Skip to main content

गुलाबो सिताबो : बेग़मने खाल्लेला चित्रपट



बॉलीवूडमध्ये इतके हुशारीने बनवलेली 'ड्रॅमॅटिक सटायर' फारच कमी. डार्क कॉमेडीचा इतका सुंदर वापर  'जाने भी दो यारो' इतका नसला तरी तरी वेगळ्या खुबीने केला आहे. जुही चतुर्वेदी लिखित आणि शुजित सरकार दिग्दर्शित हा 'गुलाबो सिताबो' हा तो चित्रपट.लखनौ शहराची पार्श्वभूमी, मोडकळीस आलेली 'फातिमा महल' नामक खास लखनौवी हवेली, त्याची मालकिण बेग़म (फ़ारुख़ जाफ़र) हिचा नवरा एक हावरट, कंजूस ' सतत आयजीच्या जीवावर' असलेला ८० ला येऊनही ही हवेली कधीतरी आपल्या मालकीची होईल या भ्रमातला म्हातारा मिर्झा , आणि ढेर सारे भाडेकरू. अगदी ३०रु ते ७० रु इतक्याशा भाड्यावर राहणारे. आयुषमान खुरानाने साकारलेला 'बांके' हा 'मै गरीब हू' म्हणत आपल्या बहिणींना सांभाळणारा भाडेकरु सतत भाडे देण्यास कुचराई करण्यात पटाईत. यांच्या आयुष्यात पुरातत्व खात्याचे लोक आणि बिल्डर मंडळी यांची एन्ट्री होते आणि एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि बांके (आयुषमान) यांची अवस्था सुरुवातीला आणि शेवटाला दाखवलेल्या गुलाबो आणि सिताबो या कठपुतळ्यांसारखी होते. 

अमिताभ बच्चनचे ते प्रोस्थेटिक नाक अतिशय नाकावर येते. पण मध्ये मध्ये करणारा म्हणून ते पोपटासारखे नाक चालवून घ्यायचे कारण अमिताभला सगळे गुन्हे माफ. तो भास्कर बॅनर्जी (आनंद) जितक्या सहजतेने साकारतो तितकाच सहज  विजय(अग्निपथ) साकारतो आणि तसाच सहज त्याचा खविस, हावरट मिर्झा आहे. आयुषमानची यावेळीही चित्रपटाची निवड चांगली आहे. बच्चनसमोर सशक्तपणे उभे राहणे सोपे नाही. आयुषमानने ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे. बाकी चिटूरपुटूर भाडेकरू सोडले तर बांकेची भाई टाईप बहीण गुड्डो(सृष्टी श्रीवास्तव) आणि पुरातत्व खात्यातला अधिकारी (विजय राज), वकील (बिजेंद्र काला) यांचा वावरही अगदी नैसर्गिक आहे. भूमिका अतिशय छोटी असली तरी हा चित्रपटात जान आणली आहे एका विशेष कॅरेक्टर, बेग़मने. (फ़ारुख़ जाफ़र). कॅरेक्टर्सना बेग़म जे टोमणे लगावते विशेषतः मिर्झाला, ते त्याला प्रयत्नपूर्वकही परतवता येत नाहीत. कम्माल तर क्लायमॅक्सला केली आहे म्हातारीने. नुसती बसून अथवा आडवी होऊन निर्विकार चेहऱ्याने पण फटकेबाज संवादाने तिने जो दंगा केलाय त्याला तोड नाही. 

 डायरेक्शन  उत्तम. आर्ट डायरेक्शन उत्तम, नाट्यही उत्तम. पण सिनेमा थोडा स्लो आहे, एखाद्या कथेला कादंबरी करायचा प्रयत्न करावा अशी याची लय आहे. पार्श्वसंगीत तेच ते आहे. डायलॉग्ज नीट ऐका, भाषेचा छान लहेजा  सांभाळला आहे. थोड्याशा ख़ामीया सोडल्या तर प्राईमव्हीडीओवर, पण मोठ्या स्क्रीनवर (atleast TV) एकसंध बघण्यासारखी फिल्म आहे. 

- रमा 


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...