शरदचंद्र चटोपाध्याय हे एक मोठे बंगाली साहित्यिक होते. उपेक्षितांचे अंतर्बाह्य चित्रण करणारे, परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज, खास करून स्त्री वर्ग यांच्या व्यथांचं कथन बंगाली साहित्यात 'शरद साहित्य' म्हणून एक मानदंड ठरलं. आजही आहे. भारतीय साहित्यात त्यांचे योगदान दूरगामी व परिणामकारक आहे.
त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876 रोजी झाला. कॉलेजात असताना त्यांनी 'भागलपूर साहित्यसभेची' स्थापना करून 'छाया' हे हस्तलिखित सुरू केले. रवींद्रनाथांसारखं अभिजात साहित्य जन्माला घालायचं त्यांचं स्वप्न होतं. गरिबीमुळे त्यांना शिक्षण ही अर्धवट सोडून द्यावं लागलं. पण त्यांचं साहित्यावरील प्रेम कधीच कमी झालं नाही.
पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी नोकरी धरली, त्यांचे संवेदनशील मन समाजातील तळागाळातून सुख-दुःखाचे निरीक्षण करत होते त्यावेळी त्यांची 'बडदीदी' ही अप्रकाशित कादंबरी कोलकात्यात 'भारती' मासिकात क्रमशः छापून आणली गेली आणि बंगाली साहित्यात 'शरदचंद्र' उदयाला आला.
शोषित, मूक, दबलेल्या समाजाचा आरसा म्हणजे त्यांचं साहित्य. कल्पनारम्यतेऐवजी वास्तवतेकडे झुकणारा असा त्यांचा बाज होता. ते एक अतिशय उत्कृष्ट कादंबरीकार आणि लघुकथाकार होते. देवदास, श्रीकांतो, चोरित्रोहिन, गृहहाहा, परिणिता, 'बिराज बहू' अशा त्यांच्या एकाहून एक सरस कादंबऱ्या आणि 'काशिनाथ', 'बिंदूर छेले', 'हरीलक्ष्मी' इत्यादी अप्रतिम कथा यांचा बंगाली साहित्यात समावेश आहे.
त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांचे चित्रपटात, नाटकात रूपांतर झाले तर सुमती क्षेत्रमाडे यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'जीवनस्वप्नं' ही कादंबरी लिहिली आहे.
शरद साहित्याचा आशय खोल आणि शैली मनाचा वेध घेणारी होती. प्रस्थापित बंग साहित्यातील तंत्र नाकारून त्यांनी आपले असे साहित्य तंत्र विकसित केले. राजकारणातही ते सक्रिय होते. 'पथेर दाबी' या त्यांच्या कादंबरीवर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती. त्यांच्याच इंग्रजी भाषेत आणि इतर अनेक भारतीय भाषेत शरदचंद्रांचे साहित्य अनुवादित झाले आहे. त्यांचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी गौरव केला. पण त्यांनी आपल्या लेखनातून सामान्यजनांचा गौरव केला. इथेच ते वेगळे ठरतात, मोलाचे ठरतात.
- रमा
#दिनांकविशेष
Comments