Skip to main content

Posts

Showing posts from October, 2013

एवढे करच..

चाललास दूर तू, प्रवास एकटाच हा उभी अशी मी पाहण्या एकदा वळून जा थेंब थेंब सय तूझी वाहते, तनीमनी थांबून एकदा जरा, उरात साकळून जा जीव मीन जळविना होत आहे सारखा निष्पर्ण राईतून तू उगिच सळसळून जा मी पराभूत व्हायचे ठरविले आहे जरी आठवांच्या या रणी तूही तळमळून जा

हो की नाही??

का़जळ्लेले डोळे सुद्धा बरसतातच की कधी कधी मेंदी भरल्या हातांनी कधी का पाप नाही घडत? भरल्या पोटी, सुद्धा हाव भरतेच की कधी मनात मोकळ्या हवेत सुद्धा कधी जीव नाही का गुदमरत? बागांमध्येही फुले जातात कोमेजून कधी कधी मुर्ख माणसांवरती ही कधी जीव नाही का जडत? 'हो' की 'नाही', हे प्रश्न तसे अगदीच सोपे असतात न उलगडता तरीही ते वारंवार नाही का भेडसावत???

प्रार्थना..

उत्तमाचा ध्यास दे तू, प्रयत्नांची कास दे भक्ती, शुद्धी, संपन्नतेची आम्हा सदा तू आस दे मार्ग शोधू आमुचा, तू धैर्य दे, सामर्थ्य दे संघर्ष ही होती अहिंसक, एवढा विश्वास दे येतील ही कधी संकटे, त्या झेलण्या बळ खास दे जगणे माझे सार्थ व्हावे, एवढे मज श्वास दे सेवा घडावी योग्य तेथे, हेवा नको ही बुद्धी दे ध्येय अन परिपुर्णतेचा सदैव तू सहवास दे...

मग वाईट कशाच वाटतंय??

वाईट कशाचं वाटतंय? मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे खास आपल्यात, पण त्या 'खास' हून पलीकडे जाण्याला बंदी आहे हे माहीत होतंच की आधीपासून. मग वाईट कशाचं वाटतंय? या आधीसुद्धा कितीतरी वेळा तूला 'मी' सोडून कुणासोबत तरी असलेला पाहिलेलं आहेच की मी..मग वाईट कशाचं वाटतंय? तू कुणाच्या प्रेमात पडलास तर माझ्यासाठी आनंदच आहे, असं ठणकाऊन सांगते खरी मी नेहमी, पण त्या विचाराने अस्वस्थ ही होते. तू कुठल्याही प्रकारे बांधील नाहीस मला, पण मग 'तू लग्न करतो आहेस' असं कळल्यावर आकाश फाटल्यासारखं वगैरे का वाटलं असेल? ही बातमी आली म्हणून? की तूझ्याकडून आली नाही म्हणून?? की ईतक्या लवकर आली म्हणून? की 'लग्न' करतोयस म्हणून? मनाची तयारी करून ठेवलीच होती की केव्हाची? मग वाईट कशाचं वाटतंय? 'लग्न केलस' एवढ्या एका कारणाने परका होशील का रे? आता भेटतोस तसा नाही भेटणार मग? आता बोलतोस तसा नाही बोलणार तेव्हा? मध्यरात्री नाहीस नेणार बाईक वरून फिरायला..आता मी आजारी पडले की तासातासाने माझी चौकशी करायला फोन करतोस, तसं ही नाही करणार.. हे सहाजिक आहे सगळं..यातलं बरचसं आता अंगवळणीही ...

मन माझे..

मन स्वप्न, मन पक्षी मन चित्र, मन नक्षी मन तरंग, मन तराणे मन सूर, मन गाणे मन धुंद, मन भान मन थोर, मन सान मन दिवटी, मन मशाल मन अणू, मन विशाल मन झुंबर, मन झोका मन ह्रूदय, मन ठोका मन पावा, मन श्याम मन धावा, मन राम मन चंचल, मन लहरी मन गूढ, मन गहरी मन गिरकी, मन रिंगण मन तुळशी मन, मन अंगण मन माझे..

कधी होऊ..

कधी होऊया पक्षी आपण, अन उडूया आकाशी वार्‍यासंगे पैज लाऊया, मारू गगनभरारी कधी होऊया उनाड लाटा क्षितिज सागरावरच्या बिलगू चंद्राच्या प्रतिबिंबा, साठवून अंतरी कधी होऊया तरंग मनीचे, विचार सैरावैरा होऊ आपण कविता, कधी अन उतरू कागदावरी कधी होऊ आपण गाणे, अन होती स्वर हे रस्ते शब्द कोवळे ऊन अंगणी पोचवती मज घरी..

राधा प्यारी..

कान्हाच्या या अनेक गोपी तरी वाटते राधा प्यारी प्रेम सखी ती, प्राण सखी ती राधा, राधा, राधा न्यारी रंग रंगतो, खेळ खेळतो राधेला या छेड छेडतो रंगुनी साऱ्या क्रीडांमधूनी परी असे ही श्वेत बावरी राधेने त्या चंग बांधला छळतो मजला श्याम सावळा पाहतेच मी कसा राहतो माझ्याविन तो गोपमुरारी राधेवाचून कसल्या क्रीडा कसले गोकूळ, मनभर पीडा करमेना जीव कृष्णाचा हा राधेचाही प्राण उरावरी राधे सखये कृष्ण आळवी म्हणतो राधा, राधा प्यारी प्रेम सखी ती, प्राण सखी ती राधा, राधा, राधा प्यारी

वेड..

आज तीच आशा वेडी  तेच स्वप्न वेडे..  तोच हट्ट वेडा आणि  तेच वेड वेडे ..  वेड्या वळणावरी या  झाड जुने वेडे..  सडा फुलांचा वेडा  आणि गंध तेच वेडे..  वेड हळवे, वेड कष्टी, जीवनाचे अर्थ वेडे ..  वेड आता अन निरंतर  वेड शत्रू, मित्र  वेडे ..