काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी.
तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते, बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्तीला आपणच ओळखत नाही, त्यामुळे कुठेतरी आत्मसंयम आणि आत्मभान याविषयी आपण मुळीच जागरूक नसतो. शांतीवनला गेल्यावर या सगळ्या बाबींशी हे 3 मित्र नव्याने सामोरे जातात आणि मग त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, त्याची ही गोष्ट. अतिशय छान, नेटकी आणि विनोदी तरी हृदयस्पर्शी कथा या सिरीज मध्ये
केवळ 6 भागात दर्शवली आहे.
कथा, पटकथा, संवाद अतिशय इंटरेस्टिंग. कास्टिंगही उत्तम. आलोक, अभय आणि ललित तिघांनीही जीव ओतून काम केलं आहे. हिंदीतील शिखा तलसानियानेही चांगले काम केले आहे. अभय महाजनचे सिरीजची संकल्पना आणि कथेतही योगदान आहे.
दिल चाहता है चे कट्टर फॅन असलेल्या या तीन मित्रांप्रमाणे मीही आहे. DCH म्हणजे एकदम आमचा 'बचपन का प्यार'. या चित्रपटाला नुकतीच 20 वर्षे होऊन गेली. किती काळ लोटला. कित्येक गोष्टी नव्याने घडल्या, काहींचे नामोनिशाणही मिटले. पण माणसाच्या अंतरातील काही गोष्टी कायमच चिरंतन राहणार. 'Shantit Kranti' teaches us how to accept the reality, how to let go things and choose the path of self realization' .
मराठीतली ही सिरीज इतर काही भाषांत डब केलेली आहे. पैकी हिंदी ऐकून पाहिले, इतके काही खास वाटले नाही. पण मराठीत संवाद म्हणजे एकदम खटक्यावर बोट.
आपल्या घट्ट मित्रांसोबत नक्की पाहा सोनी लिव्ह चॅनलवर. 👌
रमा जाधव
Comments