पंजाबमधील ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुण मंडळी, अमली पदार्थांची तस्करी, सध्याच्या पिढीलाच पोखरणारं नार्को पॉलिटिक्स या सगळ्यांचं चित्रण 'उडता पंजाब' सिनेमात पाहायला मिळतं.
आपल्या गाण्यांतून नशा, हिंसा ग्लोरिफाय करणारा, स्वतःही ड्रग्जच्या आहारी गेलेला तरुण रॉकस्टार टॉमी सिंग (शाहिद कपूर) , ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात अडकलेली एक बिहारी तरुणी कुमारी पिंकी (आलिया भट), अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांवर उपचार करणारी डॉक्टर प्रीत (करीना कपूर), आणि पोलीस अधिकारी सरताज (दिलजीत) ही उडता पंजाब ची प्रमुख पात्रं योगायोगाने, वेगवेगळ्या संदर्भाने एकत्र येतात. एकीकडे सरताज आणि प्रीत ड्रॅग रॅकेट व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले आहेत हा एक ट्रॅक तर एकीकडे ऐन तरुणाईत ड्रग्जमुळे स्वतःची स्वप्ने पिचलेले टॉमी आणि पिंकी, यांचीबस्वतःची स्वतःशी लढाई हा एक ट्रॅक आहे. मधेच भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा आणि झिंगून भोगणारी तरुणाई असे ट्रॅक या सिनेमात येतात.
चित्रपटातील अतिशिवराळ भाषेमुळे, काही बाबी अश्लील (म्हणजे नेमकं काय काय?🤔) भासल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अनेक 'कटकटिंग' नंतर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खुला झाला. पण खरं सांगायचं तर ती भाषा म्हणा किंवा नशापाण्याच्या जगात हरवलेली पात्रं म्हणा, हे सगळं वास्तव आहे. कितीही कटू असलं तरी आजच्या तरुण पंजाबचं हे सत्य स्वरूप आहे. चित्रपट काही ठिकाणी अंगावर येतो, पण म्हणूनच अमली पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम ठळकपणे, विदारकपणे मांडले जाता येतात.
दिलजीतने पोलीसाची भूमिका, त्याच्यात झालेले बदल छान साकारले आहेत. 'प्रीत' च्या भूमिका खूप महत्वाची भूमिका असूनही करीना हवी तितकी लक्षात राहत नाही. शाहिद आणि आलियाने एक नंबर, अफलातून अभिनय केलेला आहे. (हाच शाहिद 'पद्मावत' मध्ये पूर्ण चित्रपटभर बद्धकोष्ठ झाल्यासारखे भाव घेऊन कसा काय वावरतो हा प्रश्न पडतो). इथे त्याने तुफान माजवलाय, आग ओकलीये. आलिया आणि त्याचे प्रसंग तर इतके लाजवाब झाले आहेत की हे दोघेही बेशक गुणी कलाकार आहेत याची प्रचिती येते. आलियाने 'हायवे' पेक्षाही या सिनेमात कम्माल केली आहे. असंख्य घाव झेलून, घात पचवूनही 'टुटे नाही है हम' हे ती पिंकी म्हणून बोलते तेव्हा शहारा येतो. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व तिने सहजपणे साकारलं आहे.
अभिषेक चौबेचे दिग्दर्शन, अमित त्रिवेदीचं संगीत सुरेख. 'इक कुडी' हे गाणं तर माझं 2017 च्या आवडत्या गाण्यांपैकी एक. भारदस्त पार्श्वसंगीताचाही उल्लेख करावासा वाटतो. मधेच जेंव्हा सिनेमा संथ होतोय असं वाटतं तेव्हा पार्श्वसंगीत त्याला गती देतं. तर चित्रपटातील शांतता तुमचं काळीज चिरत जाते.
आलिया आणि शाहिद साठी तर हा सिनेमा पाहवाच, मी तर म्हणेन की लोकांनी विशेषतः तरुणांनी हा चित्रपट अशासाठी बघावा की त्यांना कळावं, काही क्षणांची धुंदी कित्येकांचं जीवन उध्वस्त करणारी असते. ड्रग रॅकेटमुळे कित्येक जणांचं शोषण अजूनही चालू आहे.
चित्रपटाची लांबी जरा कमी केली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. सिनेमॅटोग्राफीही दिलखेचक आहे. टीव्हीवर मध्ये मध्ये ads येतील आणि लिंक टुटेल. हा लक्ष देऊन पाहायचा सिनेमा आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर आहे. (नेटफ्लिक्स घेतल्यापासून त्याचीच लाल करत आहे सध्या). एकदा तरी जरूर पाहा, 'उडता पंजाब'..
- रमा
- रमा
Comments