Skip to main content

Posts

Showing posts from 2014

पिकलपोनी

एक होती पिकलपोनी..गोबरे गाल, नकटं नाक,अतिशय हट्टी..नाकावर राग..आई-बापूची एकदम लाडकी. एकदा तिने बापूजवळ धरला हट्ट, "मला बाहेर घेऊन जा, जा म्हणजे जा.. आत्ताच्या आत्ता.. " बापू पण लग्गेच तय्यार. म्हणाला, "चल, पटकन तयार हो, निघूया.. "  आई म्हणाली, "अहो, आता अंधारून आलय, आता कशाला जाताय ?.. अगं पिकलपोनी उशीर झालाय आता, आता उद्या जा हा" . आई असं म्हंटल्यावर बापू जरा डळमळला, "हो, हो, उद्या जायचं का मग आपण?" पिकलपोनीने गाल फुगवले, डोळे मोठ्ठे केले, ओठांचा चंबू केला (नेहमीप्रमाणे) एक हात कमरेवर आणि एक पाय तालावर आपटत आपलं पेटंट गाणं सुरु केलं..  "जा बाबा बापू, असच कर तू.. सगळे असच करतात.. माझे कुणीच लाड नाही करत. जा बाबा. . " शेवटी आई म्हणाली "जा बाई, जा. .  पण लग्गेच परत यायचं. . पाण्याची बाटली घेउन जा बरोबर, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर.  गप घरी वरण-भात खायचा. आणि दादाला पण न्या सोबत. अभ्यास केलाय त्याने दिवसभर. पिकलपोनी पटकन तयार झाली  आणि बापू, पिकलपोनी आणि  पिकल बंबू यांची स्वारी निघाली फिरायला. .  फिर-फिर

आता तरी डोळे उघडा..

गणपती उत्सव अवघ्या महिन्यावर येउन ठेपला आहे. त्या निमित्ताने त्याच्या सार्वजनिक स्वरूपावर थोर सत्यशोधक विचारवंत व सुधारक ना. कै. भास्करराव जाधव यांनी काही परखड मते व्यक्त केलेली आहेत. ती संक्षिप्त रूपाने इथे मांडत आहेत प्रस्तुत लेख हा १९२४ म्हणजे ९० वर्षांपूर्वीचा आहे. या वरून भास्कररावांची दूरदृष्टी आणि सामन्यांचा धर्मानुकरणाच्या नावाखाली अजूनही चाललेला वेडेपणा लक्षात येईल. यात सांगितलेले आर्थिक व्यवहाराचे स्वरूप पाहता त्याची या काळात तुलना केल्यास पैशाचाही किती जास्त अपव्यय आहे हे दिसून येईल.  गणपती उत्सवाचा नावाखाली दर साली होणारा धिंगाणा व त्याद्वारे होणारी धर्माची विटंबना थांबविण्याच्या इच्छेने भास्कररावांनी गणपती उत्सवाच्या मागची मूळ कल्पनाम सद्यस्थिती (तत्कालीन), झालेले दुष्परिणाम इ. चा थोडक्यात पण मार्मिक शब्दात या पत्रिकेत आढावा घेतला आहे. सत्यशोधक समाज, मुंबई पत्रक - गणपती उत्सव गणपती उत्सव या नावाने होणारा दर सालचा 'धिंगाणा' लवकरच सुरू होईल. वाडी-वाडीतून व मोहल्ल्यातून व चाळीचाळींतून मंडळे स्थापन होऊन वर्गण्याही  (बरेचवेळा सक्तीने) जमा केल्या जातील. उत्सवाचा

तरीही...

कुणी कुणाचे नाही, हेही माहीत असते, जपत राहतो उगीच काही नाती तरीही... दिवस असे हे कंठीत जातो केविलवाणे जगू पाहतो उदास काही राती तरीही... उन्मळून पडताना पाहून या झाडांना डोलत राहती गवती काही पाती तरीही... जळणे किंवा विझणे हेची प्राक्तन आहे माहित असूनी जळती काही वाती तरीही... समानतेचा डंका पिटूनी तिन्ही त्रिकाळी जगात खितपत राहती काही जाती तरीही...

ते काय म्हणतात...

देव,संत अन थोर महात्मे कशास म्हणतील आम्हा पूजा? आपल्यामधला जिंका दानव, भक्तीभाव मग नसे दुजा बंधुत्व, प्रेम,निस्वार्थ बाणवा, नको हार वा मुकुट,भोग दंभ, क्रोध, वासनाच हरतील, अशा गुणांना सदा भजा मानवता हा धर्म असावा, कशास त्यावर दंगल वाद षड्रिपूच जर वसणार अंतरी, कशास करता आम्हा खुजा???

राजर्षी शाहू महाराज व नामदार भास्करराव जाधव

आज २६ जून. शाहू जयंती व भास्करराव जाधव यांची पुण्यतिथी. भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भास्कररावांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण मुंबईत झाली. डॉ. रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते.  मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते. विद्यार्थी दशेत ते मुंबईच्या कामाठीपूऱ्यात सत्यशोधक समाजाचे द्रष्टे कार्यकर्ते रामय्या व्यंकय्या आय्यवारू यांच्याकडे सुमारे ३ वर्षे राहत होते. तेथील वातावरण सत्यशोधक समाजाच्या तत्त्वज्ञानाने भारलेले होते. भास्कररावांच्या व्यक्तिमत्त्वावर तेथे सत्यशोधक विचारांचे खोलवर संस्कार झाले . महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले.  भास्करराव एम.ए होऊन मुंबईत कायद्याच्या पदवीसाठी अभ्यास करत होते . तेव्हा पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. भास्काररावांचा संस्कृतचा गाढा व्यासंग होता आणि इतिहासाचेही त्या

सकाळ होई कातरवेळ..

असे काहीसे मळभ साचले, उरी अंधारा नुस्ता खेळ सकाळ होई कातरवेळ.. अवतीभवती वाट दिसेना, कशास नाही कसला मेळ सकाळ होई कातरवेळ.. टाकू पाहता डाव हातचा, सुरवातीसच फसला खेळ सकाळ होई कातरवेळ..

आजच्या पावसात..

कुण्या पावसाने किती मत्त व्हावे  तुझा स्पर्श होता पुन्हा वादळ यावे  फुलोरा फुलवा तन्मानातून साऱ्या  तुला पाहता चिंब त्यानेच गावे  नभांच्या पल्याडून असे शिडकावे आभाळी स्वप्नांचे किती हेलकावे निळाई रुजावी भूईच्या उराशी नि हिरवाईने लख्ख जन्मास यावे.. पुन्हा रंग-गंधात रमवून जीवा सरींतून या मी, तुझी भेट घ्यावी अंतरातून सार्‍या बरसून आणि  विसरून जावे जूने हेवेदावे..

सोबत..

थोडे झेलले चांदणे थोडी उन्हाची ही वाट घाटाघाटांतून कधी, कधी चाललो सरळ कधी मौनाचे अंतर तुझ्या-माझ्या प्रवासात चिंब चिंब झालो ओले कधी कोण्या श्रावणात कधी टपोरं चांदणं कधी ग्रासले ग्रहण मन वेडं गाव सदा जाई तुजला शरण बघ नवा ऋतु आला आज पुन्हा अंगणात गेली काळोखाची रात दारी नवी ही प्रभात..                                    

तक्रार

आटपाटनगरात फिरून फिरून पेंगलेला निंबोणीच्या झाडामागे चांदोबा भागलेला  पेज भरवत आई दाखवते बाळाला हळूचएकटिचकी मारते गालाला त्या तिथे कोपर्‍यात रुसून बसली ताई सगळं फक्त बाळाला, मला काई नाई?? टपोर्‍या डोळ्यातून येतं टपटप पाणी ऐकव तू फक्त त्यालाच ती गाणी येऊच दे बाबाला मी सांगते त्याला नाव, आमचा सुद्धा आहे म्हंटलं वेगळासा गाव..

मेरे पास रहो ....

                                  मेरे पास रहो.. मेरे खास रहो ..  आज कही न जा..  मेरे साथ रहो ..  दिन का क्या है डूब जायेगा  वक्त ऐसेही बीत जायेगा..  मेरे जिस्म से परे, मेरे सांस से जुडे, मेरे दिल के करीब  मेरी प्यास रहो ..

प्रिय सावित्री

प्रिय सावित्री,  अज्ञान, कर्मकांड, वर्णभेद, जात-पात, बालविवाह, केशवपन,सतीप्रथा या कुप्रथांनी आणि समाजव्यवस्थेत पिचल्या जाणार्‍या बाईला, पुरुषाच्या आधाराशिवायही तिचं काही अस्तित्व आहे, हे तुझ्याकडे बघून वाटलं बघ..स्त्रिया आणि दलित यांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नवे कार्य तू सुरु केलेस. या सामाजिक परीवर्तनाच्या लढाईत आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे खर्च केलीस..अनेक आघात, छळ सहन करून विवाहोत्तर शिक्षण घेतलेस..देशाची पहिली महिला शिक्षिका तू, तू स्त्रियांना फक्त शिक्षण नाही ज्ञान दिलेस..असंख्य स्त्रियांना प्रेरणा देऊन शिक्षणक्षेत्रात आणलेस, तुझ्या वाड्यातली विहीर दलितांना खुली करून दिलीस, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलीस, शोषण आणि असमानता या विरोधात अनेक विवेकनिष्ठ चळवळींचा पाया रचलास. सत्यशोधनाचा आग्रह धरलास..आज तुझ्या स्मृतीदिनी  मला सांग, एकोणीसाव्या शतकात, अस्पृश्यता, सतीप्रथा, वर्ण, लिंग,वंश, धर्म यांच्या आधारवर समाजात विषमता पोसणार्‍या समाजव्यवस्थेला छेद देणारी तू..कुठून आली तुझ्यात ही शक्ती?"ढोल, गवार, शुद्र, पशू, नारी, ये सब ताडन के अधिकारी" असे बेलाशक समजणार्

असे कसे …

असा कसा रे तो वारा  धाव घेतो तुझ्याकडे  असा घट्ट मिठीसारखा  तुझ्याभोवती घाली कडे  असे कसे रे ते ऊन  तुला टाकते वेढून  गर्द झाडीतून नेमके  घेते तुलाच वेचून  असा कसा रे तो पाऊस  चिंब तुलाच भिजवी  तुझे तन, तुझे मन  साऱ्या साऱ्याला रिझवी  असे कसे … 

प्रेमाचा दिवस..

"प्रेमाचे रे कसले दिवस घालता??", पंतोजी डाफरत होते.. कुण्णी कुण्णी म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते..बिल्डिंगमध्ये वॅलेंटाईन्स डे मोठ्या उत्साहाने साजरा होत होता. दिवसभर पंतोजीनी जीव तोडून निषेध व्यक्त केला, पण बधतो कोण?? संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरून येताना त्यांनी कोपर्‍यावरच्या फुलवाल्याकडून सोनचाफा घेतला. घरी येऊन तो उशाशी ठेवून एकटेच हुंगण्यापेक्षा त्यांनी का कोण जाणे, का़कुंच्या केसात माळला. काय दिसलं त्यांच्या डोळ्यात काय माहित, पण सोनचाफा जरा जास्तच सुंदर दिसला हे नक्की.. "हे काय भलतच आज?" काकुंनी आश्चर्‍याने विचारले.. "हॅपी वॅलेंटाईन्स डे", पंतोजी लाजून म्हणाले..

माझ्यात वास आहे ..

दाटून भोवताली, अंधार सावल्या ह्या  त्या दूरच्या दिव्यांचा, नुसताच भास आहे ..  लवलेश ना असावा, कुठल्याच वेदनेचा  ही व्यर्थ मृगजळाची, अतृप्त आस आहे ..  जो-तो दिसे स्वत:चा, सेवा असे स्वत:ची  कळले कधी न त्याला त्याचाच दास आहे ..  फिरले जगात साऱ्या, देवास भेटण्याला  बघता मनात कळले, माझ्यात वास आहे..