"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे."
"अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो..
"ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली"
"काय विषय काय आहे?" - दादू
"दादू, पिकू या असे समोर बरं"
"आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?"
"2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत. तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच."
" अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो."
"तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठांतर सुधारावं, जिभेला वळण लागावं आणि पुढे जाऊन तुम्हाला त्यातलं तत्वज्ञान ही कळायला लागावं, म्हणून असतं ते. आवड लागेल तुम्हाला त्याची. सांग बरं पिकू काय शिकवलं आज?"
"गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता
पडता, रडता घेई उचलुनी कडेवरी"
"हम्म, आता हेच डोळ्यासमोर आणा बरं. ही जी गीताई आहे, ती तुमची आईच जणू. कधी कुठे पडलात, धडपडलात, तर आई कशी धावून येते, माया करते? जखम झाली तर औषध लावते! तसंच आहे ते. अगदी आईसारखी ही गीताई, आयुष्यात आपल्याला आईसारखा आधार देते. शिकवते. कळलं?"
"आई तू किती छान करून सांगतेस गं! पुढचं वाचायची इच्छा होते असं सांगितलंस की. काय गं पिकू, अध्याय आधी कुणाचा पाठ होतो लावायची काय शर्यत?"
"ती देवघरात जाऊन गीताई ला, हॅपी मदर्स डे म्हणतीये बघ."
- रमा
Comments