परसूट ऑफ हॅपिनेस : आनंदाचा अथक शोध
आयुष्यात आनंद कुणाला नको असतो? कुणाला भौतिक सुखात तर कुणाला आत्मिक समाधानात आनंद मिळतो. जो तो आनंदाच्या शोधात आहे, सगळ्यांचं एकच ध्येय आहे. Pursuit of Happiness.
या सिनेमाची कथाही एक खऱ्या चरित्रावर बेतलेली आहे. ख्रिस गार्डनर ( विल स्मिथ ), ख्रिस्तोफर ज्युनिअर ( जेडन स्मिथ ) हे खऱ्या जीवनातले बापलेकच यात दाखवले आहेत. एक बोन डेन्सीटी स्कॅनर मशीन, ज्याला फारशी मागणी नाही विकणारा सेल्समन ख्रिस व्यावसायिक पतनामुळे हैराण असतो. त्याची बायको मुलाला त्याच्यापाशी ठेवून निघून जाते, राहतं भाड्याचे घर जाते, शेअर बाजारात काम करण्यासाठी इंटर्न म्हणून विनापैसा ख्रिसला काम मिळते आणि मग सुरू होतो एक संघर्ष. आनंदाचा अथक शोध. घर नाही तर कधी पब्लिक टॉयलेटमध्ये तर कधी ट्रेन, बसमध्ये, स्वस्त डॉर्मिटरी मिळेल तिथे मुलाला घेऊन राहणे, खिशात, बँकेत पैशाचा खडखडाट असून सकारात्मक राहून गुजराण करण्यासाठी त्याची राहिलेली मशिन्स त्याला विकायची असतात. अनेक संकटांना सामोरं जाताना हा सिनेमा आपल्याला खूप काही शिकवतो. सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानणे, स्वप्नांच्या पूर्तीसाठी झटत राहणे. नैसर्गिक अभिनय, अप्रतिम संवाद, साजेसं पार्श्वसंगीत याने हा सिनेमा एक क्लासिक बनला आहे.
शेवटच्या सीनमध्ये केवळ विल स्मिथच्याच नाही, प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी तरळतं. इतकं खरे आणि मनाला भिडणारे त्याचे आनंदाश्रू आहेत. हा सिनेमा थोडा स्लो वाटू शकतो, पण संवाद असे मन लावून ऐकले की पुन्हा बघावसा वाटतो.
चर्च मधील सीन मध्ये गाण्याच्या ओळीत तेथील गायक परमेश्वराची आळवणी करतात, " हे देवा, माझ्या मार्गातील पर्वत हलवू नकोस, पण तो चढून जाण्याची शक्ती मला दे " या पलीकडे जाऊन, इतका निर्मळ, आनंदाचा वेगळा पाठपुरावा कोणता असेल?
जरूर पाहावा असा हा चित्रपट.
4/5
- रमा
Comments