Skip to main content

आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर : एकदम कडक!!


व्यवसायाने प्रथितयश डेंटिस्ट पण, रक्तात अभिनयाची ओढ असलेला एक गोरा, घारा तरुण. केवळ एक प्रॉम्पटर म्हणून रंगभूमीशी नातं ते मराठी रंगभूमीचा पहिला-वहिला सुपरस्टार, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतले मोठे स्थित्यंतर, एक टप्पा असा सगळा प्रवास असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील बायोपिक. सुबोध भावे पुन्हा एकदा बायोपिकमध्ये म्हंटल्यावर मला आधी शंका होती. पण यावेळीही सुबोधने बाजी मारलीच आहे. 

एका 'सुपरस्टार' चा उदय ते अंत त्याने खडतर प्रयत्नांनंतर लीलया साकारले आहे. सुबोध भावे मूलतः अतिशय अंतर्मुख माणूस आहे, त्याने साकारलेल्या भूमिकेच्या अगदी उलट. घाणेकरांच्या व्यक्तिमत्वाचा त्याने अंतर्बाह्य अभ्यास केलेला आहे हे अगदी जाणवतं. आमच्या पिढीला डॉक्टरांचे दर्शन फारसे घडले नाही (पाठलाग आणि गोमू संगतीने सोडून) पण सुबोध भावेनी ते घडवून आणले आहे. चित्रपटाच्या इतर कास्टिंगबद्दलही मला शंका होती पण सुलोचना दीदीं च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असो किंवा प्रसाद ओकचा प्रभाकर पणशीकर असो, त्यांनी चांगले बेअरिंग पकडले आहे. 

एक स्वकेंद्री, बेदरकार, फटकळ, व्यसनी, विक्षिप्त, लफडेबाज, चाहत्यांच्या टाळ्या आणि शिट्यांना हपापलेला, भूमिकेत अडकून पडलेला नट अशी एक ओळख तर दुसरीकडे कायम वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेला, रंगभूमीवर वेड्यासारखे प्रेम करणारा पण यश पचवू न शकणारा, माणसं तुटून वेगळी वेगळी झाल्यानंतर एकटा पडलेला तरी मुजोर,अशी एक ओळख अशा सगळ्या ब्लॅक, व्हाईट, ग्रे सगळ्या स्वभावछटा सुबोधने सुंदर साकारल्या आहेत. पहिली बायको इरावती (नंदिता धुरी)  व दुसरी पत्नी कांचन (वैदेही) यांबरोबरचे त्यांचे संबंध, भालजी पेंढारकर, वसंत कानेटकर यांसारख्या मातब्बर, प्रसिद्ध लोकांमुळे यांचे पुढे येणे, त्याबरोबरच प्रभाकर पणशीकर (प्रसाद ओक) यांच्यासारखा मित्र ज्यांनी वेळी-अवेळी, चांगल्या-वाईट परिस्थितीत त्यांना साथ दिली हेही छान रंगवलं आहे. 

डॉक्टर घाणेकर करिअरच्या एका टोकावर असताना डॉक्टर श्रीराम लागू किंवा त्या विचारसारणीच्या कलाकारांचं आगमन झालं. प्रयोगशीलता सुरू झाली. ती एका प्रकारे डॉक्टर काशिनाथ घाणेकर पर्वाच्या शेवटाची नांदी होती. सुमित राघवन यांनी रंगवलेले लागूंचे पात्र ही अतिशय सुरेख झाले आहे. खरे तर तीही त्यांची परीक्षाच म्हंटली पाहिजे. डॉक्टर घाणेकर आणि डॉक्टर लागू यांच्यात रंगभूमीची रणभूमी होण्याइतका तणाव थोडा अतिरंजित वाटतो. दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचे काम खूपच प्रभावी झाले आहे. गाणीही छान. बॅकग्राऊंड म्युझिक विशेषकरून खूपच सुंदर. 

कधी कधी नियती तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवते. पण हे यश पचवता आले नाही तर होणारी सैरभैर अवस्था, यशाचं व्यसन आणि ते न मिळता एक प्रकारचं withdrawal, फरफट आणि दुःखद अंत याकडे नियतीही हताशपणे पाहत बसते. तुम्ही सामान्य व्यक्ती असा किंवा कोणी सुपरस्टार या चक्रातून सारेच जातात. तुम्ही, मी, 


"आणि... डॉक्टर काशिनाथ घाणेकर"..

रेटिंग- 4/5

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ