आज मंगेश पाडगावकरांचा वाढदिवस. ऊफ्फ ते गेले नाही का.....जयंती..त्यांची जयंती!
ते 2-3 वेळा घरी येऊन गेले असतील,पण त्या माणसानं मला वेड लावलं. तसं वेड अनेकांनी लावलं, पण भेटता आलं फक्त यांनाच. आपली कविता सादर कशी करावी, 'कोई इनसे सिखें'.. त्या जाड काचेच्या चष्म्यातून डोळ्यातलं भावदर्पण प्रेक्षकां ना अर्पण कसं करावं..आणि आपल्या वाचकांच्या 'वाह वा' ला ही आपणच दाद कशी द्यावी, यांच्याकडूनच शिकावं.. ना विषयाचं, ना वयोमानाचं, कसलंच बंधन नसे या माणसाला. सुखं-दुःख, अनुभव, कल्पना साऱ्या साऱ्या पलीकडल्याही वास्तवाचं दर्शन घडवणारं हे निराळाचं रसायन. '
रस्ता चुकलेलं त्यांचं वेडं कोकरू जेव्हा आईच्या कुशीत शिरतं, आपल्या जीवात जीव येतो, आईची उब जाणवते .
कधी संध्याकाळी मनात काहूर माजतं, ते म्हणतात, 'डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी'...
मीडियाचा मुजोरपणा आणि आतंकवाद, वाढती असहिष्णुता याने आपलं मन हतबल झालं की ते म्हणतात,
' कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी..गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी'
हिडीस गाण्यावर थिरकणारी तरुणाई पाहून मला आठवते त्यांचे,
'चोली के पीछे कहू मी काय आहे,
ऐक रे भडव्या, तुझी मी माय आहे'
तुझी वाट तू स्वतःच शोधायची आहे असं सांगतात ते,
'सांगा कसं जगायचं, रडत रडत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा'...
कबीर असो किंवा शेक्सपिअर, भाषांतर हे शब्दाची मदत घेऊन आशयाचे करायचे असते हे तेच दाखवून देतात. भारी माणूस. एका शब्दात त्यांना विश करायचं तर मी म्हणीन 'सलाम'!
Comments