मी सहसा मनाला अस्वस्थ करणारे चित्रपट पाहत नाही, पण काही दिवसांपूर्वी फिल्म सोसायटीने निवडलेला हा नावाजलेला सिनेमा पाहिला.
कथा आहे मिल्डरेड या मध्यमवयीन स्त्रीची. तिच्या मुलीचा बलात्कार आणि खून होऊन अनेक महिने उलटूनही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नाही. गुन्हेगार काही सापडत नाही. लोकही ही घटना विसरून जातात. याने पेटून उठून मिल्डरेड तिच्या गावातल्या एका रस्त्यावरचे 3 बिल्डबोर्डस भाड्याने घेते आणि प्रत्येकावर 'Raped while dying', इतके दिवस होऊन ही गुन्हेगार कसा सापडत नाही, असे पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आणणारे अस्वस्थ प्रश्न एकामागोमाग एक लिहिलेले असतात. मिल्डरेड चा यामागे एकमेव हेतू असतो, आपल्या मुलीच्या गुन्हेगार सापडावा आणि त्याला शिक्षा व्हावी.
साधारण सगळेजण एकमेकांना ओळखत असतात अशा लहानशा गावात काहीच लोक मिल्डरेडच्या बाजूने असतात पण बहुतेक जण नसतात, आणि त्यातही मीडिया आणि पोलीस
यांना तीची ही न्याय मागण्याची पद्धत चुकीची आहे असं वाटत असतं. या सगळ्यांना तोंड देणारी एक शोकमग्न आई 'फ्रान्सिस मॅकडोरमंड' ने अप्रतिम साकारली आहे. तिच्या थंड चेहऱ्यामागे आहे एक धुमसती आग. अश्रूरूपी पाणी आटलं आहे आणि आत नुसता आक्रोश साठलेला आहे हे मिल्डरेडच्या डोळ्यात दिसतं.
एका बिल्डबोर्डवर उल्लेख असलेला चीफ ऑफ पोलीस ऑफिसर विलबी (वूडी हेरलसन) साऱ्या प्रकाराने हताश झालेला आहे. एक प्रकारचा गिल्ट त्याच्या मनात आहे. तर दुसरीकडे पोलीस डिपार्टमेंट काम करण्याऐवजी गुन्हेच करत फिरतंय असं वाटायला लावणारा वर्णद्वेषी, आळशी ऑफिसर डिक्सन (सॅम रॉकवेल) आहे. एक रिकामा रस्ता, त्यावरचे बिलबोर्डस अनेक महिन्यांपासून बंद पडलेत, ते पुन्हा रंगवून नजरेत आणते लोकांच्या डोक्यातून पुसून गेलेली कथा आणि तीची दाद न मिळणारी व्यथा.
जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्यावर बेतत नाही तोपर्यंत लोक तिच्याकडे 'एक बातमी' म्हणून पाहतात. काही दिवसांपूरती ती चर्चेत ही येते. पण काही दिवसांनी सारे शांत होते. सगळे विसरून जातात. त्यामुळे गावातील अनेक मंडळींची या प्रकारावर 'गडे मुडदेको उखाडके क्या फायदा' अशी प्रतिक्रिया असते. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी मिल्डरेडची कुठल्याही थराला जायची तयारी आहे. बदला घेण्यासाठी ती ज्या क्रूर पद्धत्तीने विचार करते ते जस्टीफाइड वाटतं.
गुंतागुंतीनी भरलेल्या या सिनेमात कथाकार, दिग्दर्शक मॅकडोनाहने धक्कातंत्राचा वापर केला आहे. 'आता ही कथा अशी पुढे जाऊन काहीतरी घडेल असं वाटतं ना वाटतं तोच चित्रपट संपतो. जरा अजून दाखवायला हवं होतं असं वाटत आपण उठुन चालायला लागतो आणि कळतं, या अनपेक्षित शेवटानंतर पुढचा विचार प्रेक्षकांवर सोपावलेला आहे.
इतका गंभीर विषय असलेल्या या चित्रपटात डार्क ह्यूमर आहे. सोशल इश्यूचं वास्तव दर्शन आहे. पण याच्या डायलॉग्ज मध्ये 95% शिव्यांचा वापर आहे. आणि हे सगळंच अंगावर येतं.
प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावामागे, वर्तनामागे एक किंवा अनेक कथा असतात. आपण त्या वर्तनाला चांगल्या, वाईटमध्ये तोलून त्या व्यक्तीला 'चांगलं' वा 'वाईट' असं लेबल लाऊ शकत नाही.
सगळ्या विचारांनी अस्वस्थ करणारा हा चित्रपट आहे. एखाद्या रिकाम्या रस्त्यावरून जाताना जसे 3 अनपेक्षित विदारक बिलबोर्डस धक्का देत एकामागून एक जातात तसेच आपण अनपेक्षितता आणि पोटात एक गोळा घेऊन आपण चित्रपटगृहाबाहेर पडतो.
- रमा
Comments