3 डिसेंम्बर 2011, लंडनमधील उच्चवर्गीय भाग मेफेअर येथील वॉशिंग्टन हॉटेल मध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. बाहेर दोन अँब्युलन्स आल्या. दोन पॅरामेडिक्स लगबगीने हॉटेल लॉबीत पोहोचले. रिसेप्शनिस्ट ओरडले "रूम 207". पॅरामेडिक त्यांची प्रथमोपचार साधने घेऊन लिफ्टकडे धावले. पण 207 मध्ये सारं काही संपलं होतं. सुप्रसिद्ध नायक देव आनंद यांचा हृदयविकाराचा मोठा झटका येऊन अंत झाला.
देव आनंद हा वर्तमानात जगणारा माणूस होता, पण त्याला भविष्याकडे पाहून काम करणं चांगलंच ठाऊक होतं. . वयाची ऐंशी पार केल्यानंतरही, यश मिळो किंवा अपयश, टीका असो किंवा शेवटच्या काळात त्याची खिल्ली उडवलेली असो त्याचा वेळ, ऊर्जा आणि कल नवनवीन चित्रपट बनवण्यासाठी होता. या दुर्दम्य महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाला 'अशक्य' शब्दच जणू माहीत नव्हता. तो होता ख़ुशमिज़ाज, परिपूर्ण, देखणा.. देव आनंद!
देव आनंदच्या करिअरची विभागणी साधारणपणे अशी करता येईल- त्याचा 'कृष्णधवल काळ' जिथे त्याच्या बहुतेक दिग्दर्शकांनी (जास्त करून त्याचा भाऊ-विजय आनंद) त्याच्या अति टोकाला जायच्या प्रवृत्तीला काबूत ठेवलं होतं, आणि 'रंगीत काळ' ज्यात फार मोठी विविधता आली. एके काळाचा फॅशनेबल, ट्रेंडसेटर देव आनंद, आत्मपूजक बनला. स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडाला आणि हळूहळू त्याची प्रतिमा अत्यंत भडक (कपड्यांच्या निवडीतही) आणि न शोभणारी बनत गेली. त्याच्या शेवटच्या काळातल्या सिनेमांमध्ये हे सिद्ध झालं की त्याच्याकडे दिग्दर्शकाची दृष्टी नाही. पण त्याचे विषय, कथा, काळाला अनुसरून आणि महत्त्वाचे म्हणजे 'मूळस्वरूप', खऱ्या होत्या.
तो आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही. वय वाढला की माणूस म्हातारा होतो असं न समजणारा माणूस. चैतन्याने भरलेला, उर्जावान, उमदा माणूस, त्याच्या चित्रपट, गाण्यातून सतत जिवंत राहील.
माझ्या मते, खालील काही गाण्यातून या महानायकाचे चरित्र डोकावते, ज्याने मला मनोरंजनाचा अनमोल ठेवा दिला.
"तदबीरसे बिगडी हुई तक़दीर बनाले"(बाज़ी)
सतत रिस्क घेणाऱ्या देव आनंदचं जीवन तत्व यात दिसून येतं. बॉक्स ऑफिसावरील नशीब काही का असेना, एका मागोमाग एक चित्रपट बनवत राहणे. असा हा खऱ्या आयुष्यातील 'गँबलर'. 'बाज़ी' ही नवकेतनची पहिली मोठी यशस्वी फिल्म. या चित्रपटाशी संबंधित सर्वांच्याच करियरला या चित्रपटाच्या यशामुळे मोठे प्रोत्साहन मिळाले. गुरु दत्त, गीता बाली, देव आनंद, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी.
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया" (हम दोनो)
देव आनंदच्या म्हणण्यानुसार हेच त्याचं जीवनविषयक तत्वज्ञान होतं.
"जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया"
साहिरच्या या ओळींप्रमाणेच विचार करत तो पुढे काय करता येईल हे शोधत गेला.
"जीवन के सफरमें राही"(मुनिमजी)
जसा मुकेश राज कपूरचा तसा किशोर कुमार देव आनंदचा आवाज होता असे बरेचजण म्हणतात. (माझ्यासाठी रफी). किशोर कुमारच्या करिअरचे पहिले वहिले गाणे देव आनंदसाठी होते, *फिल्म 'जिद्दी' साठी. "मरने की दुवाए क्यू मांगू"). "जीवन के सफर में राही" कायमच किशोर कुमार आणि देव आनंद यांच्या जिवलग मैत्रीला संबोधून राहिले. आणि देव साहेबांच्या फॅन्ससाठी "और दे जाते है यादें, तनहाईमें तडपानेको" या ओळी आजही लागू होतात.
"हम है राही प्यार के"(नौ, दो, ग्यारह)
'नौ दो ग्यारह' ही गोल्डी(विजय आनंद) ची नवकेतनसाठी पहिली फिल्म होती. या गाण्यातही देव आनंदची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिसून येते. "धूप थी नसीब में, तो धूप में लिया है दम, चाँदनी मिली तो हम चाँदनी में सो लिए"
"है अपना दिल तो आवारा"(सोलवाह साल)
अशाच पद्धतीने आपल्याला ओळखण्यात यावं असं देव आनंद ला वाटत असावं. पडद्यावर सुंदर सुंदर नायिकांवर प्रेम उधळणारा तो आणि आणि त्याच्यावर प्रत्यक्षात जान छिडकणारा हजारो स्त्री फॅन्सचा वर्ग.
"ये दिल ना होता बेचारा"(ज्वेल थीफ)
फक्त देव आनंदमुळेच प्लास्टिकच्या माशाला 'कूल लुक' येऊ शकतो. रस्त्याच्या मध्यातून आनंदाने फिरताना आणि तनुजाला पुढे न जाऊ देता तो शेवटी गाणं संपवतो तिच्या कार च्या बॉनेटवर बसून. एस.डी यांची ही चाल "ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय" मधील "कर्नल बोगी मार्च" वरून घेतली आहे.
"उपरवाला जानकर अनजान है" (काला बझार)
देव आनंदच्या माझ्या सर्वांत आवडत्या गाण्यांपैकी एक. प्रत्येक ओळ म्हणजे श्लेषच. इतरांसाठी भगवंताची आळवणी करणारा देव आनंद, वरच्या बर्थ वरील वहिदा रेहमानला 'उपरवाला' संबोधून गातो. त्याच्या चेहऱ्यावरील भावातील निरागसता आणि मनातील खट्याळपणा खूपच सुंदर आहे.
"ये रात, ये चाँदनी फिर कहाँ"(जाल)
हेमंत कुमार देखील देव आनंदचा आवाज म्हणून शोभतो. या गाण्याचे चित्रीकरण अप्रतिम आहे. देव आणि गीता बाली दोन वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये आहेत पण त्यांच्या प्रतिक्रिया सुरेख दाखवल्या आहेत.
"ये आँखे उफ्फ यूंम्मा" (जब प्यार किसीसे होता है)
याच चित्रपटातील "जिया हो, जिया हो जिया कुछ बोल दो" हे जास्त लोकप्रिय गीत असूनही हे माझे आवडते गाणे आहे. रफीचा खेळकरपणा, त्याची सहजता. रफीची प्रत्येक नायकासाठी वेगळा आवाज देता येण्याची वैविध्यपूर्ण गायकी. कधी कधी देव आनंदने रफी सोडून किशोर कुमार का स्वीकारला नवल वाटतं.
"हम बेख़ुदी में तुमको पुकारे चले गये"(काला पानी)
हे गाणं ऐका निव्वळ रफी च्या जादुई आवाजासाठी. रफीचा आवाज आणि मेलडी अशी जमून आली आहे की तुम्ही जवळजवळ वाद्यांची सोबत विसरून जाता. इतर 'कोठा गीतांपेक्षा' हे खूप शांत आणि कानाला हळुवार असे आहे. संगीत फक्त मोहम्मद रफीच्या आवाजाला मार्मिकता देण्यापूरते साजेसे दिले आहे. सचिनदांनी जणू काही नवकेतन साठी आपल्या उत्तम रचना ठेवल्या होत्या. आणि त्यातील उत्तम त्यांनी रफीसाठी योजून ठेवल्या होत्या.
"दिन ढल जाए हाय, रात न जाये"(गाईड)
देव आनंद च्या सर्वोत्तम कामांपैकी एक. या गीतात भावनांचा संघर्ष उत्तम प्रदर्शित झाला आहे. हरवलेल्या प्रेमासाठी खेद, आयुष्यात घडू न शकलेल्या गोष्टींसाठी दुःख, विश्वासघाताप्रति कडवटपणा, आणि सगळ्यात मोठा म्हणजे प्रेमभंग- "तू तो न आये, तेरी याद सताये"...आणि याचे चित्रीकरण, ज्यात पायऱ्यांच्या जोडलेल्या शृंखलेचा हुशारीने वापर केला आहे. ज्याने अंकित होतो रोझी आणि राजुमधील भावनिक अवरोध आणि वहिदाच्या चेहऱ्यावरील उदासीनता आणि नैराश्य जेव्हा ती त्याची असह्य पीडा ऐकते आपल्याला मिळते एक उत्कृष्ट कालातीत गीत.
"तू कहाँ ये बता (तेरे घरके सामने)
धुक्याची रात्र, रफीचा मधाळ आवाज, देव आनंदची जादू आणि नूतनचं रात्रीला उजळवणारं प्रज्वलित हास्य. देव आनंदचे उत्तम प्रेम प्रसंग म्हणावे असे. (अजून एक रोमँटिक गाणे मनात येते ते म्हणजे पतिता मधलं, "याद किया दिलने कहाँ हो तूम"..अजून शांत आणि हलकं फुलकं तरी गोड)
देव आनंद मरुच शकत नाही. मृत्यूनंतरही आपल्यातल्या कित्येक जिवंत व्यक्तींपेक्षा तो जास्त जिवंत आहे. इतकं भरभरून आयुष्य तो जगला, पूर्ण उत्साहाने, आनंदाने, उत्तेजनेने. कुठलीही इच्छा अपूर्ण नाही की कसलं दुःख मागे नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, "जेव्हा माझी वेळ येईल, मला एकदम गायब व्हायचं आहे. जसा वाऱ्याचा झोत झुळुकीत वाहतो, जशी फडफडणारी ज्योत, दाहक अग्नी बनते, किंवा पाण्याचा एक थेंब, वाहत्या प्रवाहाबरोबर वाहू लागतो. मला वाटतं कुणीच कधी मला मरताना किंवा संपलेला पाहू नये" (त्याचे आत्मचरित्र "Romancing with Life मधून)
- रमा जाधव (अनुवादित)
मूळ - विक्रम आप्पासाहेब जाधव
03 December 2018
Comments