Skip to main content

मेरी यादमें तुम ना आंसू बहाना...

25 जून 1924 ला मदन मोहन कोहली यांचा जन्म इराणी कुर्दीस्तान येथे झाला. त्यांचे वडील बहादूर चुनीलाल तिथे अकाऊंट जनरल म्हणून काम करत. लहान वयातही मदनमोहन यांना गाण्याचा भलता शौक होता. आणि वडिलांच्या रेकॉर्ड कलेक्शन मधील कुठलेही गाणे स्वतः काढून ऐकण्याचा छंद ते अति लहानपणी सुद्धा कधीही पुरा करू शकत होते. त्यांना लाहोर ला त्यांच्या आजोबा हकीम योगराज यांच्याजवळ ठेवून त्यांचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. लाहोर ला शालेय शिक्षणासोबतच त्यांनी थोडे शास्त्रीय संगीत शिक्षण स्थानिक शिक्षकांकडे घेतले.


भारतात आल्यावर वडिलांच्या इच्छेखातर 1943 मध्ये मदन मोहन आर्मीत रुजू झाले. पण त्यांचे पहिले प्रेम संगीत. त्यामुळे त्यांनी वडीलांच्या अनिच्छेने देखील आर्मी सोडली आणि 1947 मध्ये ऑल इंडिया रेडिओ, लखनौ येथे प्रोग्रॅम असिस्टंट म्हणून काम पाहू लागले. काही कार्यक्रमांच्या प्रसारणाचे संगीतही त्यांनी दिले. संगीतातील दिग्गज कलाकारांचा, कार्यक्रम आणि प्रसारण यासाठी त्यांना प्रदीर्घ सहवास वेळोवेळी मिळाला. त्यांचे खरे शास्त्रीय संगीत शिक्षण सुरू झाले ते इथेच. तराण्यांची राणी जद्दन बाई (भारतातील मोजक्या महिला संगीतकारांपैकी एक) आणि गज़ल गायिकांची मलिका बेगम अख्तर या दोघींना ते अतिशय मानत. त्यांच्यामुळेच खयाल गायिकी आणि गज़ल यांचा जो सुरेख मेळ त्यांच्या संगीतात दिसून येतो तशी अद्वितीय सर कुणालाच येणार नाही. 

1948 मध्ये ते मुंबईला आले. आणि फार कमी काळ त्यांनी एस.डी. बर्मन आणि श्याम सुंदर यांना सहायक संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले. त्यांनी वैयक्तिकपणे संगीत दिलेला चित्रपट 'आँखे'. अशा प्रकारे साधारण 25 वर्षे त्यांनी चित्रपट जगतात काम केले. (92 फिल्म्स, ज्यातील 2 त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले.)दुर्दैवाने त्यांनी संगीत दिलेले बरेचसे सिनेमे बॉक्स हिट्स नव्हते किंवा 'बी' ग्रेड होते. 

त्यांच्यासारखा गज़ल बादशाह हिंदी चित्रपट संगीतात झाला नाही. त्यांचं संगीत कर्णमधुर आणि बरचसं शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. 

 सुरुवातीला लता मंगेशकर यांनी मदनमोहन यांच्या सोबत काम नाकारले होते. 'रईस बाप के बिगडे बेटे' एवढीच त्यांची ओळख लताबाईंना होती. विरोधास असा की हीच जोडी संगीत विश्वात नंतर "Made for each other" म्हणून ओळखली जाऊ लागली. "लता मंगेशकर यांना मदनमोहन यांच्या संगीतातून वजा केलं तर राहिलं काय?" हा अनेक टीकाकारांनी विचारलेला प्रश्न आहे. काय राहिलं? तलत आहे, रफी आहे. माझ्या मते हा प्रश्नच चुकीचा आहे. आणि असेल तर त्या काळातील सर्व संगीतकारांना लागू आहे. (अपवाद- ओ. पी.)आणि लता मंगेशकर यांनाही का वजा करायचे? "माई री", "हम प्यार में जलने वालोंको", "नैनोमें बदरा छाये", "नैना बरसे रिमझिम",  केवळ लताबाई श्रेष्ठ की मदनमोहन या वादासाठी ही अशी रत्नावली वगळणे मूर्खपणाचे ठरेल. लता मंगेशकर म्हणजे मदनमोहन यांचा हुकूम, गज़ल त्यांची खासियत आणि सतार सोडून जणू मदनमोहनच नाहीत.

"कदर जाने ना" (भाई-भाई, 1956 लता मंगेशकर) ही एक गज़ल प्रेरित सुमधुर गीत. पण मदनमोहन यांच्या तालबंधाने त्याला वेगळाच अर्थ आणला आहे. फक्त तालामुळे नाही तर राग भैरवीचा यात वेगळाच वापर आहे. असं सांगतात, जेव्हा बेगम अख्तरनी हे गाणे ऐकले, त्या भारावून गेल्या. त्यांनी मदनमोहनना बोलवून कौतुकाचा वर्षाव तर केलेच आणि हे गाणे म्हणायची विनंती केली. प्रत्यक्ष गज़लसाम्राज्ञीला कसा नकार देणार? 20 मिनिटे मदनमोहन गात होते. 

संगीतकाराने फक्त संगीत द्यायचे नसते. गीत जर शरीर असेल तर तर संगीत आत्मा असतो. सांगीतिक प्रयोगांबरोबर, शब्दांशी खेळण्याची कला मदनमोहन यांना अवगत होती. शब्दांची खोली वाढावी यासाठी ते संगीताचा योग्य वापर. उदाहरणार्थ "आज सोचा तो आँसू भर आये" यातील शब्दांतील योग्य पॉज 'ठेहराव', त्यानंतरचे भावनापूर्ण संगीत, तसेच "रुके रुके से कदम", "दिल ढुंडता है, फार वोही" असे शब्दांना असे संगीत देऊन त्याचा अधिक प्रभावशाली परिणाम साधणे. मदनमोहन यात मास्टर होते. 

  "हकीकत" (ज्याला मी हिंदीतील सर्वोत्तम युद्ध सिनेमा समजतो), मदनमोहनने आर्मी सोडल्याचे कर्जच फेडले या सिनेमातील संगीताने. सिनेमातील सर्वोत्तम देशभक्तीपर गीत "आर्मी सॉंग" "कर चले हम फिदा" असले तरी मदनमोहन च्या संगीताने नटलेले अजून एक सुंदर गीत "होके मजबूर मुझे, उसने भुलाया होगा", जवानांचे विरहगीत. 'भुपिंदर सिंग','मोहम्मद रफी', 'तलत' आणि 'मन्ना डे'. चार लोकप्रिय गायकांना एकत्र गायला लावण्याची अशी हिम्मत फार कमी संगीतकारांमध्ये असेल. व्यक्ती भिन्न, वय वेगळे. पण "आपल्या मागे, कुणी ना कुणी हताश होऊन आपल्याला आठवणीतूनही दूर केले असेल" ही व्याकुळता, हीच आर्तता साऱ्यांच्या आवाजात. अमर गीत. 

1970 ला 'दस्तक' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मदनमोहनच्या कामात विविधता होती. तरी एक क्लास जपूनच. त्यांच्या टीकाकारांच्या मते, ते एखादा राग 'उथळतेने' वापरतात. पण खरं तर त्यांचं सांगितिक विश्व इतकं अपार आणि अभ्यासपूर्ण होतं, समन्वित आणि संपन्न! वर सोपे वाटले तरी जटिल असे. एखादा चमत्कारच!मदनमोहननी हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळी दिशा दिली. पण टिपिकल "कंपू पद्धती स्वभाव" नसल्याने त्यांना खूप वाईट स्पर्धेला एकट्याने तोंड द्यावं लागलं. त्यांना मोठा आधार देणारी व्यक्ती म्हणजे 'चेतन आनंद'. संगीतजगातील प्रसिध्द लोकदेखील त्यांना यश मिळू नये म्हणून, "हा जिंक्स्ड संगीतकार आहे, याची गाणी असली की फिल्म पडते" असल्या अफवा पसरवत. रेकॉर्डिंग स्टुडिओज आणि वादक रिझर्व्ह करून ठेवणे, जेणेकरून त्यांना रेकॉर्डिंग करणे जमू नये, अशा गोष्टी करत. त्यामुळे नाईलाजाने ते आपल्या आवाजात घरी रेकॉर्ड करून ठेवत. असा हा संवेदनशील कलावंत रोशन, जयदेव या मित्रांना देखील दूर करत अखेरच्या दिवसात कोशात गेला, आणि अति मद्यपानामुळे लिव्हर सिर्होसिसने 14 जुलै, 1975 ला गेला. केवळ 51 वर्षांच्या वयात

किती भविषयसुचक आहे त्यांनीच संगीतबद्ध केलेले गाणे....

हमारे बाद अब महफ़िल में अफ़साने बयाँ होंगे
बहारें हमको ढुंढेंगी, ना जाने हम कहाँ होंगे।

श्रद्धांजली मदन मोहन

- रमा जाधव
(अनुवादित)

मूळ-
A Tribute to Madan Mohan
©Vikram Appasaheb Jadhav
Kolhapur, 14 July 2019.

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...