आजवर लेखक, अभिनेता म्हणून परिचित प्रियदर्शन जाधव याचा 'मस्का' पाहिला.
लोकांना भावनांच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या भामट्यांची ही ट्विस्टस आणि टर्नस नी भरलेली अनपेक्षित कथा. 'Suspense Comedy' असा काहीसा वेगळाच genre म्हणता येईल.
सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. अगदी नैसर्गिक. 'बनचूका यादव' (शशांक शेंडे), 'नवशिका चिकू' (प्रणव रावराणे), 'गोंधळलेला करोडपती हर्ष' (अनिकेत विश्वासराव), रहस्याची किल्ली (चिन्मय मांडलेकर) आणि हुकुमाची राणी, Leading Lady (प्रार्थना बेहरे) यांच्या अभिनयाने प्रत्येक प्रसंग खुमासदार झालेला आहे. त्याच त्याच प्रकारच्या भूमिकांमधून बाहेर पडून नवीन काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य त्यांना मस्कामध्ये मिळालं आहे.
नाटक, TV आणि चित्रपट तिन्ही माध्यमात का म करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने 'मस्का'तून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आणि ते यशस्वीही झाले आहे. एका अर्थाने डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी कथेवर काम करणं खरंच खूप challenging आहे.
चित्रपटात कोण कुणाला फसवतंय हे माहीत असूनही प्रेक्षक 'कसे' हे जाणून घेण्यासाठी खिळलेले राहतात. 'पुढे काय?' हा प्रश्न अगदी शेवटपर्यंत मनात राहतो. चित्रपटाच्या सिक्वेलचीही तयारी करून ठेवली आहे. हिंदीत धूम, ब्लफमास्टर, स्पेशल 26 अशा प्रकारचे सिनेमे येऊन गेले आहेत. मराठीत 'अशी ही बनवाबनवी' नंतर इतकी फसवणारी आणि हसावणारी फिल्म हीच असावी असं वाटतं. (दोन्हीत जाम फरक आहे, तुलना नको).
डल्ला मारणारे नेमके कसे एकत्र येतात, फसवणूक झालेल्यांचं काय होतं हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. अर्थात मूळ कथानकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते अनुत्तरीत राहिले तरी फरक पडत नाही. फिल्मचा ट्रेलर अजून चांगला करता आला असता.
मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाहीत असं म्हणणाऱ्या, इंडस्ट्रीतल्याच काही लोकांना खोटं ठरवणाऱ्या वेगवेगळ्या, प्रयोगशील फिल्म्स बनत आहेत, ही त्यातलीच एक फिल्म.
प्रवाही कथानक, धक्कातंत्राचा योग्य वापर, खो खो हसवणारा विनोद, कथेला साजेशी गाणी आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपट जमून आलाय. पण हे सगळं वाचण्यापेक्षा चित्रपट 'बघण्यात मजा आहे'. नक्की पाहा. मस्का लावा.
रेटिंग- 3.5/5
- रमा
Comments