'कॉलिंग सेहमत' पुस्तकावर आधारित आलिया भट स्टारर
'राझी' पाहिला. सत्यकथा असलेल्या या फिल्म मध्ये आलिया भटने मुख्य भूमिका 'सेहमत' साकारली आहे.
तुम्ही लष्करात एखाद्या हुद्यावर काम करत असाल तर तुमचे नाव अभिमानाने मिरवले जाते. पण अनेक गुप्तहेर असतात जे हेरगिरीचे प्रशिक्षण घेऊन शत्रूपक्षाकडून माहिती काढून पुरवण्याचे काम करतात. देशासाठी गुप्तपणे, काम करणारे हे हेर शेवटपर्यंत गुप्तच राहतात. त्यांचं काम, बलिदान देशासमोर कधीच येत नाही. पकडले गेले तर देश त्यांच्या संरक्षणाला धावून येत नाही. त्यांचा त्यांनाच निभाव करावा लागतो.
1971 च्या भारत-पाक युद्धाचे शक्यता लागून आहे, अशा वेळी एक 20 वर्षीय तरुणी, जिचे वडील, आजोबा जे भारताचे स्वातंत्र्यसेनानी होते, तिचे लग्न पाकिस्तानातील आर्मीतील मोठ्या हुद्यावर काम करत असणाऱ्या उच्चभ्रू घरात केले गेले आणि तिने हेर म्हणून अत्यंत महत्त्वाची माहिती गुप्तपणे भारतात पाठवण्याचे काम केले त्या सेहमतची ही कथा आहे.
आलियाने 'उडता पंजाब', 'हायवे' सारख्या फिल्म्समध्ये मध्ये आपलं अभिनय कौशल्य वेळोवेळी दाखवलं आहेच. सेहमतची भूमिकाही तिने अतिशय 'Heart & soul' पासून वठवली आहे. आलियाचे कौतुक करावे तितके कमीच, पण सिनेमात विकी कौशल, रजत कपूर, जयदीप अहलावत, शिशिर शर्मा, अमृता खानविलकर, सोनी राझदान हे लहान, लहान भूमिकांत चमकून जातात.
पटकथा, संवाद छान आहेत. तुम्ही खुर्चीला खिळलेलेच राहता, कधी कधी तर जीव मुठीत घेऊन. मेघना गुलजारने पुन्हा एकदा तिची थ्रिलर फिल्म्सवरची हातोटी सिद्ध केली आहे. शंकर, एहसान, लॉय यांचं संगीत, गुलजार यांनी शब्दबद्ध केलेली गाणी कथेला साजेशी आहेत. 'दिलबरो' हे बिदाई च्या वेळेचे गाणे आणि 'ए वतन' हे देेशभक्तीपर गीतं तर डोळ्यात पाणी आणतात. इथे हा देश चांगला, तो देश वाईट असा कसलाही आभास निर्माण केलेला नाही. उलट 'वतन के आगे कुछ नही' हे दोन्ही देशातील लोकांसाठी सारखेच आहे, असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पटकथा, दिग्दर्शन यातला सच्चेपणा लगेच दिसून येतो.
नक्की पाहा. माझे रेटिंग - 4/5
- रमा
Comments