Skip to main content

रिंगण! सुटता तुटेना माऊली..

रिंगण! आज घरातल्या देव्हाऱ्यात एकलाच उभा पांडुरंग बघून मकरंद माने दिग्दर्शित 'रिंगण' ची आठवण आली. अर्जुन मगर (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा अभिमन्यू (साहील जोशी) या बापलेकाची कथा.



 दुष्काळाने कर्जाच्या ओझ्यात पिचलेला शेतकरी, त्यात गहाण गेलेली जमीन. आत्महत्येचे सततचे विचार झटकून, पोरासोबत पंढरपूराला जातो. पोराची आई देवाच्या गावाला गेली असं सांगितल्यामुळे, इथे माझी आई सापडेल अशी आशा घेऊन आलेला 7-8 वर्षाचा त्याचा मुलगा. निराशेतून आत्मविश्वासाने, श्रद्धेने सकारात्मक मार्ग दाखवणारा 'रिंगण'.

 बापलेकाचे नाजूक नाते, पापभिरू निष्पाप अर्जुन मगर आणि त्याचा निरागस मुलगा अभिमन्यू पंढरीच्या गावी तरी काही पदरी पडेल का अशी आशा करत आलेले असतात त्यांची कथा. पंढरपूरला वारीला रिंगण सोहळे असतात त्यामुळे तर हे नाव साजेसे आहेच पण आपण ज्याला चमत्काराच्या अपेक्षेने शोधत फिरतो, तो कुठे ना कुठं आपल्या सोबत निरनिराळ्या रूपात सकारात्मकता देऊन जातो. आपल्या मातीशी सुरू झालेला प्रवास पुन्हा आपल्या मातीशी नेऊन पोहोचवतो असे रिंगण. आपल्याजवळ जे नाही त्या पळत्याच्या पाठी धावता आपण हातचं सोडत जातो हे आपल्याला कळतंच नाही, हेही यातून उमगते. 

शशांक शेंडे आणि साहिल जोशी दोघेही या सिनेमाचे हिरो आहेत. कमाल नैसर्गिक अभिनय. कुठेही ओढून ताणून काही नाही. दुष्काळाने ग्रासलेला शेतकरी ज्याला मुलालाही सांभाळायचे आहे, आणि त्याच्या साठी तरी आत्महत्येचा विचार झटकून तो एक मार्ग धरतो. वाटेत काटे नाहीत असं नाही, पण आजवर इतकी दुःख बघितली तर बघू चालून हाही मार्ग, असा बाप शशांक शेंडेनी खूपच उत्कटतेने साकारला आहे. कधी देवाच्या गावातही सामान लुटल्या गेल्याने, कधी परक्या गावात मुलगा हरवल्याने गांगारलेला बाप, मुलाशी मित्रासारखं लहान होऊन खेळणारा बाप, 'आई' चा हट्ट धरणाऱ्या मुलावर चिडणारा बाप सगळ्या भावना काळजाला भिडणाऱ्या. दुसरीकडे आपले छोटे भिडूही काही कमी नाहीत. साहिल जोशीचा चेहऱ्यावरचे हावभावही लाजवाब. इतका निरागस, इतका बोलका. खूप सुरेख. सहकलाकरांचे कामही छान. रोहित नागभिडे यांचे चित्रपट संगीतही साजरं!

मलाही मग आज कळलं, देव्हाऱ्यात रुक्मिणी नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा, माझ्याकडे विठूमाऊली आहे याचा आनंद कितीतरी पटीने जास्त आहे. अनेक पुरस्कारांची बरसात झालेला, सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असा रिंगण बनवताना आणि प्रदर्शित करताना  मात्र लेखक, दिग्दर्शक मकरंद मानेचे कष्ट पाहता, ते प्रेक्षकांशी पोहोचल्यावर सफळ संपूर्ण असेच म्हणावं लागेल. नेटफलिक्स वर आलाय. नक्की बघा. रिंगण. प्रयत्नांनी सुटेल, आत्मविश्वासाने तुटेल...

- रमा

Comments

Popular posts from this blog

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...