स्मृतिगंध लिसनर्स क्लब च्या या महिन्याची थीम होती 'राग यमन' वर आधारित गीते. राग यमन, अतिशय लोकप्रिय आणि अतिशय मोठा आवाका असणारा. शास्त्रीय संगीत शिकणार्यांना सर्वाना पहिल्यांदा शिकवला जाणारा राग. हा जरी प्रथम शिकवला जाणारा राग असला आणि वरवर सोपा वाटत असला तरी त्यात 'Deceptive simplicity' आहे. संध्याकाळ चा राग असला तरी तरी कुठल्याही वेळी सादर केला जाणारा राग. शांत राग असला, तरी ही गंभीरता नसलेला, आल्हददायी शांती रस असणारा असा यमन राग. कार्यक्रमाची सुरुवात झाली या रागातील अत्यंत लोकप्रिय पारंपरिक चीज ' ए री आली पिया बिन' ने.
नंतरचे गाणे होते 'चितचोर' चित्रपटातील 'जब दीप जले आना'. अमोल पालेकर, झरीना वहाब सारख्या कलाकारांच्या करिअरला झळाळी देणारा असा हा एक मिडल रोड सिनेमा. येसूदास आणि हेमलता यांच्या आवाजात असलेले हे गाणे, संगीतकार रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेलं. रवींद्र जैन हे दृष्टीहीन होते. 'जब दीप जले आना' म्हणजे काय हे त्यांना कसे काय कळले असेल? येसूदास यांना केरळ मधून हिंदी चित्रपट सृष्टीत आणण्याचे काम ही त्यांनीच केले. हेमलता म्हणजे लता भट, कोलकता चे लाहोर गायकी साठी प्रसिद्ध गायक जयचंद्र भट यांच्या त्या कन्या, नौशादांसोबत ५ वर्षांच्या कराराची ऑफर नाकारणाऱ्या त्या पहिल्याच गायिका असतील.
पुढचे गाणे 'सरस्वतीचंद्र' सिनेमातले 'चंदनसा बदन', या चित्रपटात आधी दिलीपकुमार व निम्मी यांना घ्यायचे ठरले होते, पण दिलीप कुमारने काही टाळाटाळ केल्याने ते जमले नाही. नूतन व गुजराती अभिनेता मनीष यांच्यावर चित्रित या चित्रपटाला इंदीवर यांचे शब्द असलेले हे मुकेश च्या आवाजातले गीत कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केले. आणि या गाण्याने त्यांना ब्रँड आयडेन्टिटी मिळवून दिली. पुढे 'गोपी बैराग' चित्रपटासाठी कल्याण-आनंद यांनीच संगीत द्यावे अशी खुद्द दिलीपकुमारनेच शिफारस केली.
'राजा कालस्य कारणम्' की 'कालस्य कारणं राजा' हा जसा वाद आहे तसेच काहीसे संगीतकार आणि गायकासंदर्भात आहे याचा दाखला देत रोशन चे मोहम्मद रफ़ी ने गायलेले 'बरसात की रात' चित्रपटातलं सदाबहार गीत 'जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात' हे गाणं ऐकवलं. भारतभूषण साठी गाणं म्हणताना रफ़ी ला दडपण येत असे कारण भारतभूषणने स्वतः शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते ही माहितीही आजच कळली. या गाण्यात अनेक ठिकाणी असणारे कण स्वर ही सांगितले. साहिरची कम्माल कल्पनाशक्ती, कित्ती सुंदर शब्द आहेत, वाह!!!
"हाय वो रेशमी जुल्फ़ों से बरसता पानी
फूल से गालों पे रुकने को तरसता पानी..
दिल में तूफ़ान उठाते हुए जज़्बात की रात
ज़िन्दगी भर"...
१९६४ मधल्या 'सतीसावित्री' या चित्रपटातले लता व मन्नाडे यांच्या आवाजातले गाणे 'तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूँ.. ' सलग साडे तीन दशके लोकप्रिय संगीत देत आलेले संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे हे
गीत, भरत व्यास यांचे शब्द. यात मुद्दाम उर्दू शब्दांचा वापर टाळून कसे हिंदी शब्द योजले आहेत हे सांगून ते उर्दू आणि हिंदी यांचे भाषा विशेष सांगताना म्हणाले, उर्दू म्हणजे जळणारा दिवा' आणि हिंदी म्हणजे 'तेवणारी समई'. काय सुरेख तुलना केली आहे..
'बहाना' चित्रपटातील लता मंगेशकरांचे 'जा रे बदरा बैरी जा' यातल्या नुसत्या 'जा' मध्ये इतके भाव भरले आहेत .. रुसवा,.आर्जव आणि बरंच काही..
यानंतर चे गाणे होते हिंदी चित्रपटसंगीतातले दीपस्तंभ सेहगल यांच्या आवाजातले, अत्यंत लोकप्रिय 'मै क्या जानू क्या जादू है' हे गीत. या गाण्यातील हरकतींविषयी थोडकीशी माहिती दिली. लता मंगेशकरांचं हे खूप आवडीचं गीत, पण सेहगल ने क्या जानू क्या जादू मधील दुसऱ्या 'क्या' तली अवरोही तान लताबाईंनाही जमली नाही. 'जब नैन मिले, नैनोने कहा, अब नैन बसे के नैनो मे' अशी काही पारलौकिक अभिव्यक्तीचे दर्शन 'केदार शर्मा' लिखित या गाण्यात व्यक्त झाले आहे. 'जिंदगी' चित्रपटातल्या या गीताला गीताला 'पंकज मलिक' यांनी संगीत दिले.
१९७२ मधल्या गुलजार लिखित, दिग्दर्शित 'परिचय' मधले 'बीती ना बिताई रैना' या पंचमदांनी संगीत दिलेले गाणे तर माझे अतिशय आवडते.'चांद कि बिंदी वाली' 'झूठ से काली' अशी रतिया यमन मध्ये बांधली आहे.परिचयची खासियत म्हणजे प्रत्येकवेळा याच्या संदर्भाच्या नवीनच पैलूशी 'परिचय घडत जातो. कदाचित म्हणूनच तो मला अधिकाधिक आवडत जातो.
यानंतरचे गीत होते पाकिजा' मधले 'मौसम है आशिकाना'. पाकिजा मध्ये असलेले 'इन्ही लोगोने' गाणेही यमन मध्येच बांधलेले आहे. 'पाकिजा' च्या निर्मितीचीही विलक्षण कथा त्यांनी सांगितली. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी याची निर्मिती कथा. वेगवेगळ्या कारणाने रखडत गेलेला. पुन्हा-पुन्हा नव्याने शूट केलेला असा पाकिजा. मीनाकुमारी व कमाल अमरोही विभक्त झाल्यामुळे पाकिजा चे चित्रण थांबले होते तेव्हा नर्गिसने मध्यस्ती करणे, आणि शूटिंग दरम्यान डाकूंच्या टोळीने साऱ्या क्रू चे केलेले अपहरण हे सारं वेगळ्यानेच लिहावं लागेल इतकं इंटरेस्टिंग आहे.
१९५४ च्या मिर्झा गालिब मधले गाणे होते 'नुक्ताचीं है, 'ग़म-ए-दिल उसको सुनाये न बने', यातला 'सोज' ग़म-ए-दिल, एक non specific greif आहे. खूप सुरेख गाणं. गालिब च्या प्रसिद्ध ओळी या गाण्यात आहेत,
"इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश ग़ालिब
के लगाये न लगे, और बुझाये न बने" ...
यानंतरचे गीत काळजाला भेदत जाणारं, हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं ड्युएट ''छुपा लो यू दिल मैं प्यार मेरा, कै जैसे मंदिर में लौ दिये की'' ममता चित्रपटातले हे गाणं, हे गाणं ऐकून डोळे पाणावले
नाहीत असं कधीच झालं नाहीये. रोशन यांनी संगीत दिलेलं, मजरूह सुल्तानपुरींचे कम्माल शब्द आणि पडद्यावर सुचित्रा सेन आणि अशोक कुमार. ज्यांनी हा चित्रपट पहिला आहे, त्यांना नक्की कळेल या सिच्युएशन वर हे गाणं कित्ती चपखल आहे ते.
यानंतरची २ मराठी गीते होती एक सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातले 'जिथे सागरा धरणी मिळते' हे गाणं 'पुत्र व्हावा असा' चित्रपटातले जनकवी पी.सावळाराम यांनी लिहिलेले, वसंत प्रभूंनी संगीत दिलेले. आणि दुसरे गाणे होते सगळ्याच बाजुंनी लेजेंडरी म्हणावे असे साक्षात बालगंधर्वांचे 'नाथ हा माझा', त्यांचे श्रेष्ठ गुरु भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेले 'संगीत स्वयंवर' मधले. ही अतिशय दुर्मिळ रेकॉर्ड ऐकायला दुर्दैवाने मला थांबता आले नाही, वेळेच्या अभावी.
केवळ यमन रागातलीच इतकी सारी गाणी ऐकूनही कुठेही तोच-तो पणा नव्हता. स्मृतिगंध ने इतक्या सुंदरतेने गाणी निवडली होती की त्याला तोड नाही. आयोजक कालगावकरांना मला विनंती करावीशी वाटते की त्यांनी पुस्तक लिहावं. हा अनमोल ठेवा जपला जावा म्हणून...
आता पुढच्या महिन्याच्या प्रतीक्षेत..
२६ मार्च २०१७
स्मृतिगंध लिसनर्स क्लब- Episode- 3
Comments