
सुट्टी संपून गेली, आणि भूक मात्र अजून खवळली. शाळा सुटल्याबरोब्बर ती घरी जायला पळत निघाली. घरी पोहोचते तर बघते काय, घराला कुलूप. आई-बाबा अजून आलेले दिसत नव्हते. जेनी आंटींच्या घरातून काहीतरी बेक केल्याचा खमंग वास येत होता. दादू आला तो पुरचुंडीतून खारे दाणे खात खात. "मला दे दादू, पिकू अजीजी करत म्हणाली. "अगं, तुला शेंग भाज्या आवडत नाहीत असं सकाळीच तर ओरडत होतीस. दाणे शेंगेतच असतात. तुला नकोत ते. तिला चिडवत दादू दाणे नाचवत, खात खात म्हणाला.
एक तर भुकेने कासावीस जीव, त्यात दादू डोकं फिरवतो म्हंटल्यावर पिकूचा Travel to वैतागवाडी सुरु झाला. आई-बाबा आले, पण "मला भूक लागली" असं म्हणून हार कशी मानायची? अशा विचारात पिकू असताना बाबा म्हणाले दादू, पिकू चला फिरायला जाऊया. क्षणार्धात न खुलणारी कळी खुलली. आणि शहाण्यासारखी पिकू गाडीत जाऊन बसली. बाबांनी सहज गावातून एक फेरफटका मारून येऊ असं म्हणून नदी जवळच्या मंदिराशी गाडी आणली. बाहेर एके ठिकाणी अन्नाचा ढेर साठला होता. आजारी, वृद्ध, आणि लहान लहान मुलांची गर्दी जमली होती. थोडं-थोडकं का होईना पदरात पडावं म्हणून सगळ्यांची लगबग चालली होती. सगळ्यांच्या डोळ्यात भूक दिसत होती, पोट खपाटीला गेलेलं आणि अंग अगदी कृश झालेली अशी ती मंडळी.. "बरं का दादू, हे लोक त्यांना अन्न मिळत नाही म्हणून मिळेल तिथे मिळेल ते खातात. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी 'अन्न' एक आहे ना, ती सुद्धा काही लोकांची सहजासहजी पूर्ण होत नाही" बाबा सांगत होते..पिकू त्या सगळ्यांची दयनीय अवस्था बघून स्वतःची भूक विसरली. "आज आपण एक दिवस काही नाही खाल्लं तर आपली ही अवस्था झाली आणि ही सारी मंडळी तर सतत अन्नाला पारखी. हे सारे मिळेल ते खात आहेत. गरम-गार, गोड-तिखट, शिळं-ताजं काहीही न बघता. आणि आपल्याला पोट भरून जेवण मिळतं, आई पोषण देणारं अन्न देते, आणि आपण ते नाकारून त्याचा अपमान करतो, हे काही बरोबर नाही" ते काही नाही आता आपण अन्नाचा कधीही अपमान करणार नाही, आई जे बनवेल ते खाणार पिकलपोनीने मनोमन ठरवलं.
घरी येताच ती आईला बिलगली, "आई सॉरी. मी आता कधीच डबा न खाता आणणार नाही. अन्नाचा मान ठेवेन.", पटकन दप्तरातून डबा काढून पिकूने तो डबा संपवला. भूक भागली, मनही तृप्त झालं. आई नेहमी म्हणते ना, "अन्नाला भजून खावं ", ते आज तिने आचरणात आणलं होतं. आणि आज अन्न म्हणजे केवळ "उदरभरण नोहे जाणी हे पिकलपोनी"..हे ती शिकली म्हणून आईबाबा पण आनंदी झाले.
-रमा
(Photo Courtesy - Google)
Comments