सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती.
गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय.
केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं.. कायम समुद्रात असणारी कासवीण अंडी घालण्यासाठी मात्र किनाऱ्यावर येऊन खड्डा करून त्यात अंडी घालते. पण पिल्लं अंड्यातून बाहेर यायच्या आधीच ती परत पाण्यात निघूनही जाते. नुकतीच जन्माला आलेली पिल्ले एकमेकांसोबत आणि तरी एकेकटी समुद्राकडे जायला निघतात. शेवटी त्यांना समुद्रात जावंच लागतं. असुरक्षित वाटलं की कासव अंग आकसून आपल्या कवचात घुसून बसतं. पण पुन्हा समुद्राचा सामना करण्यासाठी, आयुष्याला भिडण्यासाठी त्या कवचातून, शेलमधून बाहेर पडावं लागतं प्रत्येकाला.
"घेई ओढुनी सर्वत्र विषयातुनी इंद्रिये
जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली''
गीताईतलं हे वचन दत्ताभाऊंच्या तोंडून ऐकताना आपण एक जीवन विषयक पायरीच जणू चढतो. निसर्गाच्या चक्रासारखं हे माणसांचेही एक चक्र आहे. नैराश्याशी झगडत त्यातून उभी राहणारी 'स्व' शोधणारी जानकी, नैराश्यात गुरफटलेला तरुण मुलगा, नैराश्य म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग असे समजणाऱ्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा यदु, एक अभ्यासक दत्ताभाऊ अशा पात्ररचनांशी कासवांचा संबंध काय? एक रूपक आहे. 'अस्तु' मध्ये जसा हत्ती होता ना तसंच. पण ते पडद्यावरच पहा. काय आणि कोणते प्रसंग सांगायचे म्हंटलं तर पूर्ण चित्रपटच उलगडला असं होईल. सर्वच कलाकारांचा सर्वांगसुंदर अभिनय, सुंदर पार्श्वसंगीत, लोकगीतांची चुणूक असलेली साधीच पण मनाला स्पर्शणारी गाणी.'लहर समंदर रे' गाण्याची रचनाच कल्पक आणि सुरेख आहे. असं लाटेला लाट येऊन मिळावी तसं वाटतं आणि कमाल सिनेमॅटोग्राफी..काय सुंदर टिपलाय निसर्ग, त्याची विविध अंग, समुद्राच्या तरंगांच्या इतकी वेगवेगळी चित्रे.. खूप सुंदर.. वेगवेगळ्या दाखल्यातून, संवादातून उभी राहणारी ही गोष्ट एक वैचारिक माहितीपट नाहीये. हा चित्रपट आपल्याला खूप काही देऊन जातो. महत्त्व आधाराचं, स्वीकाराचं, दातृत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मातृत्वाचं. आवर्जून पहावा.
- रमा जाधव
Comments