Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ.
ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है".
काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून तर देऊ शकत नाही या समाजाच्या दृष्टीने पाप समजल्या जाणाऱ्या नात्यासाठी. सत्यासाठी. आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी.
पिपलिका तिला तिच्या हृदयाच्या खोलात पाहायला शिकवते, स्वतःला काय हवंय हे निवडायला शिकवते. आस्था मुक्त होते, लग्नाच्या बंधनातून एक खुला श्वास, गरमीच्या दिवसातील गार वाऱ्याची झुळूक आहे तिच्यासाठी हे नवीन नातं. ती पिपलिकासाठी घरदार सोडेल? समाजाला सामोरी जाईल? एक भारतीय विवाहित स्त्री केवळ पुरुषाकडून नाही तर स्त्रीकडूनही फसवली जाऊ शकते, गृहीत धरली जाऊ शकते. कोणाकडे जाते शेवटी आस्था? कुठला मार्ग निवडते? दोन्हीही मार्ग खडतर असणार आहेत तिच्यासाठी. ती खऱ्या अर्थाने काय असेल रिक्त? की पूर्णपणे मुक्त?
वेब सिरीज काही ठिकाणी ढिली पडते पण संवाद आणि संगीत ती कसर भरून काढतात. याचा टायटल ट्रॅक अप्रतिम आहे. एकदा पाहण्यासाठी चांगली आहे सिरीज. साहिर रझा चे दिग्दर्शन छान आहे.
समाजाची, खास करून भारतीय समाजाची, कुटुंबाची मानसिकता, समलिंगी प्रेमाकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन, स्वतःची ओळख झाल्यावर इतर नाती तितकी जाचक न वाटणं या सगळ्यांना स्पर्श करते ही सिरीज.
4/5
रमा
Comments