Skip to main content

मंत्र : एक विचारमंथन

आत्ता 'मंत्र' पाहून आले. चित्रपटाचा नायक निरंजन (सौरभ गोगटे) याच्या घरी पिढीजात पौरोहित्य हा व्यवसाय आहे. वडील, काका, थोरला भाऊ देखील हेच काम करतात. याला जर्मनीत देवळात पुरोहित म्हणून जाण्याची संधी मिळते, तो वडिलांकडून धर्मविधींचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ लागतो. दुसरीकडे नायिका अंतरा (दीप्ती देवी) ही नास्तिक आहे. तिचा कर्मकांड, रुढींवर राग आहे. तिचे धर्मविषयक विचार, निरंजनचे मित्र, त्यांचे विचार, धर्माचा राजकारणात चाललेला चुकीचा वापर या सगळ्यात निरंजन गुरफटलेला आहे. घुसमटतो आहे. प्रयत्न करूनही त्याला व्यक्त होता येत नाही आहे.आस्तिक-नास्तिक भेद, धर्मविधी यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 

कथा, पटकथा, दिग्दर्शन हर्षवर्धन यांचे असून पहिल्याच प्रयत्नात त्याने असा मोठा संवेदनशील विषय हाताळणे बऱ्याच अंशी साध्य केले आहे असे म्हणता येईल. 

मनोज जोशीने एक संयत, विद्वान पुरोहित पंत साकारले आहेत. निरंजनला (आणि आपल्यालाही) पडलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतात. देव या संकल्पनेवर प्रकाश पाडतात, हे त्यानी छान साकारले आहे. सौरभ, दीप्ती प्रमाणेच पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर एकबोटे यांचाही सहज सुंदर अभिनय यात आहे. 

बाकी चित्रपटात गाणी घुसडण्याची काही गरज नव्हती. हर्षवर्धनने शिवधनुष्य पेलले आहे खरे, पण एक नवखेपणा आहे तो लपत नाही. मी 'ठीकठाक' शेरा देईन या सिनेमाला. पण विचारमंथनासाठी एकदा जरूर पाहा 'मंत्र'..

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...