साठी पार जोडप्यातल्या सौ.श्यामलला (रिमा लागू),आहे तो फ्लॅट विकून टॉवरमध्ये राहायला जायचे आहे, तर श्री. विद्याधरांसाठी(मोहन जोशी)आपल्या घर म्हणजे नुसत्या भिंती नाहीत. आठवणींचा साठा आहे, आयुष्याचा असा भाग आहे की, उर्वरित आयुष्यही इथेच घालवावं अशा मताचे. त्यातून त्यांना नवं घर मिळवून, आपल्या घरासाठी स्वप्न पाहणारा देणारा एजंट (हृषीकेश जोशी) यांची ही कथा. त्यापायी होणारे रुसवे फुगवे, भौतिकाशी आपलं जडलेलं अतूट नातं, एकीकडे नव्याची आस आणि दुसरीकडे न सुटणारी जुन्याची कास आहे. या मुख्य पात्रांसोबतच विभावरी देशपांडे, स्पृहा, सुमित राघवन त्यांच्या त्यांच्या लहानशा भूमिकेत चांगले वाटतात.
राहत्या घराचा कंटाळा येऊन दुसरं घर पाहायला गेलेले महाजन जोडपं घरी येऊन स्पृहाच्या मित्रमंडळींचा पार्टीनामक पसारा पाहतं, तेव्हा "माझ्या घरात मलाअसली थेरं चालणार नाहीत" म्हणणारी श्यामल आपल्या घराबद्दल भावुक होते.. आणि शेवटी फ्लॅट असो की टॉवर शेवटी त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनतं. म्हणजे एकीकडे तिला दुसरं चांगलं घरही हवं आहे, तर दुसरीकडे जुन्या घराची ओढही कमी होत नाही आहे. 'इच्छा आणि आवश्यकता' यात मानवी मन कसं गुरफटलेलं हेही यात दिसतं
रिमा ताईंचा हा अखेरचा सिनेमा. त्यांचं डबिंग निर्मिती सावंत यांनी केलं आहे. काय नाही आहे या चित्रपटात? उत्तम स्टार कास्ट आहे, त्यांचा सहज अभिनय आहे, उत्तम लेखन, साधे तरी चटकदार संवाद आहेत... हे सगळं आहे, पण कथा धड सांगता आली नाही तर हे सगळं असून काय उपयोग? त्या दोघांचीही द्विधा मनस्थिती त्यांना जाणवते इतकी आपल्याला जाणवावी इतके आपल्याला टांगून ठेवलं आहे असं उत्तरार्धात वाटायला लागतं. ९० मिनिटात आटोपता आला असता सिनेमा तर मस्त झाला असता. वैभव जोशींच्या कविता उत्तम आहेत. 'काय आहे आता इथे?' असं जेव्हा श्यामल वैतागून म्हणते, तेव्हा त्यांचा त्या घरातला संसार उलगडणाऱ्या 'कधीच न विरणारी उब असेन मी तुझी..आणि कधीच न सरणारा माझा पाऊस असशील तू...चार भिंती आणि दोन खिडक्या नाही आहे फक्त या घराला...सगळंच तर आहे इथं...' या हृदय ओळीअसोत किंवा, "हाय काय अन नाय काय" कवितेतून चित्रपट सरकत जातो काही जागी तर रेंगाळतो. पण एक क्षण असा येतो की 'बस की राव आता कविता' असा अक्षरशः मारा झालाय चित्रपटात.
कथा सांगणारा कधी कधी त्या कवितांच्या प्रवाहात इतका ओढला जातो की कथेचा नेमका आशयच हरवतो, तसं थोडंसं इथे झाल्याचं जाणवतं. माणसांचं एकमेकांशी नातं असतं तितकंच घराशीही असतं. घरांच्या भिंतीना कान असतात. खिडक्यांना डोळे आणि छपराला हात असतात. जुनी कपाटं, संदुका, पलंग, आरसे सगळ्यांशीच आपलं जवळचं नातं असतं. पण माणसांच्या असण्यानेच घरं जिवंत होतात. कुठे का असेनात.
१०८ वर्षाच्या आमच्या जुन्या घराची या निमित्ताने आठवण आली आणि मन हळवं झालं..
चित्रपट म्हणून एकदा हा सिनेमा जरूर पाहा. या निमित्ताने नात्यांनाही रूटीन चेकपची गरज आहे असं लक्षात येईल. सिनेमागृहात आम्ही १३ जण होतो. पण निदान चित्रपट लावला तरी, हाय काय अन नाय काय!
रेटिंग-
२.५/५
-रमा जाधव
२८/९/२०१८
Comments
I didn't see the movie but the helpful one