Skip to main content

अस्तु: So be it !



अस्तु पहिला!! आणि खूप काही देऊन गेला मला हा चित्रपट...

अस्तु कथा आहे प्राध्यापक शास्रींची. संस्कृतचा गाढा अभ्यास असलेला, अनेक संस्कृत वचने, सुभाषिते ज्यांना मुखोद्गत आहेत, ज्याला ताओचे तत्वज्ञान ज्ञात आहे असा , एकेकाळी शब्दप्रभु म्हणून नावाजला जाणारा मोठा पंडित, 'मी कोण' याचेही उत्तर विसरतो.


अस्तु कथा आहे अल्झायमर्स या व्याधीनं व उतारवयानं ग्रासलेल्या त्या प्राध्यापक शास्त्रींची उर्फ आप्पांची...ज्याच्या स्मृती फिक्या फिक्या होऊन आता स्मृतिपटल म्हणजे निव्वळ कोरा कॅनव्हास उरला आहे..ही कथा आहे त्यांच्या कुटुंबियांची, प्रियजनांची जे या रुग्ण वृद्ध बापाला सांभाळण्याच्या वेगळ्याच विचाराच्या गर्तेत आहेत.. त्यांना एखाद्या रुग्णालयात किंवा संस्थेत ठेवावं का, या डायलेमा मध्ये अडकले आहेत.. त्यांच्यातला कितीसा अंश त्यांचा स्वतःचा उरलेला आहे आणि किती एखाद्या पूर्णपणे अनोळख्या व्यक्तीचा आहे या संभ्रमात आहेत.


अप्पा एक दिवस रस्त्यात गर्दीत हरवतात, एका हत्तीला पाहून उत्सुकतेने त्याच्या मागोमाग फिरायला लागतात. हत्ती, जो आपल्या स्मरणशक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या पाठीमागे हा ओळख हरवलेला माणूस भटकत राहतो यात बरेच काही उमजते.


कथेचा गाभा अल्झायमर्स हा आजार असला तरी तो अनेक आठवणींच्या पायावर उभा आहे. अनेक आठवणींच्या स्मृतीतून उलगडत जाणारा भूतकाळ, आणि त्यात उलगडत जाणारे शास्त्री ..नात्यांची बंधने, दडपणे त्यात जीवाची होणारी घुसमट, शंका, पूर्वग्रह याने पिचलेली मनस्थिती अशा सर्वसाधारण कुटुंबासारख्याच समस्या..


या हत्तीमागे जात जात हत्तीचा माहूत(नचिकेत पूर्णपात्रे), त्याला घरी आणतो..त्याची बायको चन्नम्मा(अमृता सुभाष) त्यांच्यात देवही पाहते आणि लेकरूही..आणि गरीब असून आपल्या घासातला घास देते, प्रेमाचा वर्षाव करते. लहानपणीच आई-बापाचे छत्र हरवलेल्या शास्त्रींना आपल्या मुलींच्या वयाच्या चन्नम्मात 'आई' दिसते..


आता या सर्वांत 'आप्पांचा शोध' अशी ही कथा. डॉ. मोहन आगाशे स्वतः मानासोपचार तज्ज्ञ असल्याने त्यांनी आपल्या भूमिकेला खूप बारीक अभ्यासपूर्वक न्याय दिला आहे. मोठी मुलगी इरा (इरावती हर्षे) साकारताना वडिलांची काळजी घेताना होणारी ओढाताण, फरपट, बहिणीबद्दल सूक्ष्म असूया, गैरसमजाने वडिलांबद्दल अढी, आपल्यामुळे ते हरवले याचा भयानक गिल्ट तिने सुंदर साकारला आहे. तिच्या संयमी नवऱ्याच्या भूमिकेत मिलिंद सोमण, रॅशनल बहीण देविका दफ़्तरदार, अप्पांचा केअरटेकर(ओम भूतकर) व कलीग (इला भाटे) यांनीही छोट्या छोट्या भूमिकेतून खूप काही साकारले आहे..


अत्यंत सुंदर दिग्दर्शन, पटकथा, संवाद, अभिनय यासोबतच 2 राष्ट्रीय पुरस्कर असूनही अस्तुला कोल्हापुरात एकाच थिएटरात, केवळ एकच खेळ मिळतो?? वाईट आहे हे...पण मग हा चित्रपटच सांगतो!! अस्तु! So be it....


- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...