Skip to main content

होम स्वीट होम - नात्यांचं रूटीन चेकप


साठी पार जोडप्यातल्या सौ.श्यामलला (रिमा लागू),आहे तो फ्लॅट विकून टॉवरमध्ये राहायला जायचे आहे, तर श्री. विद्याधरांसाठी(मोहन जोशी)आपल्या घर म्हणजे नुसत्या भिंती नाहीत. आठवणींचा साठा आहे, आयुष्याचा असा भाग आहे की, उर्वरित आयुष्यही इथेच घालवावं अशा मताचे. त्यातून त्यांना नवं घर मिळवून, आपल्या घरासाठी स्वप्न पाहणारा देणारा एजंट (हृषीकेश जोशी) यांची ही कथा. त्यापायी होणारे रुसवे फुगवे, भौतिकाशी आपलं जडलेलं अतूट नातं, एकीकडे नव्याची आस आणि दुसरीकडे न सुटणारी जुन्याची कास आहे. या मुख्य पात्रांसोबतच विभावरी देशपांडे, स्पृहा, सुमित राघवन त्यांच्या त्यांच्या लहानशा भूमिकेत चांगले वाटतात. 

राहत्या घराचा कंटाळा येऊन दुसरं घर पाहायला गेलेले महाजन जोडपं घरी येऊन स्पृहाच्या मित्रमंडळींचा पार्टीनामक पसारा पाहतं, तेव्हा "माझ्या घरात मलाअसली थेरं चालणार नाहीत" म्हणणारी श्यामल आपल्या घराबद्दल भावुक होते.. आणि शेवटी फ्लॅट असो की टॉवर शेवटी त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनतं. म्हणजे एकीकडे तिला दुसरं चांगलं घरही हवं आहे, तर दुसरीकडे जुन्या घराची ओढही कमी होत नाही आहे. 'इच्छा आणि आवश्यकता' यात मानवी मन कसं गुरफटलेलं हेही यात दिसतं 


रिमा ताईंचा हा अखेरचा सिनेमा. त्यांचं डबिंग निर्मिती सावंत यांनी केलं आहे. काय नाही आहे या चित्रपटात? उत्तम स्टार कास्ट आहे, त्यांचा सहज अभिनय आहे, उत्तम लेखन, साधे तरी चटकदार संवाद आहेत...  हे सगळं आहे, पण कथा धड सांगता आली नाही तर हे सगळं असून काय उपयोग? त्या दोघांचीही द्विधा मनस्थिती त्यांना जाणवते इतकी आपल्याला जाणवावी इतके आपल्याला टांगून ठेवलं आहे असं उत्तरार्धात वाटायला लागतं. ९० मिनिटात आटोपता आला असता सिनेमा तर मस्त झाला असता. वैभव जोशींच्या कविता उत्तम आहेत. 'काय आहे आता इथे?' असं जेव्हा श्यामल वैतागून म्हणते, तेव्हा त्यांचा त्या घरातला संसार उलगडणाऱ्या 'कधीच न विरणारी उब असेन मी तुझी..आणि कधीच न सरणारा माझा पाऊस असशील तू...चार भिंती आणि दोन खिडक्या नाही आहे फक्त या घराला...सगळंच तर आहे इथं...' या हृदय ओळीअसोत किंवा, "हाय काय अन नाय काय" कवितेतून चित्रपट सरकत जातो काही जागी तर रेंगाळतो. पण एक क्षण असा येतो की 'बस की राव आता कविता' असा अक्षरशः मारा झालाय चित्रपटात. 

 कथा सांगणारा कधी कधी त्या कवितांच्या प्रवाहात इतका ओढला जातो की कथेचा नेमका आशयच हरवतो, तसं थोडंसं इथे झाल्याचं जाणवतं. माणसांचं एकमेकांशी नातं असतं तितकंच घराशीही असतं. घरांच्या भिंतीना कान असतात. खिडक्यांना डोळे आणि छपराला हात असतात. जुनी कपाटं, संदुका, पलंग, आरसे सगळ्यांशीच आपलं जवळचं नातं असतं. पण माणसांच्या असण्यानेच घरं जिवंत होतात. कुठे का असेनात. 

१०८ वर्षाच्या आमच्या जुन्या घराची या निमित्ताने आठवण आली आणि मन हळवं झालं.. 

चित्रपट म्हणून एकदा हा सिनेमा जरूर पाहा. या निमित्ताने नात्यांनाही रूटीन चेकपची गरज आहे असं लक्षात येईल. सिनेमागृहात आम्ही १३ जण होतो. पण निदान चित्रपट लावला तरी, हाय काय अन नाय काय!

रेटिंग- 
२.५/५

-रमा जाधव 
२८/९/२०१८

Comments

Jyoti B said…
Bas ki rao atta.. hahaha

I didn't see the movie but the helpful one

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...