या सिनेमाच्या कथेत कोकणातलं लहानसं गाव, त्यातला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारा प्रसिद्ध केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली प्रसिद्ध सायकल आहे. गज्या - मंग्या हो चोरांची जोडगोळी गावागावांत, घराघरातून हात मारत असताना ही सायकल चोरतात, त्याची ही गोष्ट!
केशव, हुशार आहे, सज्जन आहे, म्हणूनच गावातल्या लोकांत त्याला मान आहे. बाकी तो लोकांना मदत करण्यासाठी कासेची लंगोटी काढून देईल, पण त्याची एक कमजोरी आहे. त्याचा जीव अडकला आहे सायकलमध्ये! आजोबांनी वडिलांना डावलून ती आपल्याला दिली, आणि म्हणूनच त्यांची ज्योतिषविद्याही तिच्याद्वारे आपल्याला बहाल केली असा त्याचा वेडा समज आहे. एरवी वस्तूत अडकून पडायचं नाही हे पाळणारा, इतरांना सांगणारा केशव 'सायकल' विषयी मात्र फक्त हळवाच नाही, हट्टी आहे. प्रत्येकाचा एक weak point असतो. त्याला धक्का लागला की तो माणूस कोलमडतो, तुटून पडतो, शक्ती गमावून बसतो. तसंच केशवचं होतं. इतकं की "केशवमुळे सायकल की सायकलीमुळे केशव"असा प्रश्न पडावा. चोरांच्या (प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम) आयुष्यात सायकल काय येते आणि प्रेम, आपुलकी, माणुसकी या तत्त्वांचं बळ त्यांना कळून तेही 'ईदं न मम' भावापाशी पोहोचतात.
शेवटी छोट्या मृण्मयीला हातांनी उडणारी सायकल करून दाखवणाऱ्या केशवला आपली माणसं, त्यांचं आपल्यावरचं प्रेम, भौतिकाची नश्वरता उमजते आणि तो जणू स्वतःच मोकळ्या मनाने उडू लागतो.
चित्रपटाचे कास्टिंग अतिशय उत्तम आहे. ह्रिषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम या मेन कास्ट सोबतच केशवची बायको, वडील आणि सर्वात गोड म्हणजे केशवची लहान मुलगी यांचं खूप छान काम झालं आहे. गावातील इतर लोकांच्याही छोट्या छोट्या भूमिका मस्त जमल्या आहेत. तो काळ, तो प्रदेश अगदी व्यवस्थित रंगवला आहे.
सहज साधेपणे खोल तत्वज्ञान सांगणारा असा हा सिनेमा मला वाटला. आपल्या मानासारखीच चालणारी, धावणारी, अडखळणारी, पंक्चर होणारी पुन्हा उठणारी, भरधाव धावणारी 'सायकल'. हिच्यासाठी काहीपण..
--------------------------------
--------------------------------
Rating - 4/5
नक्की पाहा!
नक्की पाहा!
- रमा
Comments