Skip to main content

'व्हेंटिलेटर आणि मी'

'व्हेंटिलेटर'...ICU किंवा IICU च्या बाहेर  चिंताक्रांत, जीवाचं रान, डोळ्यात प्राण आणून, जाणून घ्यायला आतुर, पेशन्ट कसा आहे?? किती तरी जण नातेवाईक, मित्रमंडळी..अगदी सोमेे-गोमे सुद्धा..

पेशन्ट च्या प्रत्येक श्वासाबरोबर वर-खाली होणारा त्यांचा श्वास..कुणाचे बदलणारे भाव, कुणाच्या नवीन श्रद्धा/अंधश्रद्धा.. कुणाचे अजब सल्ले..हॉस्पिटल सारख्या जागी वागणारी माणसे, डॉक्टर्स..सिस्टर्स, ब्रदर्स.. काय करावं?? काय करावं?? 'अब इन्हे दवोंकी नही, दुवाओंकी जरूरत है' टाईप काहीसं सांगितल्यावर जवळच्यांनी मोठ्याने किंवा मनोमन फोडलेला टाहो..
काचेच्या आत असलेला आपला सगा, डॉक्टरी भाषेत केवळ पेशन्ट असतो..अशा शेकडो केसेस त्यांनी हाताळल्या असतात की त्यांची मनं खूप तय्यार असतात 'पेशन्टच्या हर तऱ्हेच्या रिस्पॉन्स साठी'..

 मला कल्पना आहे या सगळ्या अग्निदिव्यातून आपले नातलग, मित्रपरिवार जात असतात, कुठं तरी अंधुक आशा असते, व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे सगळं संपलं असं नाही..अजून चान्स आहे..2012 मध्ये काही लोकांनी तो चान्स घेतला आणि आज ती व्हेंटिलेटर वर ठेवलेली मुलगी 'व्हेंटिलेटर' सिनेमा पाहून भारावून हे सगळं लिहितेय.. Thanku for keeping faith and taking chance, मला हा दुसरा जन्म देण्यासाठी..
लोकहो, ये जरा पर्सनल हुआ..But माझ्याच्याने नाही राहवलं..खो खो हसले, धो धो रडले (मला आवडतं तसं)... चित्रपटात जसे विविध मानवी स्वभावदर्शन चित्रित केलंय, आणि त्यांचे बंध उलगडून दाखवलेत त्याला तोड नाही.. जीर्ण झालेल्या नात्यांना सुद्धा कधी कधी व्हेंटिलेटर वर ठेवायची पाळी येते, बंध किती घट्ट आहेत आणि त्याने घुसमट तर नाही होत ना हे वेळोवेळी चाचपावं लागतं.. मानापमान बाजूला ठेवून जीव फुंकावा लागतो नात्यात, जसा शरीराला व्हेंटिलेटर जोडावा..

राजेश मापुस्कर दिग्दर्शित, 'व्हेंटिलेटर' सिनेमा नक्की पहा..
(टीप- हे चित्रपट परीक्षण नाही)

- रमा


Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...