मंगेश जोशींचा 'कारखानीसांची वारी' हा अतरंगी चित्रपट पाहिला. लिओ टॉलस्टॉयची एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे ऍना कॅरेनिना. त्याच्या सुरुवातीला एक कोट आहे. "All Happy families resemble one another, but each unhappy family is unhappy in its own way.’'. 'कारखानीसांची वारी Ashes on a road trip' हाही या कोटने सुरू होतो. एक सर्वसाधारण एकत्र कुटुंब. ज्यातील ज्येष्ठ व्यक्ती पुरुषोत्तम कारखानीस याचे निधन झालेले आहे. त्याच्या अंतिम इच्छेनुसार आता त्याचे 3 वयस्कर भाऊ , एक बहीण आणि मुलगा त्याच्या अस्थी गावाकडल्या घरात, शेतात आणि शेवटी पंढरपूरला चंद्रभागेत विसर्जित करण्यासाठी निघाले आहेत. अस्थीविसर्जन झाल्यानंतर एका लाखोट्यातील पत्राचे वाचन करावे असेही सांगून ठेवले आहे. आता कारखानीस परिवार एक टिपिकल मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब आहे. एकत्र असूनही प्रत्येकाची वेगळीच कहाणी आहे. वेगळीच सुखदुःखे, जगण्याची ओझी आहेत. पण एकमेकांना सांगायची चोरी असे हटवादी आणि अहंकारी प्रत्येकाचे स्वभाव. लखोट्यातील पत्रात इच्छापत्र असेल आणि माझ्या वाट्याला काही ना काही नक्कीच आले असेल जगणे तरून जायला असा प्रत्येकाचा समज. समज म्हणण्यापेक्षाही एक तीव्र इच्छा म्हणू. एक प्रकारचा लोभ या सर्वाना अस्थीविसर्जनाच्या निमित्ताने एकत्र आणतं आणि हे कुटुंब प्रवास करून कटु-गोड प्रसंगांना सामोरं जातं त्याची ही कहाणी आहे. हा वर्णन करून सांगायचा नाही प्रत्यक्ष पाहायचा सिनेमा आहे. तगडी स्टारकास्ट, त्यांचे एक अन एक एक्सप्रेशन टिपण्यासारखे, प्रत्येकाने एक नमुना उभा केला आहे. मृत्यूसारख्या गंभीर विषयाला हलकं फुलकं करता येतं हे 'व्हेंटिलेटर' सारख्या चित्रपटात पाहिले होते. तसाच हा अनुभव होता. आपल्या अवतीभवती घडत असलेलीच एखादी गोष्ट आहे अशी अनुभूती येते. एकत्र असूनही विभक्त प्रवास ही वास्तवाची समज या चित्रपटात आपल्याला मिळते. मोहन आगाशे, अमेय वाघ, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, अजित अभ्यंकर, मृण्मयी देशपांडे यांची या ही रोड ट्रिप. वंदना गुप्ते, शुभांगी गोखले याचे एक उपकथानकही आहे. या सगळ्यांनी एक कुटुंब एकत्र असूनही दुसऱ्याच्या मनातले भाव माहीत नाहीत, इतके आपण कसे आत्ममग्न होतो की कुटुंबाचा विचारच मनात येत नाहीत असे प्रश्न पडतात. लखोट्यातल्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलेलं असतं, प्रत्येकाची काय रिऍक्शन येते हे पाहायला नक्की पाहा 'कारखानीसांची वारी'.
रमा
Comments