बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी
कौशिक कुटुंब, मध्यमवयीन जोडपं, त्यांना एक तरुण मुलगा लग्नाला आलेला, तर दुसरा किशोरवयीन मुलगा,
आणि आज्जी, हे दिल्लीतले एक सामान्य कटुंब. एखाद्या बाळाचं येणं एखाद्या कुटूंबासाठी किती आनंदाची गोष्ट असते. येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी सारे अगदी सज्ज असतात. पण कौशिक कुटुंबावर बॉम्ब पडतो जेव्हा 50शी उलटलेलं आलेलं जोडपं जितेंदर (गजराज राव) आणि प्रियंवदा (नीना गुप्ता) यांना नवीन बाळाची चाहूल लागते.
या ' Good news' कडे घरातल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन या सगळ्या ची ही गोष्ट आहे. अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नकुल (आयुषमान खुराना) हा कौशिकांचा मोठा मुलगा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, प्रेमजीवनावर याचा होणारा परिणाम हे जरी कथानक असले तरी ते सेकंडरी म्हणावे लागेल. खरी कथा आहे, तिसऱ्यांदा मूल होणाऱ्या, तेही 50शी उलटलेल्या, अशा जोडप्याची. गजराज आणि नीना यांचा अभिनय जबरदस्त आहे. गजराज राव यांना तर काही सीन्स मध्ये संवाद नसूनही केवळ हावभावांवरून मस्त धमाल आणली आहे. एकच नंबर. नीना गुप्तानेही मध्यम वयात आलेल्या गरोदरपणाची जबाबदारी झटकून न देता लोकांच्यात वावरताना दडपून गेलेली गृहिणी छान साकारली आहे. आणि चित्रपटाच्या शो स्टीलर आहेत दादी (सुरेखा सिक्रि). सगळीकडे भाव खाऊन गेल्या आहेत. टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातील नकुल व धाकटा गुलेर यांना आईवडिलांनी एखादे पाप केल्यासारखे वाटून लोकांना तोंड दाखवणेही लाजिरवाणे वाटू लागते. नकुलची गर्लफ्रेंड रेने यांच्या कुटुंबातील सांस्कृतिक फरक आणि या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोन यावरून तथाकथित उच्चभ्रु घरातही या गोष्टीकडे पाहण्याचा awkwardness, दिसून येतो.
पात्रं अतिशय साधी, आपल्या आसपासची असतील असे वाटायला लागतील अशी वाटतात. त्यामुळेच आपली आपलीशीही वाटतात. संगीत साजेसं आहे, संवाद खटकेबाज आणि विनोदाचं टायमिंग क्लासिक आहे.
चित्रपट तुम्हाला संदेश देतो, " There is no age to make love" , चित्रपटा च्या ट्रेलर मध्येच एक वाक्य आहे, गर्लफ्रेंड सोबत रोमँटिक होताना अचानक लाजून, चिडून नकुल म्हणतो, "यार ये भी कोई मम्मी-पप्पाके करने की चीज है?" आपण खूप हसतो. चित्रपट आहेच तसा हसायला लावणारा. पण त्याचवेळी आपल्याला विचार करायला भाग पाडतो, मम्मी-पप्पा ने 'वो चीज' केली नसती तर आपण ही या जगात आलो नसतो. मध्यमवयीन पालकांच्या लैंगिक जीवनावर भाष्य करणं आपल्या समाजात जवळजवळ टाळलेच जाते. एकूणच लैंगिक जीवनाकडे पाहण्याच्या कोत्या मनोवृत्तीकडे हा सिनेमा बोट दाखवतो. पण अगदी हसतखेळत. अतिशय सहज, विनोदी अंगाने.
मी खूप च एन्जॉय केला. तुम्हीही करा. मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी बधाई हो!
रेटिंग- 4/5
- रमा
Comments