सगळ्याच
नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या
स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ‘ऑक्टोबर ’ मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट
इंटर्न्स, एकमेकांशी अगदी मोजका
संवाद असलेले, सहकारी इतकेच काय
ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर, अस्ताव्यस्त, कामात लक्ष नसलेला, बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत, कामात सिन्सिअर. ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ असे त्यांचे
अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत
हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल
घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन
निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो, त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र
वाटते. असे काही होऊ शकेल
आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे
शिवलीकडे वारंवार जाणे, याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा
डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो.
चित्रपटातील डॅन
- शिवली यांच्या नात्यावर संदीप खरेची एक कविता आठवली (खूप जणांना तो आवडत नसला
तरी मला काही कविता लै आवडतात),
" तुझे नि माझे नाते काय?
तू देणारी, मी घेणारा
तू घेणारी, मी देणारा
कधी न कळते, रूप बदलते
चक्राचे आवर्तन
घडते
आपुल्यामधले फरक
कोणते
अन आपल्यातून
समान काय?"
सिनेमा low paced आहे. पण त्यानेच तो आपल्याला सत्यकाळात ओढून
नेऊन आपण खरोखरीच तिथे आहोत हा भास निर्माण करतो. जुही चतुर्वेदींचे कथा, पटकथा, संवाद सुंदर आहेत. शांतनु मोईत्रा यांचे
बॅकग्राऊंड संगीत जादुई आहे. अविक मुखोपाध्याय यांची सिनेमॅटोग्राफीही कमाल आहे.
खूप काव्यात्मक. शुजीत सरकारचे दिग्दर्शन, वरुण धवनला एरवी
चित्रपटाचे केंद्रस्थानी असलेला टिपिकल हिरो ही ओळखच पुसायला लावते. बनिता संधुचा हा डेब्यू चित्रपट, पण नुसत्या डोळ्यांच्या हालचालींनी तिचा प्रतिसाद देणे हे
अवघडही आहे आणि परिणामकारकही. ती हलू - बोलू शकत नाही पण ऐकू शकते. हे आपल्याला तिच्या बोलक्या डोळ्यांनी कळते. वरुण धवनने असे वेगळ्या धाटणीची फिल्म करून
रिस्कच घेतली, पण तो पदोपदी स्वतःला सिद्ध ही करतो हे त्याचे
वेगळेपण.
फार काही न बोलता
खुप काही सांगतो हा चित्रपट. माझे आणि माझ्या जवळच्यांचे हॉस्पिटलशी जवळचे नाते.
खूप गोष्टी पाहिल्यात, अनुभवल्यात तिथे. कदाचित म्हणून मला आवडला
असेल. आपला वाटला असेल.
ऑक्टोबर मध्ये
शिवली ( पारिजातक ) च्या फुलांचा बहर येण्याचा महिना. डॅन - शिवलीच्या नात्यासारखा आणि म्हणूनच... नात्याला या नकोच
नाव..
(पॉपकॉर्न मध्ये हात, मोबाईलमध्ये डोकं असलेल्यांनी, ही फिल्म पाहायची तसदी कृपया घेऊ नये. )
रेटिंग - ४/५
- ©रमा जाधव
Comments