व्यवसायाने प्रथितयश डेंटिस्ट पण, रक्तात अभिनयाची ओढ असलेला एक गोरा, घारा तरुण. केवळ एक प्रॉम्पटर म्हणून रंगभूमीशी नातं ते मराठी रंगभूमीचा पहिला-वहिला सुपरस्टार, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतले मोठे स्थित्यंतर, एक टप्पा असा सगळा प्रवास असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील बायोपिक. सुबोध भावे पुन्हा एकदा बायोपिकमध्ये म्हंटल्यावर मला आधी शंका होती. पण यावेळीही सुबोधने बाजी मारलीच आहे.
एका 'सुपरस्टार' चा उदय ते अंत त्याने खडतर प्रयत्नांनंतर लीलया साकारले आहे. सुबोध भावे मूलतः अतिशय अंतर्मुख माणूस आहे, त्याने साकारलेल्या भूमिकेच्या अगदी उलट. घाणेकरांच्या व्यक्तिमत्वाचा त्याने अंतर्बाह्य अभ्यास केलेला आहे हे अगदी जाणवतं. आमच्या पिढीला डॉक्टरांचे दर्शन फारसे घडले नाही (पाठलाग आणि गोमू संगतीने सोडून) पण सुबोध भावेनी ते घडवून आणले आहे. चित्रपटाच्या इतर कास्टिंगबद्दलही मला शंका होती पण सुलोचना दीदीं च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असो किंवा प्रसाद ओकचा प्रभाकर पणशीकर असो, त्यांनी चांगले बेअरिंग पकडले आहे.
एक स्वकेंद्री, बेदरकार, फटकळ, व्यसनी, विक्षिप्त, लफडेबाज, चाहत्यांच्या टाळ्या आणि शिट्यांना हपापलेला, भूमिकेत अडकून पडलेला नट अशी एक ओळख तर दुसरीकडे कायम वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेला, रंगभूमीवर वेड्यासारखे प्रेम करणारा पण यश पचवू न शकणारा, माणसं तुटून वेगळी वेगळी झाल्यानंतर एकटा पडलेला तरी मुजोर,अशी एक ओळख अशा सगळ्या ब्लॅक, व्हाईट, ग्रे सगळ्या स्वभावछटा सुबोधने सुंदर साकारल्या आहेत. पहिली बायको इरावती (नंदिता धुरी) व दुसरी पत्नी कांचन (वैदेही) यांबरोबरचे त्यांचे संबंध, भालजी पेंढारकर, वसंत कानेटकर यांसारख्या मातब्बर, प्रसिद्ध लोकांमुळे यांचे पुढे येणे, त्याबरोबरच प्रभाकर पणशीकर (प्रसाद ओक) यांच्यासारखा मित्र ज्यांनी वेळी-अवेळी, चांगल्या-वाईट परिस्थितीत त्यांना साथ दिली हेही छान रंगवलं आहे.
डॉक्टर घाणेकर करिअरच्या एका टोकावर असताना डॉक्टर श्रीराम लागू किंवा त्या विचारसारणीच्या कलाकारांचं आगमन झालं. प्रयोगशीलता सुरू झाली. ती एका प्रकारे डॉक्टर काशिनाथ घाणेकर पर्वाच्या शेवटाची नांदी होती. सुमित राघवन यांनी रंगवलेले लागूंचे पात्र ही अतिशय सुरेख झाले आहे. खरे तर तीही त्यांची परीक्षाच म्हंटली पाहिजे. डॉक्टर घाणेकर आणि डॉक्टर लागू यांच्यात रंगभूमीची रणभूमी होण्याइतका तणाव थोडा अतिरंजित वाटतो. दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचे काम खूपच प्रभावी झाले आहे. गाणीही छान. बॅकग्राऊंड म्युझिक विशेषकरून खूपच सुंदर.
कधी कधी नियती तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवते. पण हे यश पचवता आले नाही तर होणारी सैरभैर अवस्था, यशाचं व्यसन आणि ते न मिळता एक प्रकारचं withdrawal, फरफट आणि दुःखद अंत याकडे नियतीही हताशपणे पाहत बसते. तुम्ही सामान्य व्यक्ती असा किंवा कोणी सुपरस्टार या चक्रातून सारेच जातात. तुम्ही, मी,
"आणि... डॉक्टर काशिनाथ घाणेकर"..
रेटिंग- 4/5
- रमा
Comments