वाईट कशाचं वाटतंय? मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे खास आपल्यात, पण त्या 'खास' हून पलीकडे जाण्याला बंदी आहे हे माहीत होतंच की आधीपासून. मग वाईट कशाचं वाटतंय?
या आधीसुद्धा कितीतरी वेळा तूला 'मी' सोडून कुणासोबत तरी असलेला पाहिलेलं आहेच की मी..मग वाईट कशाचं वाटतंय?
तू कुणाच्या प्रेमात पडलास तर माझ्यासाठी आनंदच आहे, असं ठणकाऊन सांगते खरी मी नेहमी, पण त्या विचाराने अस्वस्थ ही होते. तू कुठल्याही प्रकारे बांधील नाहीस मला, पण मग 'तू लग्न करतो आहेस' असं कळल्यावर आकाश फाटल्यासारखं वगैरे का वाटलं असेल?
ही बातमी आली म्हणून? की तूझ्याकडून आली नाही म्हणून?? की ईतक्या लवकर आली म्हणून? की 'लग्न' करतोयस म्हणून?
मनाची तयारी करून ठेवलीच होती की केव्हाची? मग वाईट कशाचं वाटतंय?
'लग्न केलस' एवढ्या एका कारणाने परका होशील का रे? आता भेटतोस तसा नाही भेटणार मग? आता बोलतोस तसा नाही बोलणार तेव्हा? मध्यरात्री नाहीस नेणार बाईक वरून फिरायला..आता मी आजारी पडले की तासातासाने माझी चौकशी करायला फोन करतोस, तसं ही नाही करणार.. हे सहाजिक आहे सगळं..यातलं बरचसं आता अंगवळणीही पडलंय.. मग वाईट कशाचं वाटतंय?
खूप खूप कोसळून रडायचय तूझ्याकडे, भांड्ल्याचं निदान नाटक तरी करायचंय, किमान तेवढ्यासाठी तरी भेटून जा असं सांगतेय केव्हाची.. तू येणार नाहीस हे माहीत आहे पक्कं..मग वाईट कशाचं वाटतंय?
'माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी..तो समजून घेण्यातच हयात संपेल.. मग वाईट कशाचं वाटतंय?
Comments