'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजि फिल्म नंतर त्याच दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा एका थीम वर आधारित चार गोष्टींची मालिका आणण्याचा प्रयोग 'लस्ट स्टोरीज' च्या चार कथांमध्ये केला आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं "पाहा जरूर", almost सगळ्यांच्या akward reactions आल्या. ( की बाई, तुला काही भीड, मुरवत आहे की नाही, हळू सांग की, या विषयावर अशी बोंबलतेस काय?) आणि काय सांगू, हीच थीम आहे. 'लस्ट स्टोरीज' केवळ 'शारीरिक वासना' इतकाच विषय नाही हाताळत. सेक्स, गरज, सामाजिक दृष्टिकोन आणि taboos, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री.. एकंदर या सगळ्यावर आधारित आहेत लस्ट स्टोरीज.
पहिली कथा अनुराग कश्यपची. राधिका आपटेने खाऊन टाकली आहे. लग्न झालेल्या बाईचे कलीग सोबत विद्यार्थ्यांसोबत fling. त्यातून होणारी सेक्स, रिलेशनशिप, प्रेम , गिल्ट, जेलसी यांची सरमिसळ सगळं सगळं ती आपल्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे प्रामाणिक अभिनय, कसलाही भपका नाही. 'Bold & Beautiful yet Confused' कालिंदी तिने मस्त रंगवलीये. आकाश ठोसर ला चांगली संधी मिळाली आहे, पण त्याने त्याच्या बोलण्यावर अजून काम केलं नाही तर तो सैराट फेम परश्याच राहील कायम.
झोया अख्तरच्या कथेत भूमी पेडणेकर एका मोलकरणीच्या भूमिकेत आहे. बॅचलर घर मालकसोबतचे तिचे संबंध. त्याच घरी त्याचा 'मुलगी बघणे' कार्यक्रम आहे. आणि कसं या पुरुषालेखी आपण केवळ शारिरीक गरजेपुरतं खेळणं आहोत, आपली लायकी नसून आपण भलतीच स्वप्न बघतोय का?, हे सगळं सगळं ती मूकपणे बघते आहे. आत कुठेतरी सलतंय, मन स्वतःलाच खातंय ही ओरडून सांगणारी तिची शांतता अप्रतिम काम करून जाते.
पुढची कथा दिबाकर बॅनर्जीची. मध्यमवयीन बाईचे नवऱ्याच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध. दोन मुलांची आई, करिअर सोडून घरात बसलेली, स्मार्ट तरी संसाराचा वीट आलेली रीना मनीषा कोईरालाने साकारली आहे. नवऱ्याला आपल्यात काही इंटरेस्ट उरलेला नाही त्यामुळे उडणारे खटके, घुसमट त्यामुळे वेगळं काहीतरी शोधणारी रीना नवऱ्याच्या मित्रासोबतच बिन नावाचं नातं जगणारी. एकीकडे सलमानसोबत घट्ट मैत्री आणि दुसरीकडे त्याच्याच बायकोसोबत अकर्षणापुढे गेलेले नाते यात गुरफटलेला सुधीर, हा जयदीप अहलावतने खूप छान साकारला आहे. नात्यांना गंज चढतो तेव्हा ती आपापसात टक्करही मुश्किलीने देतात. स्वतंत्र अस्तित्व शोधू पाहणारी बायको, अपरात्री परपुरुषाकडे आहे हा विषय थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न संजय कपूरने सलमानच्या surprisingly छोट्या भूमिकेत ठळक रंगवलाय.
शेवटची कथा करण जोहरची. 'ती आणि तिचं अपुरं सेक्सलाईफ'. ती आहे कियारा अडवाणी. तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे विकी कौशल. शरीर संबंध हे केवळ पुरुषाच्या सुखासाठी, आणि मुले पैदा करण्यासाठी असतात असे समज बाळगणाऱ्या समाजासाठी 'Female orgasm' वर भाष्य करणं तसं कठीणच. असो. कथा आहे छान पण घेतलीये पक्की करण जोहर स्टाईल. करणची हॉलिवूड सीनची कॉपी पकडली गेली आहे. बरं तेही ठीक आहे, बरेच जण करतात कॉप्या, पण करण सरांनी नेहा धुपिया आणि कियारा सारख्या साडीत ड्रेसअप होणाऱ्या प्रोफेसर्स नेमक्या कोणत्या कॉलेजात असतात प्लीज सांगावे. कुणी काय घालावे हा अर्थात ज्याच्या त्याच्या प्रश्न आहे शेवटी, पण मला आपलं कुतूहल.
एका थीमवर वेगवेगळ्या कथा, वेगवेगळी माणसं, नात्यांचे पदर, समाजाचा दुटप्पीपणा, माणूस आणि आदिम गरज यांचे सत्य 'लस्ट स्टोरीज' मध्ये आहेत. झोया आणि दिबाकार यांच्या कथांना 4/5, अनुराग कश्यप 3.5/5 आणि करण जोहर 3/5.
बाकी चित्रपट न बघता अव्वा ईश्श्या करणाऱ्यांनो, नुसतं ट्रेलर पाहून लिहिणाऱ्या टीकाकारांनो आणि नको तिथे ज्यांच्या संस्कृतीचे घडोघडी पतन' होते म्हणून नावं ठेवणाऱ्यांनो, मी काय म्हणते, पाहा आणि मग बोला. बाकी चित्रपट रसिकांनो, 'नक्की पाहा'..
- रमा
Comments