Skip to main content

सेक्रेड गेम्स- सीजन 2

प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं. 


झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो,  गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो. 

मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण करावं लागेल. 

'अमृता सुभाष' चा 'यादवबाईचा' रोल लक्षात राहण्यासारखा आहे. आमचे मित्र 'अमेय वाघ' यांनीही यात जे क्रिकेट खेळले आहे. वा! बदडून काढण्यातही ते कुशल! जितेंद्र सर नसल्याचे दुःख इतके होते जितके सरताजला काटेकर गेल्याने होते. 

बाकी संवाद म्हणजे शिव्यांची बजबजपुरी. एखादाच संवाद 'दिलको छू जाता है'. त्या आश्रमात जे काही ड्रग देऊन माईंड वॉश होतो ते सीन्स, गायतोंडे आणि सरताजची, सिस्टीम सोबतची आणि स्वतःच्या मनात चालणारी छळछावणी आणि त्याला असलेले हलकेसे धार्मिक सबंध या सगळ्याचा मनावर परिणाम होईल अशी  'गोची' आहे हा सीजन. माणसाची उत्क्रांती होत आली आहे हजारो वर्ष. त्यात शुद्ध वंश कल्पना, धर्माने जगाचे तुकडे करावेत अशा कल्पना याने डोके गरगरणार नसेल, रक्त, पिस्तुलं, आत्महत्या हे पाहणं जमत असेल, उगीच कशानेही भावना दुखत नसतील तर एक वेळ पाहण्यास हरकत नाही.

Must wach नाही. पण पाहात बसाल तर नक्की "मौसम बिता जाय"..

©रमा

#Netflix
#Webseries

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...