प्रिय सावित्री,
अज्ञान, कर्मकांड, वर्णभेद, जात-पात, बालविवाह, केशवपन,सतीप्रथा या कुप्रथांनी आणि समाजव्यवस्थेत पिचल्या जाणार्या बाईला, पुरुषाच्या आधाराशिवायही तिचं काही अस्तित्व आहे, हे तुझ्याकडे बघून वाटलं बघ..स्त्रिया आणि दलित यांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नवे कार्य तू सुरु केलेस. या सामाजिक परीवर्तनाच्या लढाईत आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे खर्च केलीस..अनेक आघात, छळ सहन करून विवाहोत्तर शिक्षण घेतलेस..देशाची पहिली महिला शिक्षिका तू, तू स्त्रियांना फक्त शिक्षण नाही ज्ञान दिलेस..असंख्य स्त्रियांना प्रेरणा देऊन शिक्षणक्षेत्रात आणलेस, तुझ्या वाड्यातली विहीर दलितांना खुली करून दिलीस, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलीस, शोषण आणि असमानता या विरोधात अनेक विवेकनिष्ठ चळवळींचा पाया रचलास. सत्यशोधनाचा आग्रह धरलास..आज तुझ्या स्मृतीदिनी मला सांग, एकोणीसाव्या शतकात, अस्पृश्यता, सतीप्रथा, वर्ण, लिंग,वंश, धर्म यांच्या आधारवर समाजात विषमता पोसणार्या समाजव्यवस्थेला छेद देणारी तू..कुठून आली तुझ्यात ही शक्ती?"ढोल, गवार, शुद्र, पशू, नारी, ये सब ताडन के अधिकारी" असे बेलाशक समजणार्या या संस्कृतीला तू आव्हान दिले तरी कसे? शोषितांच्या उद्धाराला स्वतःला वाहून घेतलेल्या त्या जोतीरावाची तू ज्योत, केवळ अर्धांगिनी नाही, तर पूर्णपणे त्यांच्या कार्याला साथ देण्याची प्रेरणा तुझ्यात आली कुठून? आज निव्वळ तुझ्यामुळे हे विचार शब्दरुपात मांडण्याचे सामर्थ्य आणि सवलत माझ्यासारख्या भारतीय स्त्रियांमध्ये आहे. आजही गर्भातच स्त्रीला संपवणार्या या समाजाशी लढायचे बळ मला दे, आत्मसन्मानाने जगण्याचे भान दे, समाजाचे ॠण फेडायचे मार्ग दे..
कोटी प्रणाम तुला..
तुझी,एक सावित्री
----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रिय सावित्री,
कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून नवर्याने हात उगारला आज माझ्यावर. "हीच मुक्ती अपेक्षित होती का? हाच विकास व्हावा म्हणून आयुष्यभर झटलीस तू? आमच्या उद्धारासाठी परत तूच का येत नाहीस जन्माला??" या सगळ्या विचारांनी अगदी खिन्न झालं माझं मन..पण मग म्हंटलं हे शोषण आपण डिसर्व करत नाही निदान इतका तरी दृष्टीकोन बदलला माझा. शिक्षणाने अनेक पर्यायी मार्ग आज माझ्यासमोर उपलब्ध आहेत. हे ही नसे थोडके..कुणी दुसरे माझ्या मदतीला यावे यापेक्षा मीच स्वतःला मदत करावी हा संदेश नकळत तुझ्या आठवणीतून माझ्यापर्यंत पोहोचला..
तुझी,
आणखी एक सावित्री
Comments