भारतातले अनेक पुरुष शेफ जगभरात विख्यात असले तरी, भारतात विशेषतः महाराष्ट्रात स्वयंपाक म्हणजे बाईचं काम हे समीकरण अजूनही घट्ट आहे. पण 'गुलाबजाम' चित्रपटाचा नायक आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा आपला लंडन मधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात परत येतो, पुण्यात खास मराठी पद्धतीचा स्वंयपाक शिकायला. लंडन मध्ये खास मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट काढणं हे त्याचं स्वप्न आहे, ध्यास आहे. त्याला पुण्यातील एका डबे देणारी बाई राधा आगरकरचा (सोनाली कुलकर्णी) शोध लागतो आणि आता या राधाकडूनच आपल्याला स्वयंपाक शिकायचा आहे अशी खूणगाठ बांधतो, आणि तर्हेवाईक, खडूस, थंड राधा जी स्वयंपाक मात्र चविष्ट बनवते तिला आपली गुरू मानून शिकवण्यासाठी तयार करतो, आणि आयुष्यच बदलून जातं! इतकीच कथा.
कथा म्हंटलं तर इथेच संपली, पण खरं तर इथे सुरू होते सचिन कुंडलकर, तेजस मोडक यांची ही कथा मांडते मानवी जीवनाचे अनेक कंगोरे. भुकेसारखी सुंदर आणि वाईट ही, कॉम्प्लेक्स गोष्ट नाही या जगात. तिच्या पूर्तीसाठी आपण जगतो. तिच्यामुळे आपण जगतो. ही कथा स्वयंपाकाची आहे, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या परिमाणात घेऊन त्याला जन्म देण्याची.
'गुलाबजाम' मध्ये येतात पुण्याची 'खास पुणेरी' माणसं, खास हरवत चाललेली महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती, पानं वाढण्यापासून ते अन्न हे पूर्णब्रह्म पर्यंत, माणुसकी मैत्री, विश्वास असे अनेक पैलू.
काही विपरीत घटनांमुळे काही लोक जगापासून तूटतात. आपल्याच जगात जगतात. कोषातून बाहेर पडणे त्यांना जमणार नसतं असं नाही, पण आपल्या भोवतीचं जाळं ते स्वतःच अधिक अधिक जास्त गुंफत जातात. पण कुठे ना कुठे एक आशेचा किरण असतो, सुटकेला वाव असतो, प्रगतीचा मार्ग असतो. या सिनेमात तो मार्ग आहे, स्वयंपाक. ही कला ही आहे, आणि शास्त्र ही.
आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना कुठलीही गाईड बुक्स नसतात. पाककलेचं, किंवा पाकशास्त्रचंही तसंच आहे. पाव इंच आलं आणि 4 थेंब लिंबू रस अशा नियमांनी बनवायला गेला तर कधीच जमायचा नाही. तुम्हाला घटक कळतील, कृती कळेल पण चव नाही. ती निव्वळ अनुभवावीच लागते. अमुक असा दरवळ सुटतो या पदार्थाचा हे कदापि लिहिता येणार नाही की वाचून उलगडा होणार नाही.
चित्रपटाची कथा, पटकथा छान, संवाद ही खुसखुशीत आणि हृदयस्पर्शी. संगीत साजेसं आणि सिनेमॅटोग्राफी अत्यंत सुंदर. फूड डिजायनिंगवर सायली राजाध्यक्ष यांनी कमालीची मेहनत घेतली आहे. सिद्धार्थने 'झेंडा' नंतर याच सिनेमात इतक्या सहजतेने भूमिका निभावली आहे. सोनाली कुलकर्णीच्या मला वाटतं सर्वोत्तम भूमिकांपैकी ही एक आहे. (इतक्यातच आलेला कच्चा लिंबू मला पाहता नाही आला त्यामुळे यातलंच म्हणता येईल).
मला यातील वेगवेगळ्या रुपकांची खूप मजा आली (कुंडलकर स्टाईल), स्वयंपाकाचा हेतू फक्त 'उदरभरण नोहे' हे सांगणारा असा हा सिनेमा. गुलाबजामसारखा पाकात मस्त मुरलेला. तो गुलाबजाम खावा तसा चवीचवीने बघा. तुम्ही किती पाकात आहात हे कदाचित कळेल (मला तरी कळलं).
- रमा
Comments