Skip to main content

पिकलपोनी

एक होती पिकलपोनी..गोबरे गाल, नकटं नाक,अतिशय हट्टी..नाकावर राग..आई-बापूची एकदम लाडकी. एकदा तिने बापूजवळ धरला हट्ट, "मला बाहेर घेऊन जा, जा म्हणजे जा.. आत्ताच्या आत्ता.. "
बापू पण लग्गेच तय्यार. म्हणाला, "चल, पटकन तयार हो, निघूया.. " 

आई म्हणाली, "अहो, आता अंधारून आलय, आता कशाला जाताय ?.. अगं पिकलपोनी उशीर झालाय आता, आता उद्या जा हा" .

आई असं म्हंटल्यावर बापू जरा डळमळला, "हो, हो, उद्या जायचं का मग आपण?"

पिकलपोनीने गाल फुगवले, डोळे मोठ्ठे केले, ओठांचा चंबू केला (नेहमीप्रमाणे) एक हात कमरेवर आणि एक पाय तालावर आपटत आपलं पेटंट गाणं सुरु केलं.. 
"जा बाबा बापू, असच कर तू.. सगळे असच करतात.. माझे कुणीच लाड नाही करत. जा बाबा. . "

शेवटी आई म्हणाली "जा बाई, जा. .  पण लग्गेच परत यायचं. . पाण्याची बाटली घेउन जा बरोबर, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर.  गप घरी वरण-भात खायचा. आणि दादालापण न्या सोबत. अभ्यास केलाय त्याने दिवसभर. पिकलपोनी पटकन तयार झाली आणि बापू, पिकलपोनी आणि पिकलबंबू यांची स्वारी निघाली फिरायला. . 

फिर-फिर फिरले. . आणि मग तिघांनाही लागली भूक (नेहमीप्रमाणे). . ते गेले राजभाऊ कडे, भेळबीळ खाल्ली, मग सुरेख लस्सी वाल्याकडे शिरून ३ ग्लास लस्सी रिचवली. तिथून निघतात तोच त्यांना दिसला एक फुगेवाला. . 
"लेलो, लेलो, गुब्बारे. . रंगीन, हसीन गुब्बारे. . हरे, निले. पिले, लाल, लेलो लेलो गुब्बारे". . . 

पिकलपोनीने हळूच दादूकडे बघितलं. त्यानेपण मानेने हळूच होकार दिला. दोघांनी एकदम पुकारा केला. . 
"बापू द ग्रेट, आपण घेऊया ना हो प्लीज गुब्बारे. ."

बापू म्हणाला, "ए आता आई ओरडेल हा. . भेळ काय, लस्सी काय. . आता काय तर म्हणे फुगे. . दादू तू तर मोठा आहेस ना? हा काय वेडेपणा, बास झाला आता " 

पिकलपोनी आणि दादू वस्ताद बहीणभाऊ.दोघांनी केविलवाणे चेहरे केले (नेहमीप्रमाणे). बापूला अगदी पाहवेना. त्याने दोघांना दोन फुगे  घेउन दिले. "चला आता लवकर, नाहीतर आईचा फुगा फुटेल." तिघे हसत हसत घरी जायला निघाले. 

अचानक पिकलपोनीचा फुगा सुटला आणि ती बापूचा हात सोडून लागली की पळायला..बापू ओरडतोय, "थांब, थांब" ..दादू ओरडतोय, "थांब, थांब". . पण ही शहाणी कुठली ऐकतेय. . 





शेवटी फुगाही हरवला आणि पिकलपोनीपण . आता लागली रडायला.. भ्याSSS करून. रडता रडता एका बाकावर बसून झोपून गेली. तिथं आली काही मुलं, म्हणाली, 

"हरवलीस का? बरं झालं. . 
चल, ये आमच्या देशात. 
वेडी-वाकडी आमची चाल, 
गाण्यांना नाही आमच्या ताल.. 
अभ्यास आम्हाला चालत नाही, 
मोठ्यांचं आम्ही ऐकत नाही . 
पण आमच्या देशात असते मजा,
न कुठले बंधन, न कुठली सजा" .. 

पिकलपोनी गेली हरखून. तिला वाटलं जावं यांच्या देशात. ती गेली त्यांच्यासोबत नाचत त्यांच्या देशात. तिथे खरच मजा होती. ओरडायला कुणीच नव्हतं. नुसते खेळ. . नुसता खाऊ. 

पण चारच दिवसात पिकालपोनी कंटाळली. तिला दादू आठवला. आई-बाबा आठवले. घर आठवलं. ती लागली रडायला. पण हे लोक कुठले तिला सोडायला तयार. . ती अगदी घायकुतीला आली. गयावया करायला लागली. "प्लीज, प्लीज सोडा हो मला, माझी वाट बघत असतील घरी सगळे. " 

शेवटी आला एक म्हातारा, "हे बघ पिकलपोनी , हा मंत्र घे, तुला हवं ते मिळेल, पण तसं वागायला पण लागेल."
ती म्हणाली हो, हो, तुम्ही सांगता तस्सच करेन मी. 
तीने डोळे मिटले आणि म्हणायला लागली , 

जंतर-मंतर, जादू कलंदर,
सोडणार नाही बापूचा हात 
करणार नाही कसलाच हट्ट 
गप खाणार वरण-भात 
          मी आहे पिकलपोनी, भाऊ माझा दादू, 
                                                    घरी पाठवा माझ्या मला, रडतोय माझा बापू 

डोळे उघडून बघतेय तर काय? ती होती स्वता:च्या घरात. आपल्या खोलीत. आपल्या पलंगावर चक्क. बापू उठवत होता तिला, 
"कित्ती वेळ झोपणार, चला, उठा बाब्या, जाउया न फिरायला? "
पिकलपोनीने आई-बापू आणि दादुला घट्ट मिठी मारली (नेहमीप्रमाणे) आणि म्हणाली.. "जाऊया. पण आता मी मुळीच हट्ट करणार नाहिये." सगळे हसले, आणि पुन्हा मिठीत शिरले. 

आता तेव्हापासून पिकलपोनीनं अगदी शहाण्यासारखं वागायचं ठरवलंय! बघू आता किती जमतंय!! 



Comments

Ru2ja said…
Kon hi Pikalponi?? Rama ka?
Kuthun itki chan nava suchtat?
sukhada said…
Khuuupch god, niragas ani chan :)
जंतर-मंतर, जादू कलंदर,
सोडणार नाही बापूचा हात
करणार नाही कसलाच हट्ट
गप खाणार वरण-भात
मी आहे पिकलपोनी, भाऊ माझा अगडबंबु,
घरी पाठवा माझ्या मला, रडतोय माझा बापू जंबू ...<<<
किती बरे झाले असतेना असा एखादा मंत्र बोलले कि हरवलेली नाती परत भेटली असती तर ……!!!


"पिकलपोनी.."
हि एक सुंदर "बाल कथा " आहे !

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

'Untagged New year'

I watched the series ' Untag' on Voot just now. And I just unserstood, yes! This is what I need to do! Untag myself. It doesn't matter, how people look at me, judge me or tag me.. Be it 'Bechari', 'Fat', 'Poor thing', 'patient' or blah.. first I need to free myself from these tags! I have loving parents, caring relatives, harami friends who are never there when you need them.. of course they all love me. They'll always do. But I realize now that I in the first place need to love myself! I used to think life has taken away blooming years of my life but then I realized life doesn't give you anything but chances.. You have to give something to life. You owe a lot to life! The best of you. New year resolution, enjoy life, come what may.. So dear Jindagi, here I come babyy - Rama..