पुलंचं बायोपिक म्हणजे अक्षरशः अशक्य वाटलं होतं. पण
टीजर आवडला आणि काहीही झालं तरी बघायला
जायचं हे ठरवलंच होतं. घरी पु.लविषयक काहीही म्हणजे 'घरचं कार्य', त्यामुळे खोकला, कणकण, निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सगळे प्रॉब्लेम असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलेच. आणि सोबतीला मंडळीही तगडी. सगळ्यांनी भाई, भाईकाका जवळून पाहिलेले, अनुभवलेले अशी माणसं सोबत घेऊन सिनेमा पाहिला.
एखादा माणूस आवडता कलाकार किंवा पब्लिक फिगर म्हणूनच नाही तर जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आले खरंतर. चित्रपटाचं कास्टिंग चांगलं झालं आहे. सागर देशमुखचा खरेखुरे पु.ल साकारण्याचा प्रयत्न अगदीच कौतुकास्पद आहे. अगदीच कमाल. तसेच इरावती हर्षेनी तरुणपणीच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. पुलंचं बालपण ते तरुणपण या चित्रपटात उलगडून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यांची वैविध्यपूर्ण शैली, भाषेवरचं प्रभुत्व, निकोप, मार्मिक विनोद याचा प्रत्यय पावलोपावली येतो. यातले सगळे प्रसंग आधी लिखित, ऐकीव स्वरूपात असूनही कंटाळा असा कुठे येत नाहीत. पुलंचे विनोद, किस्से कधी शिळे होतच नाहीत, त्यामुळे संवादलेखनकाराला इथे फार काही डोके चालवावे लागले नाही. सगळं काही रेडी टू ईट अन्नासारखं. फक्त कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे हे कळलं म्हणजे झालं. उतारवयातील सुनीताबाईंच्या भूमिकेत शुभांगी दामले अतिशय योग्य वाटतात.
संगीत, रंगभूमी, चित्रपट, साहित्य या साऱ्यात सारख्याच तन्मयतेने रमणारा आणि दुसऱ्यांना आनंद वाटत जाणारा, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणारा भाई, वैयक्तिक आयुष्यात कसा होता यावर हा भाग प्रकाश टाकतो. सतत कलाविश्वात मग्न, दर्दी, मित्रांच्या गराड्यात मश्गुल असणारा, खट्याळ, विनोदी वल्ली. सुनीताबाईंपेक्षा अगदी विरोधी स्वभाव असल्यामुळेच त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे होते? प्रत्येक माणसात एक लहान मूल दडलेलं असतं. कालांतराने त्याच्यातला निरागसपणा जाऊन व्यवहाराचे जोडे पडून तो कठीण बनत जातो तसं पुलंचं नव्हतं. त्यांच्यातलं लहान मूल कायमच त्यांच्यातच दडलेलं राहिलं. वेळोवेळी ते तोंड वर काढत असे. पण या अशा अजब व्यक्तीला नवरा म्हणून सांभाळणं फार फार अवघड. सुनीताबाईंनी अशा बाबतीत त्यांना सांभाळून घेतलं, आईसारखं प्रेम दिलं आणि कठोर समजुतीच्या गोष्टीही वारंवार सांगितल्या. हे सारं करताना त्यांनी तक्रारीचा सूर लावला नाही, त्यांनी सगळ्या कळा सोसून, अंगी नाना कळा असलेल्या या अतरंगी बालकाला स्वीकारलं अगदी प्रेमाने.
बारीक बारीक भूमिकेत आपल्याला माहीत असणारी इतकी मंडळी येउन जातात की ज्यांना ती माहीत नाहीत त्यांना संदर्भ लागणं अवघड जाईल. म्हणजे बा.सी.मर्ढेकर, चिंतामणराव कोल्हटकर, म.वि.राज्याध्यक्ष, राम गबाले, बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल या व्यक्ती तर येतातच. रावसाहेब, नाथा कामत सारख्या वल्लीही येतात. (महेश मांजरेकरला अर्धा मिनिट का होईना, स्क्रीनवर यायचेच होते म्हणून तोही येतो, अशा वेळेस त्याला 'बाबारे..का??असे विचारावेसे वाटते, पण... असो!!).
अशा वेळेस सगळे मुद्दल माहीत असेल तरच व्याजाचा मजा घेता येऊ शकतो.
संगीताच्या बाबतीत सिनेमा अतिशय उत्कृष्ट. भीमसेन, कुमार, वसंत या त्रिकुटाच्या स्वरांना, भाईच्या पेटीची साथ ऐकताना अक्षरशः डोळे भरून आले. राहुल देशपांडे, भुवनेश कोमकली, जयतीर्थ मेवंदी या आजच्या पिढीच्या शास्त्रीय गायकांच्या सुरेल गायिकीने जुन्या काळच्या मैफिलींची झलक दिली आहे तीही इतकी प्रभावी की जवाब नाही.
आता काही त्रुटी आहेत, जसं की 'आठ आण्यातील लग्न' या सुनीताबाईंच्या लेखात त्यांच्या झटपट विवाहाचे वर्णन आहे. चित्रपटातल्या विवाहाला वसंतरावही उपस्थित आहेत! रत्नागिरीत तोरस्कर वकिलांकडे येताना की जाताना बॅकग्राउंड ला वर विजेच्या तारा दिसतात. पण नंतरच्याच सीन मध्ये कोकणात अजून वीज नाही असे म्हणतात. या आणि अशा काही गोष्टी सहज टाळता आल्या असत्या. अजून थोड्या चांगल्या विनोदांची पेरणीही सहज शक्य होती. पण जे आहे तेही चांगलंय.
याचा उत्तरार्धही लवकरच झळकेल असं चित्रपटातच सांगितलं आहे, पण लेको किती कमी थिएटरला चित्रपटाचे खेळच लावलेत? आत्ता कोल्हापूरात मोजून 10 शोज? मराठी चित्रपटाची महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या जन्मशताब्दीला ही परिस्थिती??
बाकी या सिनेमाला मी 4/5 देते. मला निखळ आनंद मिळाला. संगतीचाही परिणाम असेलच. ज्या मराठी लोकांना पु.ल माहीत आहेत त्यांना नक्की आवडेल, ज्यांना माहीत करून घ्यायचे आहेत त्यांनाही आवडेल. शेवटी भाई म्हणजे कुणी साधीसुधी व्यक्ती नव्हती. ती तर आकाश व्यापणारी असामी!
- रमा
Comments