आज २६ जून. शाहू जयंती व भास्करराव जाधव यांची पुण्यतिथी. भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भास्कररावांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण मुंबईत झाली. डॉ. रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते. मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते. विद्यार्थी दशेत ते मुंबईच्या कामाठीपूऱ्यात सत्यशोधक समाजाचे द्रष्टे कार्यकर्ते रामय्या व्यंकय्या आय्यवारू यांच्याकडे सुमारे ३ वर्षे राहत होते. तेथील वातावरण सत्यशोधक समाजाच्या तत्त्वज्ञानाने भारलेले होते. भास्कररावांच्या व्यक्तिमत्त्वावर तेथे सत्यशोधक विचारांचे खोलवर संस्कार झाले . महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले.
भास्करराव एम.ए होऊन मुंबईत कायद्याच्या पदवीसाठी अभ्यास करत होते . तेव्हा पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. भास्काररावांचा संस्कृतचा गाढा व्यासंग होता आणि इतिहासाचेही त्यांनी आवडीने अध्ययन केले होते. माणसांची पारख आणि गुणग्राहकता या शाहू महाराजांतील दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. स. १८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली. बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते. पिढ्यान पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेला बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण हा मूलमार्ग आहे हे ओळखून महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यासाठी महत्प्रयास केले. त्यामध्ये भास्कररावांची मोलाची साथ लाभली.
बुद्धीप्रामाण्यवादी सत्यशोधक विचारांच्या भास्कररावांना मूर्तीपूजा अमान्य होती. परमेश्वर आणि भक्त यांच्यात पुरोहित या मध्यस्थाची,दलालाची गरज नाही, अशी त्यांची धारणा होती. 'क्षात्रजगद्गुरु' पद स्थापना व इतर काही मतभेद असूनही महाराजांचा त्यांच्या प्रती कसलाही किंतू नव्हता. त्यांच्याबद्दल आपुलकी थोडीही की झाली नव्हती . त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर ते बाळगून होते. शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली. या काळात त्यांनी नगराचा बराच कायापालट केला. शहर स्वच्छ्ता, सार्वजनिक आरोग्य, नागरी सुविधा, यांच्यात लक्षणीय वाढ झाली. कोल्हापूर शहराचा चेहरा-मोहर बदलला. ठिकठिकाणी सहकारी सोसायट्या, पतसंस्था यांची निर्मिती झाली, त्यातूनच सहकारी बँकांची निर्मिती झाली. आपल्या संस्थानातील सहकारी चळवळीचा भास्करराव जाधव हे आत्मा होते असे खुद्द शाहू महाराजांनी नमूद केले आहे.
शाहू महाराजांची परिवर्तनाची व्यापक दृष्टी व कृती असामान्य होती. दीर्घकालीन सहवासामुळे या व्यापक सुधारणावादी द्रष्टेपणाची छाप भास्कररावांवर पडलेली दिसते. करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.
राजर्षी शाहू महाराज व नामदार भास्करराव जाधव या दोघांनाही भास्कररावांच्या या पणतीकडून मानाचा मुजरा...
(२६ जून, २०१४)
Comments
Your Marathi is impeccable. Far chan lihites!
मनोरंजनासह प्रबोधनासाठी...
रयत समाचार, अहमदनगर
ज्ञानदीप लावू जगी...
https://drive.google.com/file/d/19qM9DRoNCtcUeSxWsivzr8BgYtraSb3F/view?usp=drivesdk