Skip to main content

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"



आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'.

गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये. 

चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते. 

चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो. 

चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्याचसाठी चित्रपटात आहेत. चित्रपटातली गाणी, पात्रं, प्रसंग काहीही घुसडल्यासारखं वाटत नाही. सगळ्यात सहजता आहे. एखाद्या सराईत न्यूड मॉडेलने कपडे उतरवावेत इतकी.

यमुना (कल्याणी मुळ्ये) आणि चंद्रक्का (छाया कदम) यांचा सहजसुंदर अभिनय, सगळ्या भाव-भावना अगदी खऱ्या. एकदम काळजाला हात. कुठेही overacting नाही. जीवाची कुतरओढ असेल किंवा लहानसं हसू, या दोघींनी कहर केला आहे. जयराम। (ओम भूतकर) ची भूमिका लहान पण supporting. लहान-लहान प्रसंगातून यमुनेचे आणि त्याचे नाव न देता येण्यासारखे नाते. मस्त उभं केलं आहे त्याने. 

दिग्दर्शकानी असा संवेदनशील विषय न्यूड्सवरच्या एखाद्या कॉफी टेबल बुक ची पानं पुन्हा पुन्हा चाळावीत आणि तरी मन भरू नये असा मांडला आहे.

'स्त्री' म्हंटलं की एक भोगवस्तू आणि वय, नाती यांच्या पलीकडे जाऊन तिची निर्मिती जणू भोगण्यासाठी झालेली आहे ही मनोवृत्ती, विकृती आपल्याकडे अजूनही ठसठसली आहे. डॉक्टर्सना देह अभ्यासावे लागतात. मग कलाकारांनाही अभ्यास म्हणून देह रचना समजून घेणं किती आवश्यक  असतं हे कसं नाही कळत so called 'संकृती रक्षकांच्या'? 

या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी मोठं वादंग माजवलं. कशासाठी? आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून जगभर अभ्यासल्या जाणाऱ्या कामसूत्राचा, खजुराहो सारख्या वास्तू रचनांचा या लोकांनी अभ्यास केलाय का कधी? 

मी म्हणेन संस्कृती जतनाच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या संस्कृतीच्या बलात्काऱ्यांनो जरा नग्न व्हा, दांभिक, दुटप्पी, हिंस्त्र विचारांची वस्त्र उतरवून नग्न व्हा. पाहा स्वतःकडे. मुक्त व्हा... शेवट पद्मा लक्ष्मी यांच्या एका quote ने like me better naked. I don't mean that in a vain way... When you put clothes on, you immediately put a character on. Clothes are adjectives, they are indicators. When you don't have any clothes on, it's just you, raw, and you can't hide.
–------------------------
Raiting- 4/5 जरूर पाहा. 

- रमा जाधव


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...