"हॅलो दादू, कॉलेज नंतर डायरेक्ट घरी ये. ".. "असं आई म्हणतेय"..नाही नाही म्हणता म्हणता पिकलपोनीने शेवटी दादूला फोन लावलाच.
दादुने पण टेचात विचारलं, "का? घरी पाहुणे येणारेत? मटन बनवलंय? का मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है?? नाही म्हणजे फक्त तेवढ्यासाठीच येत असतो ना मी घरी? असं काहीसं ऐकलं होतं मी.. "
जरासं ओशाळून पिकलपोनी म्हणाली, "सॉरी ना रे दादू.. तू सारखा बाहेरच असतोस. पूर्वीसारखा आमच्या बरोबर घालवायला तुला वेळच नसतो.. रात्रंदिवस अभ्यास असतो. म्हणून चिडून तसलं काही तरी बोलले ना रे मी.. आता सॉरी की. प्लीज..प्लीज..प्लीज"...
दादा एकदम तोडून म्हणाला, "बरं.. बरं.. बघतो..जमलं तर चक्कर टाकतो दुपारी." फोन कट.
"हट, चक्कर टाकतो म्हणे. सरळ नाही येणार म्हणून सांग की" पिकलपोनी त्याची नक्कल करत स्वतःशीच चरफडली. "नाहीच येणार तो नक्की."
त्याचं असं झालं होतं, पिकलपोनी आणो दादूचं कुठल्याशा फुसक्या कारणाने झालं होतं भांडण. भांडता भांडता भांडण एवढं वाढलं की दोघांना भांडणाचा मूळ मुद्दाच आठवेना. तरीही ओरडाओरडी झाली, पिकूचं भोकाड पसरून झालं. शेवटी तिचं नाक लालबूंद होईपर्यंत आणि दादाची कानशिलं गरम होण्यापर्यंत युद्ध रंगलं. आणि मग.. मग काय, दादूनं सभात्याग केला. फुल्ल गट्टी फू! अबोला.
दादू आजकाल मित्रांच्याच रूमवर पडीक असे. काल पण तो सणाचा म्हणून आला, छान गुढी उभी केली, आई बाबांशी गप्पा मारल्या, २ पुरणपोळ्या गट्टम केल्या. खिदळला सुद्धा, आता पिकूला बासच झालं.. "मी काय अदृश्य आहे होय? माझ्याकडं बघितलं पण नाही? इतकं असतंय होय? जा बाबा!!"
तरीही तिनं आज त्याला फोन केलाच, तर त्यावर उत्तर काय? "बरं.. बरं.. बघतो.." दुपार उलटत आलेली, दादू काही आलाच नाही. डोळ्यात टपोरे थेंब आले घळाघळा... "हम्म्म!!आलाय मोठा!!जाऊ दे तिकडं, मी काय वाट-बिट बघणार नाहीये"..
आईनं दादूला फोन केला, "काय रे बाबा, कुठे आहेस? येणार म्हंटला होतास ना?".. "नाही??? बरं बरं.. " पिकू ऐकत होतीच. चिडून गेली शेजारी झोपीकडे खेळायला.
झोपीचा छोटा भाऊ पाळण्यात छान हात-पाय हलवत होता. मधेच त्याला 'भॉ' केलं की 'खे-खे' करून इतकं गोड हसत होता. त्याला बघून पिकलपोनी म्हणाली, "झोपी, बरंय तुला छोटुलाच भाऊ आहे ते. मोठे भाऊ खूप चिडके बिब्बे असतात." थोडावेळ बाळाशी खेळून मग पिकू घरी जायला निघाली, "चला, ७ वाजत आले, बाय बाय छोटू बालू, बाय बाय झोपी" ..
घरी येऊन बघते तर काय? दादू किचन मधून बाहेर आला, "टडा, आमच्या रडूबाईंसाठी".. पिकूला एकदम काही कळेचना. दादाने पिकलपोनीचा आवडता पास्ता बनवला होता.. "कित्ती माया करतो दादू आपली.. आणि आपण कित्ती येडचॅप सारखे वागतो".. ती एकदम दादूला बिलगली. "दादू, थँक्यू, मी आत्ता कधी च नाही भांडणार.. "भरव मला एक घास" - आ..
दादुने एक भास भरवला, "ए नाटक, ते खाऊन झाल्यावर सगळ्यांच्या प्लेट्स तू धुणार आहेस, कळलं ना?" आणि दोघे पण हसले.
अशा रीतीनं तब्बल ९ दिवसांचं भांडण संपुष्टात आलं..
Comments