अंधाधून:- हवीहवीशी अंदाधुंदी
आत्ता अंधाधून बघून आले..
नाटकाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात जर भिंतीवर बंदूक दाखवली, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडलाच पाहिजे. नाहीतर ती दखवण्याचं प्रयोजन काय? (*Bertolt Brecht, Chekhov and others)
एका लाईन मध्ये अंधाधूनची कथा सांगायची तर, एक तरुण प्रतिभावान 'अंध' पियानो आर्टिस्ट एक खून 'पाहतो'. आणि मग सुरू होते थरारक घटनांची मालिका. एक थ्रिलर असूनही दिग्दर्शक 'श्रीराम राघवन' यांनी बुफे सारखं, कुणाचा खून झाला, कुणी केला, कसा केला, का केला? सगळं वाढून ठेवलं आहे. काहीही प्रेक्षकांपासून लपलेलं नाही. आणि तरीही अत्यंत अनपेक्षित, वेगवान, उत्कंठावर्धक हे रहस्यपटाचे सारे गुण आपल्याला अनुभवायला मिळतात.
गुणी कलाकार आयुषमान खुराना याने त्याची versatility इथेही जपली आहे, राधिका आपटे तिच्या नेहमीच्या बिनधास्त अवतारात आहे. छाया कदम( सैराट, न्यूड फेम), अश्विनी काळसेकर, मानव वीजे, अनिल धवन लहान लहान भूमिकांत भाव खाऊन जातात. एकदम नैसर्गिक.
आणि तब्बू.. एक नंबर..Cold blooded, जहरी, दुटप्पी आणि चित्रपटात एक पात्र म्हणतं त्याप्रमाणेच 'बेक्कार औरत' अप्रतिम साकारली आहे. अगदी सहजतेने.
खुनासारख्या गंभीर विषयावरील चित्रपटातही नर्म विनोदाचा शिडकावा, एक साधी आणि सुरेख डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी ही फिल्म.
सिक्स
अप्रतिम पटकथा व संवाद, अमित त्रिवेदी चे बेधुंद करणारे संगीत. 'नैना दा क्या कसूर', 'आपसे मिलकर', 'वो लडकी' ही गाणी श्रवणीय आहेत, पियानो पिसेस तर खूपच आल्हाददायक आणि प्रखर आहेत.
चित्रपटाची सुरुवात चुकवणारे, चित्रपट सुरू असताना फोन बघत असणारे, सतत पापणी लवण्याचा प्रॉब्लेम असलेल्यांनी हा चित्रपट न पाहणे बेहतर. त्यांना यातल्या सॉलिड धक्कातंत्राचा मजा घेताच येणार नाही.
पण बाकी लोकहो जरूर बघा, आणि मग माझ्या पोस्टच्या सुरुवातीचं ज्ञान चित्रपटाशी किती संबंधित आहे कळेलच, असला जबराट बार उडालेला आहे. आणि शेवटी जसे या चित्रपटात सांगितले आहे,
"What is life? It all depends on the liver" अगदी तसंच "What is the suspense? It all depends on the viewer"..
- रमा
Comments