आज बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' पाहिला. (सौजन्य-Netflix)
एक हवाई मंजिल नामक पुरानी हवेली त्यातल्या 4 स्त्रियांची ही कहाणी. यांनी अपराध केला आहे. स्वप्नं पाहण्याचा. आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची स्वप्नं, स्वतःच्या शरीरावर
त्यांना ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार आहे तो एका उंबऱ्या आडूनच. लिपस्टिक च्या लाखो शेड्स सारखी रंगीत स्वप्नं असतील. पण ती लपवायची. त्यांना लपूनछपून रहायची परवनगी आहे. पण बुरख्याआड.
भोपाळ सारख्या ठिकाणी असलेल्या या बायका. रेहाना ही कॉलेज कन्या. तिच्याघरीच बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रॉकस्टार बनावं, बेधुंद नाचावं, गावं, जीन्स सारखा पेहनावा करावा असं तिला वाटतं. सनातनी मुस्लिम कुटुंबातील बंधनांना झुगारुन, पारतंत्र्याच्या बुरखा फाडून तिला मोकळं व्हायचंय.
दुसरी लीला. बळजबरीने लग्न लावले जाणारी एक तरुणी, प्रियकर आणि होणारा नवरा यांच्या कात्रीत सापडलेली, बिझनेस करावा, दिल्ली गाठावी अशी तिची स्वप्ने. तिचा बोल्ड स्वभाव आणि कडवं वास्तव यात तिची फरफट होते आहे.
तिसरी शिरीन. नवऱ्याला न सांगता सेल्सवूमन चं काम करते. तिला केवळ मुलं पैदा करणारी, शारीरिक उपभोगाची हक्काची वस्तू समजणारा नवरा. तिला बळजबरी आणि बलात्कार नाही प्रेम हवे आहे, आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे.
आणि चौथ्या बुवाजी. त्यांच्याच नॅरेशनने चारी कथा बांधलेल्या आहेत. चोरून इरॉटीक पुस्तकं वाचून स्वप्नात रंगणारी 50शी उलटलेली ही विधवा बुवाजी.
प्रत्येकीची समांतर कथा पाहताना यातले विचार उत्तान वाटू शकतात. पण उथळ नाहीत. कारण त्यात तथ्य आहे. त्यात अतिशयोक्ती नाही. कोंकना आणि रत्ना या मुरलेल्या अभिनेत्रींनसोबत प्लबिता आणि आहना यांचा सहजसुंदर अभिनय कुठेही कमी पडत नाही. अप्रतिम बॅकग्राऊंड म्युझिक, कडक डायलॉग्ज, उपहास आणि विनोदाचा शिडकावा यात आहे.
चित्रपटात सगळेच पुरुष सत्ता गाजवणारे आणि व्हीलनिश रंगवले आहेत. (ते असतातच सोडा). शेवटचा सिगारेट वाल्या सीन ने जरा मी कोड्यात पडले, नेमका आशय काय आहे? दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवने हवे ते मांडले आहे, पण ते तसेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचते का हा सवाल आहे. शेवटी चौघीना हताशपणे रडत बसलेल्या न दाखवता सिगरेट च्या धुराप्रमाणे दुःख फुंकून टाकलं असं काही प्रतिकात्मक दाखवायचं आहे का हे काही मला झेपलं नाही.
मस्ट वॉच नाही, पण वेगळा अनुभव म्हणून पाहायला हरकत नाही. मनासारख्या माणसाशी, मनात असताना, मनासारखा संग करण्याची इच्छा करणं यात चूक काय? लिपस्टिकच्या कहाण्या जो जसा बुरखा घालील त्याला तशा दिसतील. आणि कळतील तो बुरखा उतरावल्यानंतर..
रेटिंग- 3/5
Comments