मुरडायचे.
पिकू म्हणाली, "आई, मी स्वच्छ करते ना याला. एकदम नीट. तू फक्त हो म्हण गं." आणि केविलवाणं तोंड केलं त्या पिल्लासारखं. आई ला काही पाहवेना. शेवटी ती म्हणाली, "खेळ वाटतो ना तुम्हाला हा सगळा? अरे त्याला घरी आणायचं म्हणजे सोपं काम वाटलं? त्याचं खाणं-पिणं, सू-शी, स्वच्छता, फिरायला नेणं हे सगळं कोण करणार? २ दिवस कराल आवडीने, आणि मग कराल टाळाटाळ. दादाश्री तुम्ही तर स्वतः रोज अंघोळ नाही करत, भूभू ला काय घालणार? त्याला डॉक्टर कडे न्यायचं, इंजेक्शन्स देऊन आणायचं, अरे लाख कामं असतात. आणि करायचं तर सगळं नीटच केलं पाहिजे. पिल्लू म्हणजे घरातलाच एक मेंबर, तुमच्या-आमच्या सारखा. तितक्या जबाबदारीने त्याचं सगळं करणं होणार आहे का?" तुम्हाला स्वतःची भांडण सोडवता येत नाहीत अजून, भूभू हवाय म्हणे. पिकू शेम्बूड तरी येतो का काढायला नाकातून तुला?" आईचा पारा वर वरच जायला लागला. "अहो, बघा काय म्हणतायेत ही मुलं बघा", बाबांनी परत खांदे उडवले. झोपी ला लग्गेच घरून हाक ऐकू आली. अशा आणीबाणीच्या प्रत्येक प्रसंगात तिला अचानक घरून हाक ऐकू येतच असते.
पिकूने सगळं ऐकून घेतलं, आणि मग एकदम केविलवाणा चेहरा करून ते पिल्लू आईच्या जवळ नेलं. "आई, बघ तरी एकदा, आम्ही सगळं करू याचं. तुला भुतांची दया येते ना?", तिला टपली मारून दादा मधेच पचकला, "भूतदया असतं ते पागल", त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत पिकूने ते पिल्लू आईच्या अजून जवळ नेलं. ते इतकं गोड होतं ना, टूण करून तिच्या हातातून खाली उतरलं, आणि आईच्या पायातच लोळण घेतली, आपले डोळे मिचमिच करत आईकडे पाहून "भाऊ, वाऊ, वाऊ..", असं केलं. बस्स, आई पाघळली. "अहो, तुम्हाला काय म्हणायचंय यावर?", शेवटी एकदाचं बाबांनी मौन सोडलं, "असू दे की गं, करू आम्ही सगळं त्याचं"
आई म्हणाली "ठीक आहे. पण याचं सगळं, सगळं तुम्ही तिघांनी करायचं. आणि घरातल्या माणसासारखं करायचं. कळलं ?" आई हसली. दादा इतका आनंदला, "आई, त्याचं नाही तिचं, मुलगी आहे ती". पिकूने तर आनंदून बाबांना मिठीच मारली. "आजच्या आज तिला दवाखान्यात नेऊन आणा, अशक्त दिसतेय, डॉक्टर काय म्हणतायेत बघा. बघशील ना दादू?", दादू म्हणाला "येस्स, येस्स,येस्स..आजच्या आज..मी आधी अंघोळ घालतो हिला, तू जरा दूध देतेस का हिला, आणि एक जुनं ब्लॅंकेट आहे बघ माझं ते आणतो हिच्यासाठी. आणि तो मोठा बॉक्स आहे ना tv चा त्यात घर करूया तात्पुरतं, पिकू म्हणाली, "तू बघ गं आई, तुला आमच्यावर भरवसा नाय काय?" सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहायला लागला. पिकलवर्ल्ड मध्ये नवा मेंबर अॅड झाला होता..
"अरे बाप रे, हिने शी करून ठेवली इथे, ही साफ कोण करणार?" आईने पिकू, दादू, बाबा सगळ्यांकडे बघितलं, सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि खांदे उडवले..
- रमा
Comments