Skip to main content

सविता दामोदर परांजपे - एक रंगलेले गूढ

लग्नाच्या 8 वर्षानंतरही वरून सुखवस्तू जोडपे शरद व कुसुम अभ्यंकर(सुबोध भावे, तृप्ती तोरडमल) सुखी नाही. कुसुम एका विचित्र शारीरिक, मानसिक स्थितीतून जाऊ लागते ज्याचे वैद्यकशास्त्रात उत्तर नाही. याचा तिच्या वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम, भूतकाळात डोकावून बघताना उलगडलेले एक सत्य, एक स्त्री. 'सविता दामोदर परांजपे'. कोण आहे ही सविता? तिचं आणि शरदचं नातं काय?  या साऱ्याची ही कथा. 80 च्या दशकातल्या याच नावाच्या मूळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा आहे. नाटकात कै. रीमा लागू यांनी केलेली कुसुमची भूमिका तृप्ती तोरडमल हिने साकारली आहे. तिचे हे यशस्वी पदार्पण म्हणावे लागेल. सुबोध भावेने ही शरदची भूमिका उत्तम वठवली आहे. बाकी भूमिकांमध्ये राकेश बापट, पल्लवी पाटील यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. 

चित्रपटातील गाणी आणि बॅकग्राऊंड साऊंड खूप मस्त. 'वेल्हाळा' आणि 'जादूनगरी' ही गाणी खूपच श्रवणीय. संवादही सुंदर. मराठी भयापटांचा इतिहास पाहता, एक थरार निर्माण करून तो शेवटपर्यंत राखून ठेवण्याचे काम यात चांगल्या रीतीने केले आहे. काहीशी हिंदी चित्रपट 'भूलभुलैय्या' ची झाक यात जाणवते. चित्रपट वेगवान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम.  तांत्रिक दृष्ट्या मराठी सिनेमा खूप प्रगती करतो आहे हे पाहून आनंद वाटतो. 

अलीकडे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मंडळी मराठी सिनेमाकडे वळत आहेत. अभिनेता जॉन अब्राहामने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी.

चित्रपट पाहिल्यानंतर काही गोष्टी मनात रेंगाळल्या. भ्रमनिरासापोटी मनात मत्सर निर्माण होतो आणि मग अंतरात्मा त्याने पछाडून षड्रिपुंची तीव्रता शरीरात ज्वालामुखीप्रमाणे उसळते. नातेसंबंधाचा पाया म्हणजे प्रेम. नात्यातला विश्वास नष्ट झाला तर आकर्षण कमकुवत होईल. हे सारं केवळ आपलं मन ताब्यात ठेवू शकतं पण आपलं मन हे तर अतिशय गूढ आणि गहन आहे. असे संदर्भ कुठे कुठे चित्रपटात दिसतात. 


ट्रेलर इतके यातले नाट्य अंगावर येत नाही. त्यामुळे घाबरू नका, आणि एकदा जरूर पाहा. 

रेटिंग- 3/5

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...