एक साधारण माणूस ब्रिजमोहन (अर्जून माथूर) कर्जाच्या बोझ्याने परेशान आणि जीव मुठीत घेऊन असताना हतबल होऊन स्वतःच्याच मृत्यूचा देखावा रचतो, पण स्वतःच्याच खुनाबद्दल त्याला शिक्षा ठोठावल्या जाण्यापर्यंत गोष्टी हाताबाहेर जायला लागतात. आणि तो एका संकटातून बाहेर पडतो न पडतो तो अजून वेगळ्या संकटात फसायला लागतो. अशी एकंदर 'ब्रिजमोहन अमर रहे' ची मनोरंजक संकल्पना आहे. कलाकारही चांगले आहेत. अधूनमधून रटाळ व्हायला लागतंय असं वाटतं तोच परत पेस वाढते.
शिव्या, अनैतिक संबंध आणि सेक्स शिवाय नेटफ्लिक्स ओरिजिनल येतच नाहीत जणू. छान ब्लॅक कॉमेडी चालू असताना अचानक कसलातरी विनाकारण अश्लील छपरीपणा सगळं फिस्कटून टाकतो.
"मनुष्याला शेवटी आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात" हा संदेश यात दिला आहे. नेटफ्लिक्स फिल्मसची जमेची बाजू म्हणजे गोष्ट कोणत्याही कॅरेक्टरला ग्लोरिफाय केलेलं नसतं. पण या सिनेमात प्रत्येक पात्राची ब्लॅक साईड हायलाईट केलेली आहे. आणि त्याची आपल्याला सवय नाही.
जबरदस्त पंची डायलॉग्ज, जुन्या गाण्यांचा चपखल ठिकाणी वापर याने काही ठिकाणी मजा येते. या कल्पनेवर अजून छान ड्रामा करता आला असता. पण केवळ ट्रेलर बघून पाहायला बसला तर निराश होऊ शकाल. यात ड्रामा आहे, ऍक्शन आहे, ह्यूमर आहे. हे सारं असूनही चित्रपट एक अपूर्ण ब्लॅक कॉमेडी आहे असं वाटतं.
असो. रिकामटेकडे असाल, शिव्यांच्या भडिमारात चित्रपट पहायची सवय असेल आणि नेटफ्लिक्सवरचं सगळं पाहणारच असा पण केला असेल तर पाहा. एकदा पाहण्यासारखा आहे. बस. स्पेशल काही नाही.
रेटिंग- 2.5/5
- रमा जाधव
Comments