मुस्लिम धर्मात 'हलाल' चा अर्थ आहे, वैध किंवा धर्मानुसार योग्य बलिदान. त्याप्रमाणेच हलाल चा अर्थ एखाद्या जीवाला हाल-हाल करून मारणे. हलाल ची वैवाहिक रूढी अशी की एखाद्या माणसाने जर आपल्या बायकोला त़लाक दिला आणि तिच्याशीच परत लग्न करायचे झाले तर आधी तिचे दुसरे लग्न लावायचे त्या व्यक्तीने जर आपणहून तिला (तीन महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन बिऊन) त़लाक दिला तर ती प्रथम पतीशी लग्न करू शकते. पुरुषाने उठसूट काडीमोड घेऊ नये यासाठी त्याला शिक्षा म्हणून असला विपरीत कायदा कुराण-ए-पाक मध्ये समाविष्ट होता. धर्मातील कायदे न समजून घेता तोडून -मरोडून लोकांपर्यंत येतात आणि मग 'ख़ुदा के लिए' ते त्याचे पालन करतात त्याने धर्माचा आंधळेपणा, समाजाचा दुटप्पीपणा आणि परिणामी लोकांचे हलालरूपी शोषण होते. तिहेरी त़लाक विरोधी अशी 'हलाल' ची कथा राजन खान यांच्या कादंबरी वरून घेतलेली आहे.
हलीम आणि खुर्दुस हे एक विवाहित जोडपे आहे, पण रागाच्या भरात खुर्दुस हलीमला तोंडी तिहेरी त़लाक देतो. 2 वर्षा साठी हलीमला माहेरी पाठवतो आणि आई वारल्यावर पुन्हा न्यायला येतो. पण वडील सरपंच आणि मौलाना पर्यंत सगळा मामला नेतात आणि 'हलाल नियम' पाळला तरच ती पहिल्या नवऱ्याकडे जाऊ शकेल म्हणून सर्वानुमते तिचे मौलानाशीच लग्न लावले जाते. शेवटी या सगळ्यात हलीमचे काय होते, काय निर्णय लागतो याची कथा म्हणजे हलाल. अनेक पुरस्कारांचा मानकरी चित्रपट हलाल यात प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, चिन्मय मांडलेकर, प्रीतम कागणे यांनी भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिवाजी लोटण पाटील यांचे दिग्दर्शन आहे.
खरे तर पुरुषसत्ताक या समाजात स्त्रीचे शोषण अगदी तडपून तडपून मारल्यासारखे. तिचे दुसरे लग्न लावणारे तिचे वडील, ती आपल्याकडे परत यावी यासाठी पहिला पती, दुसरा पती यांना तिला काय वाटते हे माहीत असून लक्ष्यात घेणं जरुरीचं वाटत नाही. स्वतःचं वागणं चुकीचं आहे हे कळत असूनही 'असं आपल्या धर्मात सांगितलंय' हा त्यांचा डिफेन्स. पहिल्याने वैतागून रागाच्या भरात सोडली, दुसऱ्याच्या गळ्यात बांधली. "माझ्यावर प्रेम असेल तर धर्मासाठी करावं लागतंय म्हणत". मौलाना तर धर्म जाणणारा पण धर्मासाठी करावं लागतंय म्हणून तिला नांदवतो. दोघांनाही ती आवडत असते तरी दोघेही सोयीस्करपणे अंग काढून घेतात. हिचा खुर्दुसवर बसलेला जीव हळूहळू दुसऱ्या पतीवर बसतो. यात तिची काय चूक? इतर धर्मियांसाठी हा कुचेष्टेचा विषय होतो. एक दुसऱ्याच्या कोर्टात फेकतो, दुसरा पहिल्या कोर्टात. एखाद्या शटल सारखी अवस्था त्या बाईची. तिच्या भवितव्याचा फैसला तिसरेच करणार. हलीमची 'शेळी जाते जीवानिशी' अशी गत होते.
सगळ्यांची पात्रे अतिशय खरी रंगविली आहेत. सगळेच हिरो आहेत. त्यांना प्रेम आहे. गिल्ट आहे. वासना आहे. दुःख आहे. धर्माचं दडपण आहे. हतबलता आहे. पण हलीमचे दुःख सगळ्यात जास्त आहे. ती नकार देत नाही, म्हणजे तिचा होकार असं समजून चालणारा हा समाज, धर्मासाठी काहीही करायला, अगदी बलिदान द्यायला ही तयार होणारा हा समाज खूपच भयंकर हे.
असा हा 'हलाल'.. चीड आणि दुःख अनुभवत पण तरीही ट्रिपल त़लाक विरोधी कायदा आल्याचे आभार मानत पाहिला.
माझे रेटिंग- 3.5/5
Comments