Skip to main content

रॉबिन्स वाली दिवाळी

अलीकडेच पिकलपोनीला अन्नाचं महत्त्व कळालं होतं, आणि ती अन्न अजिबात वाया घालवत नव्हती. ही भाजी नको, ती भाजी नको असली नाटकं आता एकदम बंद झाली होती. तरीसुद्धा त्या दिवशी उपाशी माणसांचं बघितलेलं ते दृश्य तिच्या डोळ्यांसमोर अजून काही हलत नव्हतं. कितीतरी लोक अजून अन्नापासून वंचित आहेत, रोजच्या रोज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते हे किती वाईट्ट आहे हे तिच्या मनातून जायला तयार नव्हतं. तोच एकदवस दादुची मैत्रीण नूपुर घरी आली. नूपुर ताई पिकलपोनीची खूप आवडती होती. नवीन नवीन गोष्टी सांगायची, खूप वेगवेगळ्या गोष्टी करायची, एकदम तरतरीत आणि ऍक्टिव्ह. एके दिवशी ती आली एक ग्रीन टी-शर्ट घालून. त्यावर लिहिलेलं 'रॉबिनहूड आर्मी'. आत जाऊन दादा कपडे बदलून आला तर त्याने पण तसाच शर्ट घातला होता. आता पिकलपोनीला मोठीच उत्सुकता लागून राहिली. "नूपुर ताई, हे काय आहे? युनिफॉर्म आहे का? तुम्ही काय करणार आहात? रॉबिनहूड आर्मी म्हणजे काय? रॉबिन हूड म्हणजे तो गोष्टीतला का?" तिने प्रश्नांचा एकदम भडीमार सुरु केला. "ए बाई, आम्ही रॉबीनहूड आर्मीचे स्वयंसेवक आहोत. काम करायला जाणार आहोत. कळलं?", दादुने खवचटपणा केलाच. पण नूपुर ताईने तिला जवळ घेतलं आणि दादूलाच फैलावर घेतलं मस्तपैकी, "तिलाही कळू दे की आपलं काम. ती अजून काही जणांना सांगेल आणि आपला हेतू साध्य व्हायला मदतच होईल की रे, तू हे असं झिडकारून बोलणं बंद कर तिला." पिकलपोनी सुखावली.
"तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे हा मी पिकू. हो रॉबिन हूड म्हणजे तो गोष्टींमधलाच. तरबेज तलवारबाज आणि तिरंदाज जो अति श्रीमंत लोकांना लुटायचा, पण ते सारं काही स्वतःकडे न ठेवता गरीब, लाचार लोकांमध्ये वाटून द्यायचा. म्हणजे तो डाकूच म्हणायचा खरंतर, पण चांगलं करणारा. दानशूर. गरिबांचा त्राता." पिकलपोनी डोळे विस्फारून ऐकत होती. "म्हणजे तुम्ही आता त्याच्या आर्मीत जाऊन लोकांना लुटणारे?", तिने विचारलं. दादु हसत गडाबडा लोळायला लागला. नूपुर ताई हसून म्हणाली, "नाही गं वेडाबाई, ही जी रॉबिनहूड आर्मी स्थापन झालीये, ती एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. ८००० पेक्षा जास्त स्वयंसेवक, वेगवेगळ्या वयोगटाचे १३ देश आणि ४१ शहरांमध्ये काम करतो आम्ही." हॉटेल्स, पार्टिज, लग्न समारंभासारखे कार्यक्रम जिथे ताजं अन्न उरतं, आणि वाया जातं, त्याची नासाडी होऊ नये म्हणून ते ताजं अन्न गोळा करून आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवतो." पिकलपोनीला ती आजारी आणि गरीब उपाशी लोकं, लहान मुलं आठवली आणि तिला गहिवरून आलं. "हो गं ताई, मी पाहिलीत लोकं लग्नात नको ठेवढं वाढून घेतात गरज नसतानाही, आणि तशाच भरल्या प्लेट्स टाकून देतात. किती वाईट. आणि दुसरीकडे कितीतरी लोक अन्नावाचून तडफडत असतात. मग तुम्ही त्यांना हे अन्न नेऊन देता? किती छान!"आता दादू पण संभाषणात शिरला, "आणि म्हणूनच ना पिकू, मी रात्री कधीतरी उशिरा बाहेर जातो ना, ते आम्हाला कॉल्स येतात २००-४०० वगैरे लोकांचं सुद्धा जेवण उरलेलं असतं कधी कधी. आणि मग रात्री-अपरात्री हे अन्न वाया जाऊ नये, गरजवंतांच्या पोटी जावं म्हणून आम्ही तिथे पळतो." एक वेगळंच समाधान दादू आणि नूपुर ताईच्या चेहऱ्यावर होतं, "आणि ना पिकू, कितीही कष्ट करायला लागू देत, ते अन्न त्यांच्या पोटात गेलं ना की किती बरं वाटतं ना, ती भावनाच खूप ग्रेट असते. त्याशिवाय कुठलाही मोठा आनंद जगात असेल असं वाटत नाही."
नूपुर ताई म्हणाली "आता दिवाळी पण आलीये ना, तर मग आम्ही सारे रॉबिन्स ज्यांना कुणाला मदत करायचीय अशा लोकांकडून फराळ आणि मेणाचे दिवे घेऊन या लोकांकडे जाऊन त्यांना फराळाची पाकिटं देणार, त्यांच्या घरातही दिवे लावणार. छोटीशीच का होईना दिवाळी साजरी करणार जी लाख मोलाची असेल." पिकू हे सगळं ऐकून खूप खूप प्रभावित झाली. "ए मला पण व्हायचंय रॉबिन, मी कशी मदत करू शकते?", नूपुर ताई एकदम खुश झाली आणि म्हणाली, "तू ना पिकू, खूप लोकांपर्यंत ही माहिती पोहोचव. आपला ध्येय काय आहे 'भूकेवर मात, आशेला साथ". मग झालीस तू मोठं काम करणारी छोटी रॉबिन. आता आपली छोटी रॉबिन तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करणार आहे,
"या दिवाळीत संकल्प करा, रॉबिनहूड आर्मीची मदत घ्या आणि अन्नाची नासाडी थांबवा, लोकांची भूक भागवा, आनंद वाटा आणि त्यातून आनंद मिळवा"
- रमा



Comments

Popular posts from this blog

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...